Friday, September 17, 2021

माणसे मेली..विचार नाही!


 थोर विचारवंत थॉमस हाॅब्ज- जॉन मिलर-जाॅन लाॅक यांच्या काळात इंटरनेट नव्हता. 

नव्हता ते बरे झाले... 

कारण विचार स्वातंत्र्याची कत्तल तेव्हा सहज झाली असती. 

विचारांचा प्रतिवाद करण्यासाठी आज इतकी सहजसोपी साधने हाती आली आहेत की त्यांचा स्वैर वापर गोठवून टाकतोय.  विचार मारण्यासाठी बंदुकांचा वापर ही आता मुक्तपणे होतो आहे. 

विचारांनी विचार मारायचे असतील तर त्यासाठी आपल्याकडे अत्यंत प्रभावी यंत्रणा हवी. कारण जागतिकीकरणाने विचार मारणे तर सोडाच धक्का लावणे ही अवघड करून ठेवले आहे. 

होय, मी त्याच अक्राळ-विक्राळ पसरलेल्या सत्ते बद्दल म्हणतोय. घटनेने आपल्याला सात स्वातंत्र्ये देऊ केली आहेत पण ही स्वातंत्र्ये उपभोगण्यासाठी आज परिस्थिती बिघडलेली आहे. 

आपण विचार मांडतो आहोत तो समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा, जातिअंताचा, धर्मनिरपेक्षतेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, विवेकाचा, शोषणाविरुद्धचा, सत्याचा आणि सत्यशोधनाचा. 

आपले दृष्टिकोन, विचार, समजुती आणि वैज्ञानिक रित्या सिद्ध झालेली तत्त्वे किंवा गोष्टी सांगण्याचा आपणास कायदेशीर अधिकार आहे. जगभरातील सर्व राष्ट्रांना त्याचे महत्त्व ठाऊक आहे. भारतात तर सम्राट अशोकाने सर्व जगातील तत्त्वज्ञानाच्या अगोदर विचार स्वातंत्र्याचे बीज रोवले आहे.

 म्हणजे विचारस्वातंत्र्याचा आपण पुरेपूर वापर करू शकतो. तो करीत राहणे याचाच अर्थ सद्सद्विवेकाचा प्रचार करणे होय. निर्भयपणे आपण तो करीत आलो आहोत. पण तो करीत असताना विचार स्वातंत्र्याची गळचेपी ही सोसत आलो आहोत. हिंदू धर्मातील विषमता मोडताना  फुले-आंबेडकरांनी ती पुरेपूर अनुभवली. पण आज परिस्थिती बिकट आहे.  जिओर्दानो ब्रूनो ला जिवंत जाळण्यात आले. चार्वाकांना मारण्यात आले. ती ही एक परंपरा आहेच. ..विचारस्वातंत्र्याचा गळा घोटणारी, बंधने लादणे अटक करणे, पुस्तके जाळणे, खोट्या वार्ता पसरविणे, खोटी गोष्ट सत्य म्हणून ठासून सांगणे, विचार सांगणार्यासच संपविणे, अशा पद्धती विचार स्वातंत्र्याचे शत्रू अवलंबत आहेत. हिटलर, नाझी, शोषक ब्राह्मण्य संस्कृती अशी अनेक उदाहरणे देता येतील. गांधींना मारणे आणि मारल्यावर गांधींच्या विचारांचा सोयीस्कर वापर करणे ही एक पद्धती आहे. थोडक्यात इथे राजकारण शिजते. राजकारणात प्रतीकांचा, प्रतिमांचा आणि प्रगत विचारी नेत्यांचा वापर करून आपली पोळी भाजून घेतली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर "हिंदू राष्ट्रपुरुष" होते असा प्रचार प्रतिगाम्यांनी करणे हा पोळी भाजण्याचा हाच प्रकार आहे. म्हणजे इथे विकृत राजकारण भरास आले आहे. विकृत राजकारण हा विचारस्वातंत्र्याचा मोठा शत्रू आहे. कारण विचार स्वातंत्र्य नव्हे तर सत्य विचार दडपण्याची ताकद या राजकीय खेळीत असते. राजकीय ताकद सत्तेत आली तर तिचा उन्माद  वाढवितो तो पैसा.  विचार फैलावण्याचे सामर्थ्य अर्थकारणातून येते. निर्बुद्ध राजकीय समज असलेल्यांचा  ब्रँड केवळ काही महिन्यात घरोघरी पोहोचविणे हे भांडवलदारांमुळे शक्य झाले आहे. सामान्यांचे विचार अर्थकारण कसे बदलविते त्याचे हे उदाहरण. "विचार बदलविणे तसे कठीण काम नसते" असा राक्षसी विचार बाळगणारे भांडवलदार यावेळी आपण यशस्वी झालेले पाहिले आहेत व पहात आहोत.

संस्कृती विचार रुजविते. म्हणूनच तर एक प्रकारची मानसिक गुलामगिरी सर्वदूर पसरलेली आहे.  सांस्कृतिक् गुलामगिरी धर्माच्या आश्रयाने जेव्हा भिनते तेव्हा विचारस्वातंत्र्य म्हणजे एक शिवी बनते. आणि भांडवलदार येऊन मिळाले की, ती संस्कृती 'ईश्वरी' आणि 'श्रद्धेची" बनते. मग श्रद्धांचा व्यापार जरी चालू असेल तर गुलाम झालेले त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आंधळे विचार स्वीकारलेली ही संस्कृती विचार स्वातंत्र्याची सर्व कवाडे स्वतःहूनच बंद करून घेते. 

समृद्ध पुरोगामी व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारलेली चिकित्सक संस्कृती असते. बुरसटलेले आणि तखडबंद विचार पाळणारी एक संस्कृती असते. ..आणि या दोन्हींच्या मध्ये हेलकावे खाणारी एक संस्कृती असते जी गोंधळलेल्या विचारांनी सैरभैर असते. ती ठाम नसते. इथे विचारस्वातंत्र्य भुसभुशीत बनते. 

विचारस्वातंत्र्य जेव्हा संपविण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्यामागील कारणे, दुसऱ्यांचे अविचार स्वातंत्र्य हे असते. विचार करणाऱ्यांची समजूत अशी असते की विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा. शस्त्रे उचलू नयेत. कारण त्याचा परिणाम शून्य होतो. कोणत्याही युद्धात असो नाही तर संहारामध्ये असो, शाश्वत मूल्ये नष्ट झाली आहेत असे दिसत नाही. धर्म किंवा मोठ्या जनसमुदायांना जेव्हा अस्मिता मिळतात तेव्हा आपसूकपणे त्यांच्यात विचारस्वातंत्र्याला नकार उत्पन्न होतो... आणि असे उन्मत्त समुदाय..विरोधी विचारधारा स्वीकारलेल्यांची कत्तल करतात. आपण म्हणतो माणसे मेली, विचार नाही.

(पुर्वार्ध)

- डाॅ.  प्रदीप पाटील


मूल्यांना प्रमाण मानून जो विचार फैलावतो तो टिकतो यात शंका नाही. कारण नीती आणि विवेक यांचा उपयोग व परिणाम समूहांच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यात मुख्य स्थानी असतात. म्हणूनच व्यक्तीपेक्षा विचार प्रमाण मानून जगणार्यांचा नेहमीच आदर होतो. त्यांचे स्थान अबाधित राहते. 
व्यक्तींनी निर्माण केलेली मुल्यं मानणारा जनसमुदाय खूप मोठा आहे. त्यांना ते देव, विभूती, संत म्हणतात. पण त्यांची मुल्यं ही विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कसोटीवर खरी उतरली तरच त्या व्यक्ती जगावेगळ्या ठरतात. ज्या उतरत नाहीत त्यांच्या पदरी बदनामी येते. पॅरिसमध्ये सेंट बार्थीलोमेवच्या दिवशी पंधराशे बहात्तर मध्ये तीस हजार माणसांची कत्तल करण्यात आली. कॅथोलिक ख्रिश्चनांनी प्रॉटेस्टंट ख्रिश्चनांची केलेली ही कत्तल होण्यास नवव्या चार्ल्स् ची बहिण मार्गारेट हिने तिसऱ्या हेन्रीशी तो प्रॉटेस्टंट असूनही लग्न केले म्हणून, कारण झाले. इतिहासातील ही पहिलीच कत्तल. पण म्हणून प्रॉटेस्टंट संपले नाहीत. आणि भारतात ही चार्वाक संपले नाहीत. 
विचार स्वातंत्र्य हे व्यक्तीच्या व्यक्त होण्यातून वाढत जाते. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य रोखण्यासाठी प्रतिगामी विचार सतत प्रयत्न करतात किंबहुना त्यांचा तोच अजेंडा असतो. जर आपले विचार धारदार असतील, त्यांना आव्हान देणे अवघड नव्हे शक्यच नसेल तर त्या विचारांना संपविणे शक्य नाही. संपवणे शक्य होईल ते व्यक्त करणाऱ्यांना ! तसे घडते हेही आपण पाहिले. मग यासाठी आपल्याला जी पद्धत अवलंबावी लागते ती बहुपदरी होते. 
बहुपदरी याचा अर्थ खूप मोठा आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, असे अनेक पदर समाजात आहेत. या साऱ्यांविषयी भूमिका निश्चित करणे महत्त्वाचे आहे. ही भूमिका व्यक्तीसापेक्ष न घेता, विवेक आणि वैज्ञानिक दृष्ट्या घेतली तर ती योग्य ठरेल. भूमिका घेताना, ती, व्यक्ती व ग्रंथ सापेक्ष बनली, तर विचार कमकुवत बनतात. विचारांना विचारांनी आव्हान देणे सोपे जाते. जर भूमिका निर्विवाद विचारांच्या बनल्या तर विचारवंतांना एकत्र येणे सोपे जाते. नाहीतर मतमतांतरांचा गलबला होतो. 
समाजाचे जे विविध पदर आहेत त्यात अनेक विचार घट्ट रुतलेले आहेत तर अनेक ठिकाणी अजूनही विचार तयार झालेले नाहीत. म्हणजे विचारांमध्ये असलेले वेगवेगळे रंग आणि नसलेले रंग याचे भानही ठेवणे आवश्यक आहे.
 थोडक्यात विचारस्वातंत्र्य ही गोष्ट विचारांच्या मजबुतीवर ठरते व टिकून राहते. इथे आपणास आता थोडे थांबून वेगळा विचार करायचा आहे. 
धर्म सोडणे आणि ईश्वरनिंदा करणे यासाठी जगभरातील १९ देशांत आजही शिक्षा केली जाते व त्यापैकी १२ देशांत तर मृत्युदंड दिला जातो. जानेवारी १४ ला सौदी अरेबियात निरिश्वरवादी व नास्तिक असणे म्हणजे दहशतवादी असणे असा कायदा संमत करण्यात आला आहे. अशीच परिस्थिती ईजिप्त, मलेशिया, नायजेरिया, इराक, सीरिया या राष्ट्रांत आहे. सनल एडामारुकु यांनी भारतात "येशुचे अश्रू" विषयी सत्य कथन केले म्हणून ख्रिश्चन धर्माने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विचार स्वातंत्र्यावर घाला घालणारी अशी अनेक उदाहरणे आहेत आणि दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश सारखे अनेक जण या विचार स्वातंत्र्यासाठी बळी जात आहेत. 
जगभरात सर्वत्र धर्म हा प्रबळ आहे त्यामुळे धर्म आणि त्यात या धर्मांचे देव यांच्या विषयी टीका करणे किंवा विरोधी विचार व्यक्त करणे गुन्हा ठरविण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षणातून, वृत्तपत्रातून, वेबसाईटवरून, पुस्तके लिहून व सिनेमातून विचार व्यक्त केले जे धर्म-देवाच्या विरोधात आहे अशांना तुरुंगात पाठविले जात आहेत. याचा अर्थ देव-धर्माने जे काही सांगितले आहे ते मुकाट्याने पाळा. विचार व्यक्त करू नका. जे देवधर्म मानीत नाहीत त्यांच्या विरोधी कारवाया करणे हा खरे तर गुन्हा आहे पण धर्मांचे वर्चस्व असलेली जगभरातील सरकारे विचारस्वातंत्र्याचा गळा घोटीत निघाली आहेत असे आजचे चित्र आहे. आणि हे चिंताजनकही आहे. 
याचा अर्थ विचार स्वातंत्र्याची लढाई ही जशी धर्म-देवा विरुद्ध आहे तशीच ती सत्तेशीही आहे. आणि याबाबतीत विचार स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते कुठेही जवळपासही गेलेले  नाहीत. सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी म्हणून विचारस्वातंत्र्याचा आम्ही पुरस्कार करीत नसू तर अविचार स्वातंत्र्य निरंकुशपणे सर्वत्र अबाधित राहील. 
सत्ता, प्रसारमाध्यमे आणि शिक्षण या तीनही क्षेत्रात विचार स्वातंत्र्यवादी अपवादाने आहेत. आणि अविचारस्वातंत्र्यवाद्यांची जमेची उत्तम बाजू आहे. आर्थिक धोरणे, सरकारी योजना, आंतरराष्ट्रीय घडामोडी व आपले धोरण, विषम समाजव्यवस्था आणि सरकार या बाबतीत आपल्या भूमिका नक्की होत गेल्याशिवाय सत्तेला आपण बिलगू शकणार नाही. याचा अर्थ विचारस्वातंत्र्याचा झेंडा रोवण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.
 मग आपण याविषयी काय धोरण आखणार आहोत? अर्थातच विचारस्वातंत्र्यच नव्हे तर समतेचा हक्क मिळविण्याचे स्वातंत्र्य, भेदभावापासून मुक्ती मिळविण्याचे स्वातंत्र्य, जगण्याचे स्वातंत्र्य व सुरक्षिततेचा हक्क मिळवण्याचे स्वातंत्र्य, गुलामीपासून मुक्तता मिळवण्याचे स्वातंत्र्य, कायद्यासमोर सर्व समान असण्याचे स्वातंत्र्य, शिक्षण मिळवण्याचे स्वातंत्र्य, अशा अनेक स्वातंत्र्यासाठी आता चिकाटीने आणि दूरदृष्टीने लढावे लागणार आहे. 
विचारस्वातंत्र्य हा आपला श्वास आहे असे आपण मानत असू तर लढाई सोपी होईल हे लक्षात ठेवलेले बरे !
-डाॅ. प्रदीप पाटील 
(उत्तरार्ध)


No comments:

Post a Comment

सर्वंच धर्मकृत्यं वंदनीय नसतात !

    देवाचे घर उभारणार्यांनी देवाच्या नावाने पैसे गोळा करून त्यात भ्रष्टाचार केला तर तर तो भ्रष्टाचार या सदरात मोडत नाही ! शेवटी ते धर्मकृत्य...