Friday, September 17, 2021

श्रद्धा-अंधश्रद्धेच्या कचाट्यातून समाजास बाहेर कसे काढता येईल?



 अंधश्रद्धा निर्मूलन ही वैचारिक परिवर्तनाची लढाई आहे.

 वैचारिक हा शब्द मेंदूशी निगडीत आहे. 

मेंदूचे वैज्ञानिक आकलन आज संपूर्ण होणे बाकी आहे. मनोविकार आणि मनोविकृती या दोन पातळ्यापर्यंत, सदोष मनोव्यापाराचे आकलन झाले आहे. 

स्मृति, भावना, बुद्धी, जाणीव-नेणिवेचा व्यवहार, मनोशारीरिक संबंध अशा अनेक गोष्टी आज हळूहळू उलगडत आहेत. बुद्धीचे ठिकाण समजले असले तरी त्याची निर्मिती जैविक आहे की परिस्थितीनुसार आहे की इतर कोणती कारणे आहेत हे अजून निश्चित व्हायचे आहे. 

या मेंदूतून निर्माण होणारी श्रद्धा ही भावना आहे. या भावनांचे सामूहिकीकरण होते तेव्हा त्यातून प्रतीके आणि भावना व्यवहार यांची अनेक तत्त्वज्ञाने जन्माला येतात. भावनिक पातळीवर त्यांचे नियम बनून संहिता-ग्रंथही तयार होतात. काही त्यातील धर्म बनतात तर काही संप्रदाय !! बुद्धीची उत्क्रांती ही मानवाच्या रूपाने उन्नत होत चालली असली तरी ती भावनेच्या उत्क्रांतीच्या इतिहासापुढे फारच नवखी गोष्ट आहे. प्राण्यातून पुढे सेपियन आणि आजचे आपण हे याचे उदाहरण. श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यात प्रभावी काय ठरते आहे ही गोष्ट यामुळे सहज लक्षात येईल. 

भावनिक व्यवहारातून भावनादोष निर्माण झाल्यावर भ्रम, भास, अगतिक भाववृत्ती, समर्पित भाववृत्ती, अशा गोष्टी निर्माण होऊ लागतात. तीच गोष्ट बुद्धीच्या व्यवहाराबाबतही म्हणता येते. विचारविकृती पासून आकलनदोषापर्यंतचे अनेक प्रकार यात मोडतात. बुद्धी व भावनांचा समन्वय योग्य की त्यात दोहोंपैकी एखादेच डावे-उजवे हा वाद अजूनही चालूच आहे. एवढी सारी अनिर्णित अवस्था असताना गांधीवादापासून मार्क्सवादापर्यंतचे हवाले देत अनेक विचारवंत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे मूल्यमापन करतात तेव्हा ते एक नवेच (पण जुनेच) तत्त्वज्ञान मांडत असतात हे दिसून येते. 

म. फुल्यांपासून गांधींपर्यंतच्या कृती मानवांचा इतिहास हा सापेक्ष व विभिन्न आहे. फुल्यांचे सत्यशोधकी बंड हे धार्मिक प्रश्नांना आणि परिणामांना  जेवढ्या खोलवर हात घालणारे ठरले तेवढेच ते अल्पायुषी आणि अप्रिय ठरले. इंग्रज आणि भारतीय यांच्या द्वंद्वातून सारासार विवेकच प्रमाण मानून चालताना अनेक वेळी फुल्यांना वैज्ञानिक प्रगतीच्या अभावी पारंपारिक विचारांचाच आधार घ्यावा लागला आहे. गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीची उभारणी करण्यासाठी अध्यात्मिक आचरणाची आखणी केली. अध्यात्मिक आचरण म्हणजे मूल्यात्मक आचरण नव्हे. कारण धर्ममताच्या मर्यादा आणि बंधने अध्यात्मास पडलेली असतात. या अर्थाने गांधींनी आपली धार्मिकता गडद करीत धर्मभेद व धर्म चिकित्सा केली नाही, तर स्वातंत्र्य चळवळ केली. भारतातील स्थितीशील आणि प्रचलित धार्मिक समुदायास गांधींच्या या उन्नत धार्मिक प्रतिमेची भुरळ पडून 'मसीहा' तयार झाल्यावर लोक स्वातंत्र्यलढ्यात ऊडी ठाकते झाले. गांधींनी केलेला जातिभेद निर्मूलन कार्यक्रम म्हणूनच लोकांनी नाकारला. आंबेडकरांच्या भाषेत 'अव्यवहार्य' ठरला. म्हणजे येथे व्यवस्था सुधारताना शत्रु परकीय, भिन्न धर्माचा, शोषक, अत्याचारी आणि बिन नात्याचा होता. देशबांधव नव्हता.  त्यामुळे ही लढाई आस्तिक्य-नास्तिक्य व श्रद्धा-अंधश्रद्धा यांची नव्हती.  अनेक विचारवंत हे भान न ठेवता "गांधी प्रतीमानास" (माॅडेलला) विवेकाचे अध्यात्मिकिकरण करून स्वीकारण्याचा पर्याय ठेवतात. तो पर्याय फार तर आर्थिक विकास विकृती निवारणार्थ, पर्यावरण संवर्धनास, किंवा तत्सम धार्मिक प्रश्नांच्या निवारणासाठी उपयोगी ठरेल. साधनशुचिता, साध्यविवेक या गोष्टींचे "भांडवल" वापरून या चळवळी करता येतील. अंधश्रद्धा निर्मूलनात एवढेच फक्त येत नाही हे नेहरूंच्या लक्षात आले होते. नेहरू प्रतिमान किंवा माॅडेल हे स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याच भाईबांधवांशी जबाबदारीने करावयाचे कृत्य होते. गांधी-नेहरू प्रतिमानांच्या व्यवस्थेत आणि अंमलबजावणीत इतका टोकाचा फरक होता.

भावनिक देश उभारणीचा आणि धर्मस्वरूप निश्चित न झालेला तो काळ आज सरला आहे. आज सोशल मिडियामुळे नवा काळ समोर आहे. माहिती-तंत्रज्ञानापर्यंतच्या आजच्या वैज्ञानिक युगात प्रश्नांचे संदर्भ पूर्ण बदलले आहेत. तेथे आज गांधी-नेहरू प्रतिमान तर सोडाच पण मार्क्स प्रतिमान सुद्धा अपुरे ठरत आहे. 

बुद्धी विकास हा स्वयंप्रज्ञ असल्याचा दावा करणाऱ्या काहींची फुले-आंबेडकर-गांधी प्रतिमानांच्या प्रभावातून सुटका न होणे हाच खरा तर अंधश्रद्धा निर्मूलनास मारक ठरतो आहे.  कारण विचारवंतांनी दिशा देताना इतिहासाचे आकलन ठेवावे पण जुनाच मसाला भरू देऊ नये. कारण त्यात प्रतिमानांची गुलामीच असते. नवा विचार, नवी दिशा, नवे नियम हे बुद्धिप्रामाण्यवादाबरोबरच वैज्ञानिक वृत्तीचे लक्षण ठरते. इतिहास कुरवाळून शुद्धतावादी, परिवर्तनवादी, शोषण विरोधी, ऐतिहासिक प्रतिमानांचे उन्नयन करून आपण प्रतिगाम्यांचीच नक्कल करीत आहोत हे भान ठेवावयास हवे.

शरीर रोगांच्या अंधश्रद्धा आज गळून पडल्या आहेत. कारण विज्ञानाने या शरीररोगांवरील प्रभावी उपाय दिले आहेत. ज्या क्षेत्रात विज्ञान अजूनही अपयशी ठरत आहे ती क्षेत्रे अंधश्रद्धांना मोकळी आहेत, त्याच क्षेत्रात अंधश्रद्धांचे थैमान सुरू आहे. कोव्हीड रोग हे ताजे उदाहरण आहे.  ध्यानधारणा-रेकी पासून मनोशारीरिक रोगापर्यंतची नवनवीन खुळे बाजारात येतच आहेत. चळवळीचे मूल्यमापन करताना हा अपुरेपणा ध्यानात ठेवावा लागतो. शरीर रोगांच्या अंधश्रद्धा उपचारांना जसे प्रभावी वैज्ञानिक उपचारांचे पर्याय उपलब्ध झाले तसे मनोव्यवहारांच्या विकृतींना-समस्यांना नाही ही चळवळीची आजची मर्यादा आहे. मनोव्यापारातील स्किझोफ्रेनिया, मॅनिया, डिप्रेशन या रोगांवर आज प्रभावी उपचार असले तरीही त्यांचे निवारणातील सातत्य टिकवणारी पद्धती व यंत्रणा अस्तित्वात नाही. जनमानस हे जेव्हा श्रद्धोपचारांकडे वळते, धार्मिक उन्मादांना बळी पडते,  शोषणाचे वाहक बनते, तेव्हा त्यांना गांधी प्रतिमान देऊन धर्मनिरपेक्ष का बनवता येणार नाही, हे इथे समजेल.

 व्यवस्थेतील असंख्य दोष हे मनोदोषांना जन्म देतात हे जसे खरे तसेच जैविक प्रेरणा आणि जैविक तथ्ये हे सुद्धा मनोदोषांचे धनी असतात. 

श्रद्धा-अंधश्रद्धा ही रोगट मानसिकतेची लक्षणे आहेत काय ? असा प्रश्न विचारून व्यवहार्य श्रद्धा, निकोप श्रद्धा, डोळस श्रद्धा, असा एक खेळ खेळला जातो. श्रद्धा हा मानवी व्यवहारांचा पाया नाही; मात्र भयबद्ध मनाचा आधार आहे. त्याचे फायदे तात्कालिक आणि छद्म स्वरूपात असतात. त्यामुळे प्रदीर्घ संघर्षाचा मार्ग सोडून श्रद्धेचा शॉर्टकट प्रचंड लोकप्रिय ठरून आचरणात आणला जातो. नेणिवेत डोकावले तर हा शॉर्टकट व्यक्तीचे मन.. व्यवस्थेचा गाभा.. कर्मविपाकाच्या सिद्धांतापासून, अवैज्ञानिकतेच्या आग्रहापर्यंत व्यापून राहतो. त्याचे एक अर्थकारणही उभे राहते. याला पर्याय आज तरी विवेक व मूल्य वादी समाजरचना हाच आहे. उन्नत धर्म किंवा विवेकाचे अध्यात्मिककरण हा नाही. 

ही भूमिका जमातवाद्यांच्या पथ्यावर पडते असे समजण्याचे कारण नाही. त्याचेही गणित वेगळे आहे. लोक धार्मिक मनोवृत्तीचे आहेत याचा अर्थ ते कर्मकांडी आहेत.. हे गृहीत धरले.. तर उन्नत धर्माच्या आवाहनाने ते धर्मनिरपेक्षतेकडे कसे वळणार? मानसतत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञान या तत्त्वांच्या पातळीवर मांडणी करणाऱ्या वैज्ञानिक पद्धतींनाही हा तिढा अजून सुटलेला नाही. त्याचे कारण मेंदूच्या अपुर्‍या माहितीत दडले आहे, असे सांगितले तर, बौद्धिक अहंकारात चळवळ गुरफटली आहे असे अनेकांना वाटते. 

सामाजिक प्रश्नांचे वैज्ञानिक संशोधन आज निर्णायक अवस्थेत नसताना सामाजिक प्रश्नावर ठोस उत्तरे आहेत असा दावा करणे अवैज्ञानिक आहे. या अर्थाने अंधश्रद्धांचे निर्मूलन कसे होईल हे आज ठरवणे अवघड आहे.

 आजच्या धर्माचे आकलन व्यवहारांचा संदर्भ घेऊन करायचे झाले तर, जनमानस आधाराच्या शोधात आहे. सर्व प्रकारचे आधार ते शोधत आहे. म्हणून धर्म हा कर्मकांड रूपात फोफावतोच आहे, असे म्हणता येईल. 

मानसिक आधार आणि व्यवस्थांची भ्रष्टता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोहोंत सुधार करणे हे वरील कारणाने अशक्य बनले आहे.

 अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही आज तरी अनेक श्रद्धा-अंधश्रद्धा फक्त ऐरणीवर आणण्याचे काम करीत आहे. त्यांचा निरास, त्यासाठीचे पर्याय, याची मांडणी अजूनही चळवळीने केलेली नाही. त्याची अनेक कारणे आहेत पण म्हणून चळवळीच्या प्राथमिक अवस्थेतच ती दिशाहीन ठरवणे योग्य नाही. 

जागतिकीकरण, भांडवलशाही, विस्तारीकरण, अस्थिर राजकारण, आदी अनेक कारणामुळे अर्थव्यवस्थेची रूपे पालटत आहेत. अर्थव्यवस्था ही सर्व व्यवस्थांचे मूळ आहे असे गृहीत धरून समाज भ्रमांचा वेध घेता येणार नाही. अमेरिकेसारख्या अर्थगर्भ राष्ट्रातही अंधश्रद्धांचे प्रमाण विकसनशील-अविकसित राष्ट्रांइतकेच आहे.

पर्यायाअभावी श्रद्धा-अंधश्रद्धा यांची अदलाबदल करून जनमानस या वेगाने बदलणाऱ्या प्रक्रियांना सामावून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे व्यवस्थांमधील अव्यवस्था आणि श्रद्धा-अंधश्रद्धा यांचे साटेलोटे सुरू आहे. हे पाहता धर्म व्यवहाराचे स्पष्टीकरण या रूपात मिळत जाते. म्हणजे व्यवस्था आणि धर्म या जगण्याचा दोन्ही पातळ्या कशातून भ्रष्ट झाल्या आहेत? जैविक प्रेरणांतून? मेंदूत अजूनही असलेल्या एक तृतियांश प्राण्याच्या भागातून? डार्विनच्या उत्क्रांती तत्त्वाच्या "संघर्षवान टिकेल" या तत्त्वातून? बरस्ट्रंड रसेल ने मांडलेल्या "भीती" या मूलभूत भावनेतून? नैसर्गिक उत्पातांच्या अस्थिरतेतून? या व अशा वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत व्यवस्थांचे धार्मिक व मार्क्स प्रणित मूल्यमापन अपुरेच ठरणार ! 

...म्हणूनच धर्म ही शक्ती नव्हे तर व्यवस्थांमधून टिकून राहण्यासाठी वापरली जाणारी युक्ती आहे !! 

ती ठिसूळ आहे कारण विज्ञानाच्या शोधांमधून तिची अनेक अंगे ढासळत चालली आहेत. 

मूल्यांची वैज्ञानिक मांडणी जेव्हा अस्तित्वात येईल तेव्हा कदाचित ती पूर्ण कोसळलेही पण ही भूमिका पाहता अंधश्रद्धांचे निर्मूलन ही व्यवस्थांच्या सुधारणेद्वारे (समता, समान संध्या वगैरे) होईल हे अर्धसत्य आहे. 

...म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलनात अपूर्णता आहे. विज्ञान-वैज्ञानिक दृष्टिकोन या आधारे चालणाऱ्या या चळवळीस विज्ञानाच्या मर्यादा सध्यातरी आहेत हे उघड आहे. आणि प्रतिगाम्यांचा विरोधही होत राहणार हेही उघड आहे.  

आज एवढेच म्हणणे योग्य होईल की अंधश्रद्धा निर्मूलन हा सामाजिक प्रश्नांचा, व्यवस्था विकृतींचा व मानवाच्या समाजाच्या स्वत्वाचा शोध  घेणारा एक प्रयोग आहे. 

प्रयोग चालू आहे. 

निष्कर्षांचे नंतर पाहू!!

- डाॅ.  प्रदीप पाटील.

1 comment:

सर्वंच धर्मकृत्यं वंदनीय नसतात !

    देवाचे घर उभारणार्यांनी देवाच्या नावाने पैसे गोळा करून त्यात भ्रष्टाचार केला तर तर तो भ्रष्टाचार या सदरात मोडत नाही ! शेवटी ते धर्मकृत्य...