नैतिक वागण्यासाठी
धर्माची खरंच गरज आहे का?
मानवी मूल्ये, सदाचार यांचे आकर्षण मानवाला सतत वाटत आले आहे.. स्वार्थ-निस्वार्थ या दोघांची लढाई सतत त्यांचे जीवन व्यापून राहते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा सर्वच स्तरांत मुल्यवादी होऊन जगण्यासाठी धर्मात आधार शोधला जातो. धर्म आता या बाबतीत कालबाह्य होत असला तरी अशी कोणती प्रणाली, विचारधारा, मूल्यवादाकडे नेईल हा प्रश्न आजकाल तत्वज्ञानाच्याच पातळीवर न राहता जैविक विज्ञानाच्या आधारे धुंडाळण्यास सुरुवात झाली आहे. हा वैज्ञानिक शोध घेणारे... "ओरिजिन्स ऑफ व्हर्च्यू" हे पुस्तक कमालीचे धक्के देणारे आहे. ऑक्सफर्ड मध्ये प्राणिशास्त्र विषयावर संशोधन केलेले आणि नंतर पत्रकारितेत उतरलेले मॅट रिडली यांनी जैविक पाया शोधत मूल्यांचा शोध घेत काही निष्कर्ष काढले आहेत. या पुस्तकातील 13 प्रकरणात सर्वांगाने सद्वर्तनाचा ऊहापोह करण्यात आला आहे. सुरुवातीसच लेखकाने झारच्या राजवटीत अराजक माजविण्याचा आरोप असलेल्या प्रिन्स पीटर क्रॉपोटकीनचे तुरुंगातून पळून जाण्याचे उदाहरण दिलेले आहे. त्याचे पळून जाणे हे त्याच्या अनेक सहकार्यामुळे शक्य होते. त्यानंतर लंडनमध्ये आयुष्याच्या शेवटी त्याने 'म्युच्युअल एड' नावाचे पुस्तक लिहून त्यात थॉमस हेन्री हक्सले च्या विचारांचा प्रतिवाद करताना म्हटले...
सफल आयुष्य म्हणजे प्रत्येकाचे सर्वांशी युद्ध असे नसून एकमेकांशी सहकार हेच आहे.
पण त्याचे हे म्हणणे किती खरे होते? लेखक म्हणतो, क्रोपोटकिनचे म्हणणे अर्धसत्य होय. आपण शोधून काढलेल्या नियमांनी समाज न चालता उत्क्रांत होत असलेल्या पूर्वग्रहांनी चालतो ! आपल्या जैविक प्रेरणा यांचा तो नियमात व्यक्त करण्याचा अविष्कार होय. स्वार्थ हा शब्द मानव जातीत दुर्गुण समजला गेला आहे. खून, चोरी, बलात्कार, भ्रष्टाचार यामागे स्वार्थ तर, सहकार, निस्वार्थ, उदारता, सहानुभूती, विनम्रता हे सदाचार समजले जातात. समूहाचे भले होणे असा हेतू यामागे असतो. कामाची विभागणी करून ते साध्य करण्याचा प्रयत्न माणूस कसा करतो ते 'द व्हिजन ऑफ लेबर' या दुसऱ्या प्रकरणात लेखकाने सांगितले आहे. ॲडम स्मिथचे उत्पादकता आणि किंमत याचे गणित कामाच्या वाटपावर उभारलेले होते. मानवी 'दुर्गुणातून' सामाजिक फायदे होतात हे स्मिथचे मत लेखकास मान्य नाही. एकमेकांच्या नफा मिळवण्याच्या स्वार्थातून समाज आणि जगाचे नफ्याचे तत्वज्ञान उभे राहते. आपल्या पूर्वजांत नवरा-बायकोतील व्यवहार हाही असाच होता.
' द प्रिझनर्स डिलेमा' या तिसऱ्या प्रकरणात जेव्हा स्वार्थ आणि सामुहिक चांगुलपणा यांचा झगडा होतो तेव्हा सारेच कसे नष्ट होतात हे स्पष्ट केले आहे.
एकाची यशस्विता समूहास उपकारक नसेल तर ती हेटाळली कशी जाते हे तीन लक्ष पौंडांची लॉटरी जिंकलेल्या मऊरा बर्कच्या उदाहरणातून दिसते. मग माणसे बक्षिसे का देतात? समोरचा माघार घेऊ नये म्हणून किंवा दुसऱ्याने चांगले म्हणावे म्हणून किंवा पत रहावी म्हणुन किंवा उपकाराचे ओझे ठेवायचे म्हणून? खरा निस्वार्थी माणूस बक्षीस देणारच नाही. कारण परतफेडीची उजळणी तो करत नाही.
'थेअरिज ऑफ मोरल सेंटीमेंटस' या प्रकरणात देवा बरोबरचा नैतिक किंवा मोरल व्यवहार येतो ज्यास व्यापार असं म्हणता येईल. अलीकडचे विचारवंत म्हणतात की या व्यापारात भौतिक स्वार्थापेक्षा इतर गोष्टी प्रभावी ठरतात. वटवाघळे, मुंग्या, बबून्स, यांच्या अभ्यासातून या इतर गोष्टी कोणत्या ते लेखकाने सांगितले आहे.
सर्व मानव जात निस्वार्थ लोकांना मानते. बहुसंख्यांनी निस्वार्थ होणे आपणास चांगलेच असते आणि आपण व आपले नातेवाईक यांचा स्वार्थ साधणे हेही चांगलेच असते. हाच तो प्रिझनर्स डिलेमा. हेच नैतिक भावनांचे सिद्धांत.
'द सोर्स ऑफ वॉर' या प्रकरणात लेखक म्हणतो की प्राण्यांमध्ये स्वतः ऐवजी कळपाचे भले व्हावे ही इच्छा असते असे जीवशास्त्रज्ञांना कमी प्रमाणात आढळले आहे. मग माणूस वेगळा कसा? परंपरा, रूढी, ज्ञान, समजुती यातून तो इतरांहून वेगळा. यात अगोदरच्या पिढीची नक्कल करणे हा घटक महत्त्वाचा आहे. मग ते धर्माचे असो नाझीचे वा माओवादी चीनचे! स्थानिक श्रेयसाची नक्कल, सांस्कृतिक नक्कल, भयानक विरोध, सामूहिक बचाव, वेगळे गट बांधणे, हे सारे एकत्र येऊन स्वार्थ प्रवृत्तीकडे प्रवास करतात. लोक असे आंधळे अनुकरण का करीत असतात हे शोधताना लोकप्रिय पाच कारणे या ऐवजी 'माहितीचे लहान धबधबे' हे कारण योग्य असल्याचे दाखवले आहे. म्हणजे इथे व्हाट्सअप फेसबूक इत्यादी सोशल मीडियावरील हे माहितीचे लहान धबधबे किती महत्त्वाचे ठरतात हे लक्षात येईल. ते समूहाशी एकनिष्ठ राहतात कारण त्यांचा स्वार्थ कोणता ते समूह जाणतो व ही माहिती तो प्राप्त करतो म्हणून.
टीम स्पिरीट रहावे म्हणून एकत्रित नाच आला आणि समूहाशी बांधीलकी दाखवण्यासाठी संगीत आले. मग ते मंत्र, फुटबॉल, गीते वा राष्ट्रगीते असोत. यातून आम्ही व ते असे फरक आले.
'इकॉलॉजी अॅज रिलिजन' प्रकरणात लेखकाने आजच्या अतिरेकी पर्यावरणवाद्यांचे वाभाडे काढले आहेत. जंगलातील आदिवासी पर्यावरण रक्षक आहेत हे साफ खोटे आहे. पर्यावरण हेच मुळी विविध जीवांच्या संघर्षावर आणि नाशांवर उभे आहे. तंत्र-मंत्र आणि धार्मिकीकरणाने तर पर्यावरणाचा अधिकच र्हास झाला आहे.
'द पाॅवर ऑफ प्राॅपर्टी' या बाराव्या प्रकरणात वित्ताचे देशीकरण करणे कसे धोक्याचे आहे व सदाचारविरोधी ठरते हे सांगितले आहे. यात उत्तर भारतातील अलमोर जिल्ह्यातील व 1921 मधील वन पंचायत अॅक्टचे उदाहरण आहे. योजनांचे विकेंद्रीकरण हे योग्य आणि मानवी मूल्यांचे जास्तच जपणूक करणारे ठरते. वित्त रक्षणाची हमी नसल्याने तिसऱ्या जगात दारिद्र्य आहे. वित्त निर्मिणे हे सदाचारात बसत नाही आणि त्याचा साठा हा तर भयंकरच, व तो सामाजिक बहिष्कार आणि मत्सरांना जन्म देणारा ठरतो.
'ट्रस्ट' या शेवटच्या प्रकरणात मानवी मूल्यांची निर्मिती वैज्ञानिक तथ्थांचा आधार घेत कसे करता येईल याचे सुंदर विवेचन आहे. मानवातील कलह आणि शोषण रचना हे मानवाच्या डोक्यातून उगम पावतात. निसर्ग, संगोपन, सरकार, हाव, देव ही बाह्य कारणे आता टाकून द्यायला हवीत. एकमेकांवरचा विश्वास आपणास चांगल्या मुल्यांकडे नेईल. थॉमस हॉब्जचा वाईटपणा विरुद्ध जीन जॅक्स रोसाऊचा चांगलेपणा असा हा वाद आहे. हॉब्ज-स्मिथ-माल्थस-डार्विन असे वास्तव खोदणारी परंपरा त्यातून आता ती स्टीफन गुल्ड- डॉकिन्स पर्यंत आलेली आहे. विश्वास हा आहे की वैज्ञानिक विचार पद्धती मूल्यवादी समाजरचनेकडे नेईल.
मॅट रिडलीने हे अतिशय ओघवत्या भाषेत सहज समजेल अशा शैलीत पटवून दिले आहे. मानवाच्या मूलभूत प्रेरणा आणि मूल्यवादी समाजरचना यांची सांगड कशी घालायची या प्रश्नाचे बव्हंशी उत्तर या पुस्तकातून मिळते. देव-धर्माशिवाय चांगले कसे जगावे असे वाटणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.
- डाॅ. प्रदीप पाटील
https://lm.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fviralrumour.com%2Fkaali-jadu%2F&h=AT093xARkXL3pnwzDh2528sFxlUTW5b0skpDprEG8LZ26BopBvZqN56PMlOIPev6m3xV_xI0lfyd5G1a9ysKObWVGtK6GHa-dL8KFWJTR7GghQrhsT5ibozXzLN-ZSztrVTU8I7dlhiioLSJkKR8
ReplyDelete