Friday, September 17, 2021

मनोशारीरिक व्याधी

 "हे बघा डॉक्टर, डाव्या हाताची ही... खांद्यापासून या या बोटापर्यंत येणारी शीर आहे बघा.. ही सारखी सुंद होते ! कधी ठणकते आणि सारख्या मुंग्या येतात बघा.. "

जगुबाई सांगत होती. 

मी रिपोर्ट पाहिले. ती अनेक वर्षे उपचार घेत होती. विटामिन्सची  इंजेक्शनं तीने घेतली होती. वेदनाशामक गोळ्या तर किती खाल्ल्या असतील त्याची गणतीच नाही. मानेचा, हाताचा एक्‍स-रे काढला. काहीच त्यात सापडले नाही. जगुबाई जी शीर दाखवत होती ती मुळात शीर नव्हतीच. कारण अॅनाटॉमी नावाच्या शरीररचना विज्ञानानुसार ती दाखवत असलेल्या शीरेच्या जागा चुकीच्या होत्या. याचा अर्थ जी शीर तिच्या शरीरात अस्तित्वातच नव्हती, ती दुखत आहे असे ती का सांगत असावी? 38 वर्षाच्या जगू बाईचा नवरा, मुले सारेच वैतागलेले. कारण शिरेतल्या मुंग्यांनी त्यांच्या डोक्याला मुंग्या आणलेल्या होत्या !!

"जगुबाई...हल्ली बरेच रोग निघालेत... आपल्या नातेवाईकांना, कितीतरी जणांना कोण कोणते रोग होतात बघा कळतच नाही..." हे मी माझ्या पहिल्याच कौन्सिलिंग सेशनमध्ये जगूबाईशी गप्पा मारताना म्हणालो. तशी जगूबाई खुलली. म्हणाली, 

"डॉक्टर, माझ्या चुलत बहिणीला मागल्याच वर्षी मरण आलं आणि......."

मग त्यानंतर तिने सर्व कथा मला ऐकवली. 

जगुबाईची चुलत बहीण राणूबाईच्या दोन्ही हातात मुंग्या यायच्या आणि हात सुंद व्हायचे. त्यानंतर तिच्या शरीरातील इतर काही नसांमध्ये बिघाड झाला. मग तिला उठता बसता येईना. जेवण कमी होत गेले. मग मोठ्या हॉस्पिटलात ऍडमिट केले. तेव्हा जगूबाई तिला बघायला हॉस्पिटलात गेली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राणूबाई वारली.  त्यानंतर चार महिन्यांनी जगूबाईच्या हाताला मुंग्या सुरू झाल्या !! 

"कधीकधी खूप भीती वाटते.. ही शीर बाद झाली तर?" 

जगुबाई घाबरलेल्या चेहऱ्याने मला विचारत होती. 

जगुबाईचा हा रोग शारीरिक नव्हता. ना तीची शीर बाद झाली होती. ना तीला गंभीर कुठलातरी रोग जडला होता. आपल्यालाही राणूबाई सारखा आजार झाला तर ? या समजुतीतून तिच्या हाताला मुंग्या येणे चालू झाले होते. थोडक्यात ही समजूत मनामध्ये पक्की झालेली असल्याने हळू हळू एक आजार "तयार" होत जातो. हा असतो मानसिक विचारांचा आजार. जेव्हा केव्हा ताण वाढेल तेव्हा आपण घट्ट धरून ठेवलेल्या चुकीच्या समजुती उफाळून वर येतात आणि त्याची तथाकथित लक्षणं दिसायला लागतात. ती फक्त पेशंटलाच दिसतात. ती डॉक्टरांना किंवा इतरांना दिसत नाहीत. म्हणजे इथे मनातील समजुती या शारीरिक लक्षणं निर्माण करतात. ही लक्षणं रोगाची नसून मानसिक समस्या जी निर्माण झालेली असते त्याची असतात. म्हणून या व्याधीला मनोशारीरिक व्याधी म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये "सोमॅटोफॉर्म डिसॉर्डर" म्हणतात. पुर्वी याला हायपोकाँड्रियासिस  म्हणायचे.  खरेतर ही विचार विकृती आहे. हा रोग नव्हे. 

जगुबाईच्या डोक्यात बसलेली ही घट्ट समजूत तिच्या हातात मुंग्या निर्माण करत होती. जगूबाईला वेळीच माझ्याकडे आणल्यामुळे मी तिच्या मनातून ही समजूत जाण्यासाठी, पहिल्यांदा, ती समजूत कशी आली आणि कशी तयार झाली आणि ती समजूत ही लक्षणे कशी निर्माण करते हे तीला सांगितले. रोग होईल ही भीती याच्या मुळाशी असते. ज्याला नोसोफोबिया म्हणतात. यासाठी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी नावाचे तंत्र वापरले. जगुबाईच्या हाताच्या मुंग्या संपूर्ण नाहीसे होण्यासाठी पुढे आठ महिने जावे लागले. पण त्यासाठी मी सांगितलेला मानसिक व्यायाम इमानेइतबारे करण्याचे श्रेय तिचेच. 

अशी अनेक उदाहरणे आपणास दिसून येतात. उदाहरणार्थ... 

छातीत सतत डाव्या बाजूला दुखणे आणि समजूत मनात बाळगणे माझे हृदय बाद झाले आहे आणि मला हार्ट अटॅक येणार! 

पोटात विशिष्ट ठिकाणी दुखणे आणि समजूत अशी बाळगणे की पोटात गाठ झाली आहे किंवा अपेंडिक्स झाला आहे.

 डोके सतत दुखणे यामागे समजूत अशी असते की डोक्यात बहुदा ट्यूमर झाला असावा किंवा एखादी गाठ असावी ! 

वजन कमी होतंय मग नक्कीच एडस् रोग झाला असणार.

या सर्व चुकीच्या समजुती असतात आणि त्याच रोग निर्माण करतात. या जर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राहिल्या तर मात्र तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. 

अशा समजुती बाळगणारे पेशंट एका डॉक्टरकडे कधीच टिकत नाहीत. ते एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे सतत फिरत राहतात. ते सतत वेगवेगळ्या चाचण्या आणि तपासण्या करत राहून अनाठायी खर्च करत राहतात. जर या समजुतींना आधार देणारी अशी एखादी श्रद्धा जर त्यांनी उचलली तर त्यांचं हे दुखणं तात्पुरतं नाहीसं होतं. म्हणजे जर ते एखाद्या महाराजाकडे गेले किंवा मांत्रिकाकडे गेले आणि त्यांनी अंगारा-भंडारा दिला आणि आता त्यांचा रोग बरा होणारच असा विश्वास दिला तर त्यांची लक्षणे कमी होतात. बऱ्याच वेळा अनेक पेशंट सांगतात की अमुक एक वार केला, उपवास केला, दर्ग्याला गेलो, महाराजांची वारी केली, नवस बोलला आणि माझा रोग पूर्ण बरा झाला किंवा आयुर्वेद, होमिओपॅथी, अॅक्युप्रेशर, युनानी, रेकी, योगा केलं !! जो रोग डॉक्टरच्या कुठल्याही औषधाने बरा झाला नव्हता तो बरा झाला!!! वास्तवात त्याला कुठलाच रोग झालेला नसतो. मनोशारीरिक रोग असतो आणि या सायकोसोमॅटीक रोगाचा गैरफायदा बुवा, महाराज, मांत्रिक, धार्मिक आचार विधी, आणि विविध यात्रा-जत्रातील नवस घेतात. आणि जेव्हा मनोशारीरिक व्याधी अशा बुवा महाराजांच्या मुळे बरी झाली असे म्हणतात तेव्हा ती पूर्ण बरी झालेली नसते कारण त्यांची "एक" समजूत नाहीशी झालेली असते. पण अशा समजुती तयार करण्याची त्यांची मानसिकता तशीच राहिलेली असते. ती मानसिकता दुरुस्त होत नाही. त्यामुळे छातीत दुखायचे थांबते.. पण नंतर कालांतराने डोकेदुखी सुरू होते आणि अशी अनेक लक्षणे अल्टुनपालटून चालू राहतात. त्यांच्या समजुती समूळ नाहीशा करणं हा त्यावरील उपाय आहे. आणि त्यासाठी सायकोथेरपिस्टकडे किंवा मानसोपचार तज्ञाकडे जाणे हिताचे असते. विशेष म्हणजे अनेक डॉक्टर्स हे देखील अशा मनोशारीरिक व्याधींकडे मेंटल आहे म्हणून दुर्लक्ष करतात. पण ते त्यावर मानस तज्ञांकडे जा असे सांगत नाहीत. आणि मग पेशंट आपला खिसा रिकामा करत अनेक डॉक्टरांकडे हिंडत राहतो. समाजात पसरलेल्या आरोग्याविषयी अनेक गैरसमजुती आहेत. दारोदारी अनेक जण असे आहेत की ते स्वतः डाॅक्टर असल्याच्या थाटात रोगांविषयी सल्ले देत असतात. त्यात वृत्तपत्रातले ऋषितुल्य लेखकही आले. हे सर्व नोसोफोबिया वाढायला मदत करतात. 

असे जर कोणते लक्षण तुम्हाला व तुमच्या ओळखीच्यांना असेल तर तात्काळ समजुती दुरूस्त  करून घ्या !! 

- डॉ. प्रदीप पाटील

1 comment:

सर्वंच धर्मकृत्यं वंदनीय नसतात !

    देवाचे घर उभारणार्यांनी देवाच्या नावाने पैसे गोळा करून त्यात भ्रष्टाचार केला तर तर तो भ्रष्टाचार या सदरात मोडत नाही ! शेवटी ते धर्मकृत्य...