Wednesday, September 15, 2021

करणी आणि मनोविकार Paranoia and haunting


 "आमच्या घरात सतत भांडणं होतात...मुलगा या वर्षी नापास झाला...यांचा धंदा पण नीट चालेना...हल्ली हे कामावर जायला टाळाटाळ करतात...काय बिघडले आहे कळत नाही... देवा, तुम्हीच सांगा.." 

- रमाबाई आपली तक्रार घेऊन महाराजांसमोर बसल्या होत्या. तसे ते महाराज फेमस! एकदम पाॅवरबाज महाराज. करणी-धरणी पासून बाहेरवासापर्यंत सारं काही काढून देणारे महाराज !! 

"रमाबाई", महाराज म्हणाले, "तुमच्या नवऱ्यावर करणी केली आहे. सगळा हा करणीचा प्रताप आहे..." 

"कुणी घातली महाराज ही करणी?.."

रमाबाईंचा नवरा अरुण सावध झाला आणि काळजीने विचारले. 

"जवळचच आहे.. नात्यातलं आहे. नाव नाही फोडणार मी." - महाराज म्हणाले. 

"मग, यावर उपाय?" -रमाबाईंनी विचारले. 

तसे महाराज म्हणाले, 

"चार अमावस्या करायच्या. पूर्वेला नारळ पुरायचा. गाणगापूरच्या चार वाऱ्या करायच्या. अंगारा देतो.. घरात, दुकानात, रोज रात्री चार दिवस फुकायचा.. करणी जाईल !"

 अरुण आणि रमाबाई घरी आले. 

महाराजांनी सांगितलेलं शंभर टक्के खरं आहे असं अरुणचं मत बनलं. कारण... 

त्याला स्वतःलाही तेच वाटत होतं ! कुणीतरी करणी घातल्याशिवाय आपल्यावर संकट येणार कसं? त्याच्या डोक्यात दोघांची नावं घोळत होतीच. त्या दोघांनी आपला पाय नेहमीच ओढला आहे. आपल्या वाईटावर आहेत ते. अरुणचा संशय पक्का झाला. 


खरोखरच "करणी" अस्तित्वात आहे का? 


याचे उत्तर, शंभर टक्के नाही, असे आहे. 

मग महाराज-अरुण-रमाबाई यांचे काय? 

अनेक महाराज करणी का  व कोणी केली हे सांगत असताना कौल लावतात. मग फुलाचा कौल असतो...भंडाऱ्याचा कौल असतो, वगैरे. अशावेळी चमत्कार समजून लोक महाराजाच्या करणी काढण्याच्या कसबावर विश्वास ठेवतात. 

"करणी" म्हणजे अज्ञात शक्तीद्वारे एखाद्याने दुसऱ्याचे वाटोळे करणे होय. ही अज्ञात शक्ती म्हणजे मंत्र-तंत्र, गुढ विद्या, काही विशिष्ट शक्ती.

 वास्तवात अशी कोणतीही अज्ञात शक्ती म्हणजे मंत्र-तंत्र, गुढविद्या किंवा शक्ती साधा कागदही इकडचा तिकडे हलवू शकत नाहीत. असे मंत्र-तंत्र असते तर शत्रूवर करणी घालूनच त्यांना मारून टाकण्याचे सारे काम फत्ते झाले असते !! दुसरे म्हणजे पोलिसांची गरजच भासली नसती...सरळ महाराज-बुवांकडे जाऊन आपल्या वाईटावर असलेल्यांचा करणीने बंदोबस्त केला की काम झाले !

अज्ञात शक्ती, गूढ विद्या, मंत्र-विद्या, काळी जादू असे शब्द प्रयोग करून महाराज-बुवा लोकांना आपल्याकडे आकृष्ट करतात. मग त्यांना वेगवेगळे विधी किंवा उपाय सांगून पैसे उकळतात आणि आपला धंदा जोरात चालवितात. असा एकही महाराज, बुवा, योगी, फकीर, मुल्ला, मुजावर, पाद्री सापडलेला नाही जो अशी करणी सिद्ध करून दाखवेल!!

 पण... 

करणी आहे असे सांगून महाराज-बुवा एक गंभीर गुन्हा करत असतात हे लक्षात घ्यायला हवे. 

साधारणपणे जी व्यक्ती अशा करणी-धरणीवर विश्वास ठेवत असते ती संशय विकृती या मानसिक विकाराने त्रस्त असते. इंग्रजीत यास पॅरानाॅईड पर्सनॅलिटी डिसॉर्डर म्हटले जाते.  या व्यक्ती काम करताना जर एखादी समस्या उद्भवली तर त्या समस्येला तोंड देणे त्यांना जमत नाही. त्याचे कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात काही ना काही दोष असतो. हा दोष त्यांच्या लक्षात येत नाही. या दोषामुळे ते जिथे जातील तेथे समस्या निर्माण करतात. हा दोष प्रामुख्याने असतो अतिसंशयीपणाचा! 

आपल्या या संशय विकृती रोगावर उपचार करण्याऐवजी दुसऱ्याकडे बोट दाखवून त्यावर पांघरूण घालणे आणि संशयास आणखी खतपाणी घालणे हा गुन्हा महाराज-बुवा-मुजावर करीत असतात.त्यामुळे अशा व्यक्ती आणखी मनोविकृत बनत जातात. 

करणी घातलीय आमच्यावर असे म्हणणाऱ्या व्यक्ती कारण नसताना बिनबुडाचा संशय घेत असतात. त्यांना नेहमी असे वाटत असते की दुसरे आपल्या वाईटावर आहेत. दुसरे आपल्याला फसवत आहेत. मित्रांनी वा नातेवाईकांनी चांगल्या हेतूने जर त्याला काही गोष्टी सांगितल्या तर तो त्यावरही विनाकारण संशय घेतो. त्यास नेहमी असे वाटत असते की आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा लोक घेतील. आपला वापर करून आपल्याला संकटात टाकतील. जर कुणी त्याच्याबद्दल काहीही बोलले तर त्याच्या बोलण्यामागे काहीतरी दुष्ट हेतू आहे असे त्याला वाटते. दुष्ट शक्तींवर त्याचा विश्वास असतो. एखाद्या घटनेतही ते दुष्ट अर्थ शोधतात. यामुळे ते सतत दुसऱ्यांना घालून पाडून बोलतात किंवा दुसर्यांचा अपमान करतात. याचा परिणाम असा व्हायला लागतो की ते जर व्यवसाय करत असतील तर गिर्हाईक टिकत नाही. नोकरीत सहकाऱ्यांशी पटत नाही. घरात भांडणे होतात. मित्रांपासून फटकून राहतात. बऱ्याच वेळा अशी काही लक्षणे फेफरे येणाऱ्या रुग्णात ज्याला एपिलेप्सी असे म्हणतात किंवा छिन्नमनस्कता ज्याला स्किझोफ्रेनिया असे म्हणतात या मानसिक रोगातही आढळतात. पण संशय विकृती ही करणी आहे म्हणणाऱ्या रुग्णात जास्त आढळते. 

अशा रुग्णांना महाराज भक्त बनवितात किंवा असे रुग्ण भक्त बनतात आणि मग अमावस्या-नारळ-लिंबू-बंधन बांधणे-परडी सोडणे-नरबळी देणे-बोकड बळी देणे, इत्यादी थोतांडी उपचार बुवा करायला सांगतात. रमाबाई महाराजांचे खरे मानून हे असले उपचार करत राहील तर त्यांना सारे संशय खरेच वाटू लागतील. कारण महाराजांवरील 'श्रद्धा' !!

 करणी सांगणारे बुवाच् बऱ्याच वेळा संशयी मनोविकृतीने पछाडलेले असतात. बऱ्याच वेळा ते शेजारच्याने किंवा भावाने किंवा बहिणीने किंवा चुलत्याने-चुलतीने करणी केली आहे असे बेधडक ठोकून देतात. त्यातून मारामाऱ्या आणि खुनापर्यंत प्रकार घडतात. करणीमागचे मनोविज्ञान जाणून घेऊन त्यावर वैद्यकीय उपचार व समुपदेशन करणे महत्त्वाचे आहे. 

बुवा कडे जाणे नव्हे !!!

..आणि जे करणी काढणारे बुवा ढोंग करत असतात त्यांना कायद्याच्या रस्त्यावरून  तुरूंगात धाडणे महत्त्वाचे. 

ते सरळ खोटे सांगत असतात.

करणीग्रस्तांनी मात्र वैद्यकीय उपचार करणेच योग्य.

- Dr Pradeep Patil

No comments:

Post a Comment

सर्वंच धर्मकृत्यं वंदनीय नसतात !

    देवाचे घर उभारणार्यांनी देवाच्या नावाने पैसे गोळा करून त्यात भ्रष्टाचार केला तर तर तो भ्रष्टाचार या सदरात मोडत नाही ! शेवटी ते धर्मकृत्य...