Wednesday, September 15, 2021

कामजाणीवा Sexuality, Sex and Women

 कामजाणीवा..

सेक्स आणि निरामयता


"माझ्या नवऱ्याने दुसरे लग्न केले तरी चालेल मला, मीच त्याला सुचवले आहे तसं, कारण रोज रात्री मला त्याचा खूप त्रास होतो. आता आम्हाला दोन मुलं आहेत पण त्याची कामेच्छा काही कमी झालेली नाही आणि त्याचं जवळ येणं आता सहनही होत नाही"... 

माझ्यासमोर बसलेल्या स्त्रीचे मनोगत. 

सल्ला मार्गदर्शनासाठी ती माझ्याकडे आली होती. तिच्या पूर्वेतिहासातून कळले की कामजीवन हा शब्द देखील तिच्या घरी वर्ज्य होता. संस्कारातून कामभावना आणि काम क्रिया या विषयी प्रचंड गैरसमज डोक्‍यात भिनले होते. स्वतःहून पुढाकाराने काम क्रिया करणे हा प्रकार लग्नानंतर आजतागायत तिने केला नाही हे तिने मान्य केले. ती असे का वागत असावी? कामजीवनाविषयीच्या गैरसमजुती तीचे आयुष्य उध्वस्त तर करणार नाहीत ना? 

मुलगा किंवा मुलगी लहानाचे मोठे होताना जननेंद्रियांची माहिती पालक देतात ती अशी.. 

"शी, ते घाणेरडे आहे" "वाईट असते ते" "नालायक, तिथे काय हात लावतेस?" "हे कसले चाळे?".. 

हे असले संस्कार घेऊनच कामजीवनाची माहिती डोक्यात बसते. 

अगदी इंग्लंड, युरोपात देखील 1960च्या दशकात कामक्रांतीच्या काळात 'ईव्ह की मेरी' असा प्रश्न ऐरणीवर आला होता. आज-काल टीव्हीवरून आणि नेटवरून विकृत काम ज्ञान दिले जाते. त्यातही स्त्रीचे देहप्रदर्शन करून कामभावना बिघडविल्या जातात. पुस्तके, मासिके, यातून अर्धवट माहिती मिळाली की गैरसमजांची मालिकाच तयार होते. अर्थातच यात बळी जातो स्त्रीचा ! स्त्रीत्वाचा !! 

स्त्रीला कामसुखाची एवढी गरज नसते मात्र पुरुषाला तिने कामसुख द्यायला हवे असे पारंपारिक अंधश्रद्ध मत प्रचलित आहेच. स्त्रीला स्वतःच्या शरीराची ओळख खूपदा उशिरानेच होते. आम्ही घेत असलेल्या 'कामज्ञान' शिबिरातून ध्यानात असे आले आहे की ७५ टक्के प्रश्न हे पाळीविषयी असतात. पाळी येणे हा एक शाप आहे असे समजून आजही अनेक ठिकाणी स्त्रीला पाळी आल्यावर बाहेर बसविले जाते किंवा वेगळे बसविले जाते. ज्यू लोकांमध्ये पाळी आल्यावर संबंध ठेवण्यास सात दिवस मनाई आणि सातव्या दिवशी विधियुक्त अंघोळ (ज्यास 'मिकवाह' म्हणतात) ती केली जाते. पाळी विषयी नीट माहिती वयात येणाऱ्या मुला-मुलींना दिली जात नाही. त्यामुळे तिच्या पहिल्या पाळीचा अनुभव गोंधळलेला, विचित्र, नाहीतर वाईट असतो. 

पहिल्या रात्री बायकोच्या योनीतून रक्तस्त्राव झाला नाही म्हणजे ती 'प्युअर' नाही; या समजुतीतून दारूच्या आहारी गेलेल्या नवर्‍यास सुमारे दोन महिने मला कौन्सिलिंग करावे लागले. इटलीत काही वर्षांपूर्वी आपण कुमारिका आहोत हे दाखविण्यासाठी योनी पटलाची शस्त्रक्रिया स्त्रिया करून घेत. योनीपटल म्हणजे योनीमार्गात असलेला पडदा. 

शेरे हाईट या कामव्यवहार संशोधिकेस असे आढळले आहे की सुमारे ७५ टक्के पुरुषांना हे माहिती नसते की स्त्रीस नेमका काम आनंद कसा मिळतो ! आणि तिच्या कामेच्छा व कामभावना काय आहेत व असतात? 

काम व्यवहाराचा निरोगी पाया दोघांच्या कामपूर्तीत असतो. पुरुषाची कामपूर्ती वीर्यस्खलनातून होते. स्त्रीच्या कामपूर्ती विषयी पुरुषाला काहीच देणे घेणे नसते. अलीकडील भारतातील एक संशोधन असे सांगते की, सुमारे ६८ टक्के पुरुष त्यांची कामपूर्ती झाल्यावर पत्नीकडे पाठ करून घोरू लागतात. स्त्रीची कामपूर्ती नावाचा प्रकार नसतोच असे विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मानले जायचे. अमेरिकेतील सुमारे ८६ टक्के स्त्रिया कामपूर्ती साठी शिश्निका उद्दीपन किंवा क्लायटोरीस स्टीम्युलेशन यामार्गे हस्तमैथुनाद्वारे कामपुर्ती मिळवतात असे एका सर्वेक्षण चाचणीत आढळले आहे. हस्तमैथुन हे घाणेरडे, वाईट आणि शरीर दुर्बळ करणारे असते असे सर्रास मानले जाते. खरेतर पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही हस्तमैथुन करणे यात गैर, घाणेरडे काहीच नाही. कामव्यवहाराची सुरुवात गरज, इच्छा, क्षमता यातून होते आणि प्रेम व जवळीक हा त्याचा पाया बनतो. आज पुरुष म्हणतो, 'सेक्स नाही मग प्रेम नाही' तर स्त्रीचे सांगणे असते, 'प्रेम नाही तर मग सेक्स नाही'. वास्तवात जवळीक, आत्मीयता, प्रेम, विश्‍वास, प्रामाणिकपणा आणि कामजीवन हे एकमेकांबरोबर चालतात. 

ज्या जोडप्यांमध्ये संवादाचा अभाव असतो तेथे कामजीवन फुलत नाही. कामसंबंध हा दोन व्यक्तींमधील एक व्यवहार आहे. यात दोन व्यक्तींमधील नातेसंबंध फार महत्त्वाचे असतात. एकमेकांचे हे एकमेकात असलेले व्यवहार निरोगी ठेवणे गरजेचे असते. नाहीतर काम संबंधांमध्ये आक्रमण सुरू होते. पुरुषांकडून बलात्कार तर स्त्रियांकडून कामक्रियेस नकार देऊन शरीराचा साधन म्हणून वापर सुरू होतो. एकमेकांना फसवून नातेबाह्य संबंध सुरू होतात...

स्वतःच्या शरीराची ओळख स्त्रीने नीट करून घेणे गरजेचे आहे पण त्याहूनही महत्त्वाचे आहे स्त्रीच्या कामभावना, कामजाणिवा, कामक्षमता तिने ओळखणे. 

काम संबंधांना मान्यता हवी म्हणून विवाह केला जातो. पण विवाहातून कामसंबंध निरामय राहतात याची खात्री देता येत नाही. याचाच अर्थ निरामय कामजीवनासाठी परिपक्व मानसिकता आणि निरोगी शारीरिकता गरजेची असते. काम संबंध हे जसे अपत्य जन्माला घालण्यास गरजेचे असतात तसेच, तेवढेच, ते आनंद मिळवण्यासाठीही असतात..

आणि म्हणूनच स्त्रीने कामजाणिवा रुंदावणे आवश्यक आहे..!

आणि पुरूषांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या जाणिवा विवेकी होणे अपरिहार्य आहे!!

- डाॅ. प्रदीप पाटील

उपवास म्हणजे आरोग्याचा र्हास! Fasting Myth

उपवास म्हणजे आरोग्याचा र्हास


पोटाला आराम पडावा म्हणून आम्ही उपवास करतो असं सर्रास सगळे जण सांगतात.. उपवास केल्याने मनातली इच्छा पूर्ण होते असं स्त्रियांना वाटतं.. उपवास केल्याने प्रायश्चित्ताचं समाधान मिळतं... असंही काही जणांना वाटतं. 

उपवासाची ही चढाओढ जशी दिवसांची असते तशीच ती खाद्यपदार्थ न खाण्याचीही असते. 

उपवासाला आज सामाजिक प्रतिष्ठा लाभली आहे. उपवासावर तासंतास चर्चा करून स्वतः कसे उपवास महर्षी आहोत असे सांगण्याचा बडेजावपणा सर्व धर्मियांत  दिसून येतो.  काहींना तर आयुष्याचं ते अविभाज्य अंग आहे असं वाटतं. 

उपवासाचं हे जे स्तोम आहे ते तपासून पहावयास हवे. 

अन्नाशिवाय काही काळ राहणे म्हणजे उपवास हा अर्थ व्यवहारात मात्र अस्तित्वात नाही. उपवासाचे पदार्थ खाऊन काही काळ अर्धपोटी राहणे म्हणजे उपवास असं आजच्या उपवासाला म्हणता येईल. श्रावणी सोमवार, संकष्टी, एकादशी, शिवरात्री आणि तिथी वारानुसार चे उपवास हे हिंदू धर्मशास्त्रानुसार आहेत असे समजून केले जातात. वेदकाळात सर्रास मांसभक्षण ऋग्वेदी ब्राह्मणही करायचे, तिथे उपवासाची काय कथा? उपवासाचं स्तोम नंतरच्या काळात पुरोहित आणि ब्राह्मण्य जपणार्यांनी माजवलं. धर्मसिंधु ग्रंथात एकादशीचे नुसतं भोजनाविषयीच्या निषेधाचे  उपोषण व दुसरं व्रतयुक्त उपोषण असा दंडक घालून दिलाय. यातही सौभाग्यवती स्त्रियांनी नवऱ्याच्या व पित्याच्या आज्ञे वाचून उपवास व व्रतवैकल्य केली तर व्रत व्यर्थ होऊन नवरा मारतो व नरकात जातो असा पुरुषप्रधानी धाक घातला आहे आणि एकादशी व्रत केल्यावर शंभर यज्ञांचे पुण्य प्राप्त होतं असं आमिषही दाखविले आहे. चातुर्मासाचे स्तोम तर आपल्याकडे नको तितकं आहे. अनेक पदार्थांबरोबर स्त्रीसेवनही वर्ज्य  करावं असे स्त्रीला कमी लेखणारे आदेशही आहेत. श्रावणी सोमवारचे उपवास जगावेगळे कृत्य या थाटात केले जातात. जैन लोकांत सायंकाळी लवकर जेवण्याचा 'व्हासा' जसा असतो तसा पर्युषण पर्वात उपवासाचा मारा देखील असतो. ख्रिश्चन धर्मामध्ये नाताळापूर्वी चाळीस दिवस उपवास करण्याची प्रथा (लेंट) आहे मात्र अंडी-मासे सेवन करण्यास हरकत नसते. मुस्लिमांचे रोजे किंवा मोहरमचे उपवास हा अतिकडकपणाचा कळस म्हणावयास हवा कारण पाच वर्षांच्या मुलामुलींनाही उपाशी ठेवले जाते. 

उपवास करण्यामागे खरंतर धार्मिक कारणंच बहुसंख्येने आढळतात.

देवाचा वार, संकष्टी, चतुर्थी, व्रत म्हणून हे उपवास केले जातात. रूढी, परंपरा, देवाचा आदेश व धर्मग्रंथांचा आदेश म्हणूनही हे उपवास केले जातात. ईच्छित मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी बहुसंख्य स्त्रिया उपवास करतात. पाप निवारणासाठी, डायटिंग, पोटाला आराम, इत्यादी इतरही अनेक कारणं उपवासा मागे असतात. 

ही सर्व कारणं वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नाहीत. 

देवाचा वार म्हणून उपवास करायचा म्हंटलं तर भारतातील शनिवार हा अमेरिकेत मात्र शुक्रवार असतो. साडेनऊ तासांचा फरक वार पाळण्याच्या आड येतो.  आंतरराष्ट्रीय रेषा ओलांडली कि वार-तिथी दोन्ही बदलतात. 

धार्मिक व्रत म्हणून जे उपवास सांगितलेत त्यांना काहीच आहारविज्ञानाचा पाया नाही. उदाहरणार्थ पांढरे पावटे, काळा वाल, घेवडा, चवळी, वांगी, इत्यादी भलीमोठी यादी वर्ज्य करण्यास धर्मसिंधुत सांगितली गेली आहे. वास्तविक डाळी, कडधान्यं यातनं प्रथिने मिळतात. जी शरीराच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात. 

मनोकामना पूर्ण होण्यासाठी उपवास करणाऱ्या स्त्रिया हे लक्षात घेत नाहीत की, उपवासाने शरीराच्या पेशींच्या आवश्यक गरजा मारल्या जातात. बहुतांश भारतीय स्त्रियांत रक्तातील लोहाचे किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण हे १० टक्क्यांच्या खाली आढळते. जे सामान्यपणे १४ टक्क्यांपर्यंत असावयास हवे. त्यामुळे सतत उपवास करणाऱ्या स्त्रिया कायम अशक्त राहून अंगावरून पांढरे जाणे किंवा श्वेतप्रदर (ल्युकोरिया) व पंडुरोग किंवा अॅनिमिया या रोगांना बळी पडतात. अमेरिकेतील व इतर पाश्चात्य देशातील स्त्रियांमध्ये हेच प्रमाण १४ ते १६ टक्के असते.

भारतातील जवळपास शंभर पैकी ६८ स्त्रिया या पंडूरोगाने ग्रस्त असतात. अगोदरच स्त्रियांच्या खाण्यापिण्याविषयी अनेक तक्रारी असतात त्यात उपवासाची भर पडते.

 उपवासाचे फायदे सांगणारा फार मोठा वर्ग समाजात आहे. त्यास आयुर्वेदाचा आधार आहे असेही सांगितले जाते. पोटाला आराम पडतो, डायटिंग होतं, असा चुकीचा प्रचारही केला जातो. डायटिंग किंवा समतोल आहार ही एक वैज्ञानिक पद्धती आहे. तिचा धार्मिक उपवासाशी शून्य संबंध आहे. आहार विज्ञान नावाची स्वतंत्र शाखा ज्याला डायटेटिक्स म्हटले जाते ही आज विकसित झाली आहे. 

समतोल आहाराची व्याख्या काय आहे? सर्व खाद्यपदार्थांनी युक्त जो शरीरास आवश्यक ऊर्जा पुरवितो व शरीराची वाढ पेशींची रचना व कार्य व्यवस्थित चालू ठेवतो असा आहार. शरीरास आवश्यक तीन प्रमुख घटक असतात. प्रथिने किंवा प्रोटिन्स, कर्बोदके किंवा कार्बोहाइड्रेट व मेद किंवा फॅट. यापैकी प्रथिने शरीराची वाढ करतात. कर्बोदके शरीरास ऊर्जा देतात आणि मेद, स्नायू व हाडांना आधार देऊन ऊर्जेचा साठा ठेवतात. इतर घटक जे आहारात असावयास हवेत ते म्हणजे जीवनसत्वं किंवा विटामिन्स, खनिज, क्षार, इत्यादी. यापैकी एखादा घटक जरी शरीरास कमी पडला तर आहारजन्य रोग उद्भवतात. उदाहरणार्थ, व्हिटामिन १२ या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे हातापायात मुंग्या येणे सुरू होते. गेल्या कैक वर्षात डॉक्टरांकडे येणाऱ्या पेशन्टस्  मध्ये हे प्रमाण स्त्रियांमध्ये वाढत चालले आहे. आणि व्हिटामिन बी १२ ची इंजेक्शने देणे बेसुमार वाढली आहेत. 

एखादा घटक शरीरात जादा झाला तरीही रोग उद्भवतो. उदाहरणार्थ मेदाचे प्रमाण वाढलं की रक्तदाबाला आमंत्रण मिळालंच म्हणून समजा. मुस्लिमांच्या रोजाच्या काळात भजी,वडा, मटन-चिकन याचं प्रमाण इतका वाढतं की त्याचा मोठा दुष्परिणाम शरीराच्या आरोग्यावर होतो. बऱ्याच वेळा पोट बिघडतं. उलट्या सुरू होतात आणि सलाईन लावायची वेळ येते. याचा अर्थ आहार वर्ज्य करणे तर सोडाच पण तो आवश्यकतेपेक्षाही कमी करायचा नाही वा जादा ही करायचा नाही ! 

जर उपवास सलग चार दिवसांपेक्षा जास्त दिवस केला तर ' रिफिडिंग सिंड्रोम ' या विकाराचा धोका असतो. यात क्षारांचा असमतोल उद्भवतो आणि त्याचे परिणाम मेंदू, मुत्रपिंडे, ह्रदय, फ्फुफुसे, इ. वर होतो.

समतोल आहाराचे एक गणित आहे. सर्वसामान्यपणे बैठं काम करणारा, हालचालीचं काम करणारा व अतिश्रम करणारा असे तीन वर्ग समाजात आहेत. त्यांच्या या प्रकारानुसार त्यांना कमी, मध्यम व अती कॅलरीजच्या आहाराची गरज असते. ऑफिसात टेबलावर बसून काम करणाऱ्यांची हालचाल जर अत्यंत कमी असेल तर त्याला कमी कॅलरीच्या अन्नाची गरज असते. आणि हमाली, शेती आणि कामगार असणाऱ्यांना,... जे अति श्रमाचं काम करतात त्यांना जास्त कॅलरीज देणाऱ्या अन्नाची गरज असते. वास्तवात काय घडतं? बैठं काम करणारा भरपूर खातो आणि हमाल-कामगार उपाशी असतो. या सूत्रास 'बेसल कॅलरी रिक्वायरमेंट' असे म्हणतात. या सूत्रानुसार खरंतर आहाराचं नियोजन हवं. पण यावर उपाय सांगितला जातो तो म्हणजे उपवास !!

वाईट याचं वाटतं कि उपवासाच्या या संकल्पनेत अतिश्रम करणारा वर्गच जास्त भरडला जातो. त्यामुळे शारीरिक दृष्ट्याही तो कायम रोगट राहतो. 

उपवासाचे पदार्थ म्हणून जे सांगितले जातात ते सर्व पदार्थ, आहारशास्त्र दृष्ट्या शरीरास कोणताही फायदा करीत नाहीत. उदाहरणार्थ, साबुदाणा. साबुदाण्याचे वडे, खिचडी वगैरे पदार्थ तर तळून खाल्ले जातात. साबुदाण्यात प्रथिने फक्त ०.२ ग्रॅम असतात. त्यामुळे हे ठराविक पदार्थ महिन्यात बहुसंख्य वेळा खाल्ल्याने विविध पोषक घटकांची शरीरात भर पडत नाही.

उलट कोणताही आधार नसलेले दावे यासंदर्भात केले जातात. धर्मग्रंथातून असं सांगितलं गेलं आहे की गूळ वर्ज्य केला की आवाज मंजुळ होतो.. दही-दूध-तुपाचा त्याग केल्याने विष्णू लोक प्राप्त होतो, वगैरे.

 मेंदूतील हायपोथॅलॅमस या भागात भुकेचं केंद्र असतं. त्यावर नियंत्रण ठेवणारे अनेक घटक असतात. पैकी आहारातील प्रथिने व कर्बोदके यांच्या रक्तातील पातळीवरही या केंद्राचे कार्य अवलंबून असतं. समतोल आहारानं हे केंद्र नीट कार्यरत राहील हे 'उपवासी' लोक ध्यानात घेत नाहीत. 

जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा पोटातील आतड्यात पाचकरस स्त्रवतात व अन्नाचे नीट पचन करतात. उपवास केल्यावरही हे रस पाझरतात, पण अन्न  नसल्यास मात्र ते हानीकारक ठरू शकतात.  उदाहरणार्थ, हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा अॅसिड. ज्यामुळे 'हार्टबर्न' सारखे अपाय होतात. उपवासाच्या काळात साखरेचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यास भ्रम व  बेशुद्धी येण्याची शक्यता वाढते. मेंदूची साखरेची गरज न भागविण्यास त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. दीर्घकाळ कुपोषण व उपवासाने यकृत (लिव्हर) व मूत्रपिंडावर ताण पडून ते निकामी होण्याचा संभव जास्त असतो. दीर्घकाळाच्या उपोषणात मूत्रक्षय, विरक्तता (युरेमिया), विषरक्तता (कीटोसिस) हे मृत्यूकडे नेणारे गंभीर बिघाड उद्भवतात. 

उपवासाने वजन कमी होतं हा एक गैरसमज आहे. उलट त्यामुळे शरीर दुबळे व अकार्यक्षम बनते. कारण उपवासात आहारातील समतोल आहार घटक शरीरात न गेल्याने शरीरातील प्रमुख आहार-घटकांचा तोल बिघडतो आणि त्याचा फटका इंद्रियांना बसतो. संशोधनातून असं दिसून आलं आहे की खूप काळ अन्न न घेतल्याने ऊर्जेसाठी प्रथिनं खर्च होतात. त्याबरोबर शरीरातले पोटॅशियम ही कमी होते आणि ह्रदय विकार बळावून मृत्यूही येतो. 

'अथ श्रवण द्वादशी व्रत...'असे म्हणत बसण्यापेक्षा उपवासास कायमची रजा देऊन समतोल आहाराची कास धरल्यास आरोग्य उत्तम राहील हेच खरे.‍‍

- डॉ. प्रदीप पाटील ●

बलात्कार कोण करतं? Rape and causes of Rape

बलात्कार कोण करतं? 


 भारतात रोज ८८ बलात्कार होतात असं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचं म्हणणं आहे.

भारतात होणाऱ्या या बलात्कारांपैकी बलात्कार  करणारे कोण असतात? 

तर ज्या स्त्रीवर बलात्कार होतो त्या स्त्रीला ओळखणारे जवळपास ९४ टक्के असतात ! बाहेरचे अनोळखी कोणी नसतात. याचाच अर्थ दर सोळा मिनिटाला एक बलात्कार होत असतो आणि... 

चारपैकी एकाला शिक्षा होत राहते. 

का करतात बरं हे बलात्कार? अलीकडे बलात्कार करून त्या स्त्रीस मारून टाकणे किंवा तिची विटंबना करणे ही प्रकरणे वाढीस लागली आहेत. 

या व्यक्ती खरेतर नुसत्या गुन्हेगार नाहीत तर त्या मनोविकृत आहेत. 

मनोविकृती जी असते तीला समाज विघातक व्यक्तिमत्त्व विकृती किंवा इंग्रजीत 'अँटीसोशल पर्सनालिटी डिसाॅर्डर' म्हणतात. 

अशा व्यक्ती या खून करायला मागेपुढे पहात नाहीत. या व्यक्तींमध्ये हा दोष निर्माण होण्यास संस्कार आणि त्यांचा मेंदू दोन्ही कारणीभूत असतात. त्यांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. एखाद्या गोष्टी करायच्या ठरवल्या आणि त्या विघातक आहेत हे लक्षात आले तरी त्याला थांबवता येत नाही. बहुसंख्य वेळा अशा व्यक्तींची कौटुंबिक परिस्थिती गंभीरपणे बिघडलेली असते. घरातील  संस्कार  करणार्या व्यक्ती विकृत वागत असतात. सामाजिक परिसर हा विकृतींचे गुणगान करणारा असतो. कोणताही ताण आला तर त्याला तोंड देण्याची क्षमता अशा व्यक्तींमध्ये अतिशय कमी असते. 

बदामाकार ग्रंथी आणि एसीसी हे मेंदूतले दोन भाग कोणत्याही ताणाला तोंड देण्यासाठी उपयोगी असतात. या दोन भागात बिघाड निर्माण झाला की ही क्षमता ढेपाळते. लहानपणी केलेला अनाठाई छळ विकृत मानसिकता निर्माण होण्यास हातभार लागतो. अलीकडच्या संशोधनातून आणखीन एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे आक्रमक वर्तनाचा जनुक. हा जनुक जेव्हा बिघडतो तेव्हा मेंदूतील रसायने बिघडतात. उदाहरणार्थ, मोनोअमायनो ऑक्सीडेज नावाचे रसायन. जेव्हा हे रसायन निर्माण होत नाही किंवा खालच्या पातळीवर राहते तेव्हा हिंसा आणि राग याचा उदय होत राहतो. एका डच कुटुंबात ५ जणांच्या जनुकांमध्ये बिघाड होता आणि हे सर्वजण हिंसक कृत्यात कायम गुंतलेले होते. बदामाकार ग्रंथी मुळे धोका ओळखता येतो. पण या ग्रंथीत झालेल्या गडबडीमुळे धोक्याची जाणीव अतितीव्र स्वरूपात करून घेतल्याने अशी व्यक्ती हिंसा करून मोकळी होते.

भावनिक थंडपणा, धमक्या, फसवणूक, पश्चातापाचा मागमूसही नसणे आणि सतत कुठल्या ना कुठल्यातरी जोखीमा उचलत राहणे ही लक्षणं आहेत समाजविघातक व्यक्तिमत्त्व दोषाची.  यांच्या मेंदूच्या उजव्या भागात आणि बदामाकार ग्रंथीत किंवा अमिग्डाला ग्रंथीत मोठा दोष निर्माण झालेला असतो. विकृत व्यक्तींमध्ये बलात्काराची इच्छा निर्माण होणे आणि समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करणे हे दोन्ही एकाच वेळी घडून येते. ज्याला "रिव्हर्स अँड पनिशमेंट इम्युनिटी' असे म्हणतात. अशा व्यक्ती लहान असताना त्यांचे आईबरोबरचं नातं हे तुटक असतं. जवळिकीचं..मायेचं.. नसतं. 

गुन्हा करणाऱ्या किंवा खून करणाऱ्या गुन्हेगारांच्या मेंदूचे सिटीस्कॅन जेव्हा तपासण्यात आले तेव्हा एक महत्त्वाचा फरक दिसून आला. खाली दिलेल्या फोटोत तुम्हाला दिसेल. आपल्या कपाळाचा मागील भाग हा विचारांचे केंद्र समजला जातो, ज्याला "ऑर्बिटो फ्रंटल कॉर्टेक्स' म्हणतात. या केंद्रात ग्लुकोजचे चलनवलन हे पूर्णपणे थांबलेले किंवा कमी झालेले दिसून येते. म्हणजेच विचार करणार्या या भागाचे कार्य मंदावते. जे गुन्हेगार आहेत त्यांच्यात विचार करणारा हा भाग अपंग होतो. विचारच सुचत नाहीत आणि मग अविचार हा बलात्काराकडे व गुन्हे करण्याकडे घेऊन जातो. 

गुन्हेगार फक्त कुसंस्कारांतून निर्माण होत नाही. बाद झालेला मेंदूही गुन्हेगार निर्माण करण्यास जबाबदार असतो. परिसर आणि जनुके एकत्रितपणे अशा रीतीने एकत्र आल्यास गुन्हेगारांची निर्मिती होते. त्याचबरोबर मेंदू घडत असताना त्याच्यात जर दोष निर्माण झाले, मेंदूला अपघाताने इजा झाली-खास करून पुढच्या भागांमध्ये-तर, आणि लहानपणी विकृत छळ झाला तर, हिंसक गुन्हेगार तयार होण्यास मोठी संधी निर्माण होते. 

याचा दुसरा अर्थ नैतिक आणि अनैतिक वागण्यामध्ये हे सर्व घटक समाविष्ट असतात. 

भारतात सध्या हिंसा, अत्याचार आणि फेकूगिरीचे उदात्तीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालू आहे. 

मग बलात्कार आणि खून यासाठी जबाबदार कोण?

बिघडलेल्या डोक्यांना या देशात आता सहज हवा मिळतेय.

- डाॅ. प्रदीप पाटील

करणी आणि मनोविकार Paranoia and haunting


 "आमच्या घरात सतत भांडणं होतात...मुलगा या वर्षी नापास झाला...यांचा धंदा पण नीट चालेना...हल्ली हे कामावर जायला टाळाटाळ करतात...काय बिघडले आहे कळत नाही... देवा, तुम्हीच सांगा.." 

- रमाबाई आपली तक्रार घेऊन महाराजांसमोर बसल्या होत्या. तसे ते महाराज फेमस! एकदम पाॅवरबाज महाराज. करणी-धरणी पासून बाहेरवासापर्यंत सारं काही काढून देणारे महाराज !! 

"रमाबाई", महाराज म्हणाले, "तुमच्या नवऱ्यावर करणी केली आहे. सगळा हा करणीचा प्रताप आहे..." 

"कुणी घातली महाराज ही करणी?.."

रमाबाईंचा नवरा अरुण सावध झाला आणि काळजीने विचारले. 

"जवळचच आहे.. नात्यातलं आहे. नाव नाही फोडणार मी." - महाराज म्हणाले. 

"मग, यावर उपाय?" -रमाबाईंनी विचारले. 

तसे महाराज म्हणाले, 

"चार अमावस्या करायच्या. पूर्वेला नारळ पुरायचा. गाणगापूरच्या चार वाऱ्या करायच्या. अंगारा देतो.. घरात, दुकानात, रोज रात्री चार दिवस फुकायचा.. करणी जाईल !"

 अरुण आणि रमाबाई घरी आले. 

महाराजांनी सांगितलेलं शंभर टक्के खरं आहे असं अरुणचं मत बनलं. कारण... 

त्याला स्वतःलाही तेच वाटत होतं ! कुणीतरी करणी घातल्याशिवाय आपल्यावर संकट येणार कसं? त्याच्या डोक्यात दोघांची नावं घोळत होतीच. त्या दोघांनी आपला पाय नेहमीच ओढला आहे. आपल्या वाईटावर आहेत ते. अरुणचा संशय पक्का झाला. 


खरोखरच "करणी" अस्तित्वात आहे का? 


याचे उत्तर, शंभर टक्के नाही, असे आहे. 

मग महाराज-अरुण-रमाबाई यांचे काय? 

अनेक महाराज करणी का  व कोणी केली हे सांगत असताना कौल लावतात. मग फुलाचा कौल असतो...भंडाऱ्याचा कौल असतो, वगैरे. अशावेळी चमत्कार समजून लोक महाराजाच्या करणी काढण्याच्या कसबावर विश्वास ठेवतात. 

"करणी" म्हणजे अज्ञात शक्तीद्वारे एखाद्याने दुसऱ्याचे वाटोळे करणे होय. ही अज्ञात शक्ती म्हणजे मंत्र-तंत्र, गुढ विद्या, काही विशिष्ट शक्ती.

 वास्तवात अशी कोणतीही अज्ञात शक्ती म्हणजे मंत्र-तंत्र, गुढविद्या किंवा शक्ती साधा कागदही इकडचा तिकडे हलवू शकत नाहीत. असे मंत्र-तंत्र असते तर शत्रूवर करणी घालूनच त्यांना मारून टाकण्याचे सारे काम फत्ते झाले असते !! दुसरे म्हणजे पोलिसांची गरजच भासली नसती...सरळ महाराज-बुवांकडे जाऊन आपल्या वाईटावर असलेल्यांचा करणीने बंदोबस्त केला की काम झाले !

अज्ञात शक्ती, गूढ विद्या, मंत्र-विद्या, काळी जादू असे शब्द प्रयोग करून महाराज-बुवा लोकांना आपल्याकडे आकृष्ट करतात. मग त्यांना वेगवेगळे विधी किंवा उपाय सांगून पैसे उकळतात आणि आपला धंदा जोरात चालवितात. असा एकही महाराज, बुवा, योगी, फकीर, मुल्ला, मुजावर, पाद्री सापडलेला नाही जो अशी करणी सिद्ध करून दाखवेल!!

 पण... 

करणी आहे असे सांगून महाराज-बुवा एक गंभीर गुन्हा करत असतात हे लक्षात घ्यायला हवे. 

साधारणपणे जी व्यक्ती अशा करणी-धरणीवर विश्वास ठेवत असते ती संशय विकृती या मानसिक विकाराने त्रस्त असते. इंग्रजीत यास पॅरानाॅईड पर्सनॅलिटी डिसॉर्डर म्हटले जाते.  या व्यक्ती काम करताना जर एखादी समस्या उद्भवली तर त्या समस्येला तोंड देणे त्यांना जमत नाही. त्याचे कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात काही ना काही दोष असतो. हा दोष त्यांच्या लक्षात येत नाही. या दोषामुळे ते जिथे जातील तेथे समस्या निर्माण करतात. हा दोष प्रामुख्याने असतो अतिसंशयीपणाचा! 

आपल्या या संशय विकृती रोगावर उपचार करण्याऐवजी दुसऱ्याकडे बोट दाखवून त्यावर पांघरूण घालणे आणि संशयास आणखी खतपाणी घालणे हा गुन्हा महाराज-बुवा-मुजावर करीत असतात.त्यामुळे अशा व्यक्ती आणखी मनोविकृत बनत जातात. 

करणी घातलीय आमच्यावर असे म्हणणाऱ्या व्यक्ती कारण नसताना बिनबुडाचा संशय घेत असतात. त्यांना नेहमी असे वाटत असते की दुसरे आपल्या वाईटावर आहेत. दुसरे आपल्याला फसवत आहेत. मित्रांनी वा नातेवाईकांनी चांगल्या हेतूने जर त्याला काही गोष्टी सांगितल्या तर तो त्यावरही विनाकारण संशय घेतो. त्यास नेहमी असे वाटत असते की आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा लोक घेतील. आपला वापर करून आपल्याला संकटात टाकतील. जर कुणी त्याच्याबद्दल काहीही बोलले तर त्याच्या बोलण्यामागे काहीतरी दुष्ट हेतू आहे असे त्याला वाटते. दुष्ट शक्तींवर त्याचा विश्वास असतो. एखाद्या घटनेतही ते दुष्ट अर्थ शोधतात. यामुळे ते सतत दुसऱ्यांना घालून पाडून बोलतात किंवा दुसर्यांचा अपमान करतात. याचा परिणाम असा व्हायला लागतो की ते जर व्यवसाय करत असतील तर गिर्हाईक टिकत नाही. नोकरीत सहकाऱ्यांशी पटत नाही. घरात भांडणे होतात. मित्रांपासून फटकून राहतात. बऱ्याच वेळा अशी काही लक्षणे फेफरे येणाऱ्या रुग्णात ज्याला एपिलेप्सी असे म्हणतात किंवा छिन्नमनस्कता ज्याला स्किझोफ्रेनिया असे म्हणतात या मानसिक रोगातही आढळतात. पण संशय विकृती ही करणी आहे म्हणणाऱ्या रुग्णात जास्त आढळते. 

अशा रुग्णांना महाराज भक्त बनवितात किंवा असे रुग्ण भक्त बनतात आणि मग अमावस्या-नारळ-लिंबू-बंधन बांधणे-परडी सोडणे-नरबळी देणे-बोकड बळी देणे, इत्यादी थोतांडी उपचार बुवा करायला सांगतात. रमाबाई महाराजांचे खरे मानून हे असले उपचार करत राहील तर त्यांना सारे संशय खरेच वाटू लागतील. कारण महाराजांवरील 'श्रद्धा' !!

 करणी सांगणारे बुवाच् बऱ्याच वेळा संशयी मनोविकृतीने पछाडलेले असतात. बऱ्याच वेळा ते शेजारच्याने किंवा भावाने किंवा बहिणीने किंवा चुलत्याने-चुलतीने करणी केली आहे असे बेधडक ठोकून देतात. त्यातून मारामाऱ्या आणि खुनापर्यंत प्रकार घडतात. करणीमागचे मनोविज्ञान जाणून घेऊन त्यावर वैद्यकीय उपचार व समुपदेशन करणे महत्त्वाचे आहे. 

बुवा कडे जाणे नव्हे !!!

..आणि जे करणी काढणारे बुवा ढोंग करत असतात त्यांना कायद्याच्या रस्त्यावरून  तुरूंगात धाडणे महत्त्वाचे. 

ते सरळ खोटे सांगत असतात.

करणीग्रस्तांनी मात्र वैद्यकीय उपचार करणेच योग्य.

- Dr Pradeep Patil

सायबाॅर्गची शेंडी! Antena of cyborg


 शेंडी ठेवली म्हणून विश्वज्ञानी झालो..धर्माभिमानी झालो.. असे समजायचे कारण नाही !

 कारण शेंडी ही तुमचे आयुष्य सुसह्य करू शकत नाही. 

आयुष्य सुसह्य करू शकते ते विज्ञान. 

...आणि हे विज्ञान तुम्हाला जगणे सुंदर करून देते. 

गोष्ट आहे नील हारबीसनची ! विज्ञानाने त्याला शेंडी लावली आहे. शेंडी मंत्रतंत्र करून लावलेली नाही. 

वैज्ञानिक नियम आणि सखोल वैज्ञानिक ज्ञान निल हारबिसनच्या शेंडीत दडले आहे. विज्ञानाने तयार केलेली शेंडी म्हणजेच एक अँटेना आहे. हा अँटेना नील हारबीसनने चक्क डोक्यामधील कवटीमध्ये रोपण करून घेतला आहे. 

अँटेना म्हणजे एका टोकाला वायरलेस कॅमेरा आहे तर जिथे डोक्याच्या कवटीत अँटेना बसवला आहे त्या टोकाला वायरलेस आवाजाचे तरंग ओळखणारी यंत्रणा आहे. 

चक्क डोक्यातल्या हाडांमध्ये अशा पद्धतीनं नीलने का बरे अँटेना बसवून घेतला आहे? 

हा अँटेना बसवून आज सतरा वर्षे झाली आणि डोक्यावर ही अँटेनाची शेंडी घेऊन तो फिरतोय. 

या अँटेनामध्ये वायफाय ची सोय आहे. त्यामुळे नील थेट कृत्रिम  उपग्रहांची संपर्क साधू शकतो. तो दुसऱ्या कुठल्याही तशाच अँटेनाशी संपर्क साधू शकतो. ज्यातून व्हिडिओ, ऑडिओ, चित्रं आणि बरंच काही आदान प्रदान करू शकतो. या अॅन्टेना मुळे थेट मोबाईल कॉल करता येऊ शकतो. 

हे शक्य होते ते "ऐकण्याचे तरंग" मेंदूत त्याला अँटेनामुळे माहिती पुरवतात त्यामुळे !! 

पण नीलला याची गरज होती. का तर, त्यामागे नीलला जन्मताच झालेल्या रोगाचे कारण आहे. 

या रोगामध्ये संपूर्ण रंग ओळखण्याचे आंधळेपण असते. रंग आंधळेपण किंवा इंग्रजीत अक्रोमाटोप्सिया असे म्हणतात. नीलला जन्मताच या रोगामुळे रंग समजत नव्हते. अशा आंधळेपणासाठी उपाय नाही म्हणत देवावर आणि दैवावर सगळे सोडून देण्यास नील तयार नव्हता. 

...आणि मग त्याने विचार सुरू केला की असे एक नवे इंद्रिय तयार करता येईल का जे मला कलर किंवा रंग ओळखायला शिकवेल? 

...आणि या भन्नाट कल्पनेने त्याने सायबॉर्ग आर्ट नावाची संकल्पना शोधली. त्यातून तयार झाले सायबॉर्ग अँटेना. 

हे एक नवीन इंद्रिय ज्यामुळे निसर्गातील वेगवेगळे कलर ओळखता येऊ शकतात. 

म्हणजे हे अँटेना डोक्यात रंगाच्या संवेदना पाठवून देते. नीलने अँटेना स्वतःच्या डोक्यात २००४ सालापासून कायमचा बसवून ठेवला आहे आणि त्याच्या रंग आंधळेपणा वर त्याने मात केली आहे. विशेष म्हणजे यामुळे तो रंग फक्त पाहत नाही तर तो 'रंग ऐकतो'. आणि हे रंग देखील सूक्ष्मात सूक्ष्म असलेले इन्फ्रारेड आणि अल्ट्रावायलेट जे आपण, तुम्ही-आम्ही पाहू शकत नाही ते निल पाहू शकतो !! कमाल आहे ना? 

खरंतर यामुळे जीवाला धोका होऊ शकतो म्हणून त्याच्या डोक्यात अँटेना बसवायला सर्व डॉक्टर्सनी सुरवातीला नकार दिलेला होता. बायोएथिकल कमिटी नेमण्यात आली होती. त्यांनीही नकार दिला होता. पण नीलने गुपचूप डोक्यामध्ये तो एका डॉक्टर कडून बसवून घेतला. नीलने पाच मित्रांना त्यांच्या इंटरनेटवरून नीलच्या अँटेना मध्ये रंग पाठविण्याची परवानगी दिली होती. तो झोपेत असताना सुद्धा असे रंग पाठवून स्वप्नांमध्ये पाहू शकत असे. याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्याने 'द स्ट्रीम' मधून थेट प्रसारित केले. आणि रुबी व्याक्स ने थेट त्याच्या कवटीत फोन वरून कॉल केला. २०१४ मध्ये त्याने एक भन्नाट प्रयोग केला. एका कार्यक्रमात 'टाइम्स स्क्वेअर' येथे जमलेल्या प्रेक्षकांकडून, रंग स्वतःच्या अँटेनात घेऊन, स्टेजवर बरोबर त्या सर्व रंगाचे चित्र रेखाटले ! रंग आंधळेपण असलेल्या व्यक्तीने रंगीत चित्र रेखाटने ही क्रांती होती !! सोलर क्राऊन नावाच्या यंत्रामुळे जगातील विविध कोनातील तापमान सहज ओळखता येऊ शकते हे नीलने दाखवून दिले. आईन्स्टाईनच्या थेरी ऑफ टाईम रिलेटीव्हीटीला घेऊन "वेळेचे भ्रम" किंवा टाईम इल्ल्युजन निर्माण करायचे ध्येय त्याने ठेवले आहे. 

विविध देशात त्याने रंगवलेली चित्रे प्रदर्शित करून वाहवा मिळवलेली आहे. एवढेच नव्हे तर या अँटेनाने नीलने चक्क पोट्रेट तयार केली आहेत. समोर व्यक्तींना उभे करून अँटेना त्यांच्या चेहऱ्यावरील विविध भागांकडे ठेवून त्यातून निघणाऱ्या तरंगांच्या आधारे साऊंड पोट्रेट तयार केली आहेत.

इंग्लंडने त्याला देशात येण्यास प्रतिबंध केला व त्याचा पासपोर्ट नाकारला कारण त्याच्या अँटेना मधून तो महत्त्वाची माहिती गोळा करेल अशी भीती वाटली. नीलने हे माझे इंद्रिय आहे व त्यामुळे मी सुसह्य जीवन जगतो असे अधिकाऱ्यांना पटवून दिल्यानंतर त्याचा पासपोर्ट स्वीकारला गेला. यातून जगभरात नील हा पहिला सायबॉर्ग आर्टिस्ट म्हणून नावारुपाला आला. बारसिलोना येथे तो या अँटेनाचे प्रदर्शन करत असताना तेथील पोलिसांनी त्याच्या अँटेनाची मोडतोड केली. कारण त्यांना वाटले की तो पोलिसांची हेरगिरी करतो आहे. त्यावर नीलने त्यांच्यावर केस दाखल करून माझ्या इंद्रियाची मोडतोड केली हे सांगून न्याय मिळविला. 

त्याच्या देशात त्याला आता कायदेशीर  "सायबॉर्ग" म्हणून मान्यता मिळालेली आहे. 

प्राणी सुद्धा मानवासारखे विचार आणि भावना व्यक्त करतात या चळवळीचा तो सध्या पुरस्कर्ता आहे. म्हणजेच ऍनिमल सायकॉलॉजी याविषयी तो प्रचार करतो आणि 'ट्रान्स स्पेसिस सायकॉलॉजी' करिता तो अनेक उपक्रम राबवतो. नीलचे बघून मून रिबस हिने स्वतःच्या पायात असेच इलेक्ट्रॉनिक इंद्रिय बसवून घेतले आहे. ज्यामुळे तिला जमिनीत होणारे बदल आणि जमिनीतून निघणारे  विद्युत चुंबकीय तरंग यांची जाणीव होते व ते मोजता येतात. भुकंपावेळी हे खुप उपयोगी पडते. ती जगातील आज पहिली महिला सायबॉर्ग आर्टिस्ट समजली जाते. 

नील आणि मून या दोघांनी एकत्र येत सायबॉर्ग फाउंडेशनची स्थापना केली आहे. 

शेंडी लावणे अशी एक म्हण आहे पण ती वेगळ्या अर्थाने. विज्ञानाची ही शेंडी अफलातून असून मानव कल्याणाकडे घेऊन जाणारी आहे. 

तुम्ही ठरवा कोणत्या शेंड्या लावून घ्यायच्या !!

- डाॅ. प्रदीप पाटील

सर्वंच धर्मकृत्यं वंदनीय नसतात !

    देवाचे घर उभारणार्यांनी देवाच्या नावाने पैसे गोळा करून त्यात भ्रष्टाचार केला तर तर तो भ्रष्टाचार या सदरात मोडत नाही ! शेवटी ते धर्मकृत्य...