सनातन्यांनांचा पराभव
"नवीन काय लिहिणार आहेस?" डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांनी मला विचारले.
मी त्यांच्या हातात हस्तलिखित ठेवले. आरेवाडी येथील आंदोलनाच्या बैठकीस त्यांना मी बोलावले होते. कलेक्टर ऑफिस मधली मिटींग संपवून आम्ही घरी आलो तेव्हा त्यांना मी हस्तलिखित दिले.म्हणालो, " वास्तुशास्त्रावर आहे, वाचून सांगा ".
" हो रे.. वास्तुशास्त्रावर कोणीतरी लिहायला हवे होते. बघतो वाचून " सांगली ते सातारा या प्रवासात दाभोलकरांनी माझे संपूर्ण हस्तलिखित वाचून काढलं. सातार्यात पोहोचल्यावर लगेच त्यांनी मला टेलिफोन केला. म्हणाले,
"प्रदीप, मी सगळं वाचलं वास्तुशास्त्र."
कसं शक्य आहे? मी विचारात पडलो. जवळपास १६० पानं तीन तासात दाभोलकरांनी वाचून काढली होती. मला तेव्हा लक्षात आले की दाभोलकरांचा वाचन वेग अफाट आहे. कारण माझ्या पुस्तकांतला बारीकसारीक तपशील त्यांनी सांगितला.
" वास्तुशास्त्रावर खरे तर मी एवढा विचार केला नव्हता. तुझे हस्तलिखित वाचल्यावर लक्षात आले की याचा आवाका खूपच दांडगा आहे. तू अनेक तपशील गोळा केलेले मला दिसताहेत जे खरोखरच कठीण काम आहे. तुला वेद वाचून काढावे लागले असतील. ते मी समजू शकतो पण प्रदीप, त्याचा जो टेक्निकल भाग कसा काय समजून घेतलास?"
मी डाॅक्टर आणि वास्तुशास्त्रावर कसे लिहिले? याची उत्सुकता त्यांना होती.
मी म्हणालो, " मानसार, मयमत आणि समरांगण सूत्रधार ही वास्तुशास्त्रावरची बेसिक पुस्तके मी पुण्यातून मिळवली. पण आधुनिक वास्तुशास्त्राची माहिती अनेक नामवंत आर्किटेक् आणि इंजिनिअरांना भेटून चर्चा करून मिळवली. "
"ते दिसतंच आहे. खूप सखोल माहिती तू त्यातून मांडली आहेस. वास्तुशास्त्राचा सर्वांगाने अभ्यास केलेला दिसतोय. हे आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे प्रकाशित करू या. वास्तुशास्त्राचा परामर्ष घेणारे हे पहिलेच पुस्तक आहे."
त्यानंतर हे पुस्तक तयार होण्याआधीच दाभोलकरांनी अवैज्ञानिक वास्तुशास्त्रावर परिसंवाद, पुस्तक प्रकाशन आणि जाहिरनामा परिषद हे तीन कार्यक्रम तयार ठेवले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात डाॅ. श्रीराम लागू यांनी केले. जाहिरनामा परिषद जयंत नारळीकर यांच्या सहीने पुण्यात इंजिनिअरींग काॅलेजात झाली. त्यावेळी मी केलेल्या भाषणात आयन रँडने लिहिलेल्या 'फाऊंटनहेड ' या कादंबरीचा हिरो हाॅवर्ड रोआर्क या नास्तिक आर्किटेक् चा उल्लेख करून म्हणालो होतो..
" जगातल्या पारंपारिक इमारतींची निर्मिती करण्यात मला रस नाही. मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीतून नवनिर्मिती करणार्या इमारती बांधल्या. त्या परंपरांचा अपमान करतात म्हणून मला कुणी मारून टाकेल तर त्याची मी पर्वा करणार नाही..मी नवी शैली समाजात निर्माण करतोय...असे हाॅवर्ड म्हणतो.."
आज २० ऑगस्ट. कादंबरीतला हॅावर्ड रोआर्क प्रत्यक्षात मी पाहिला..अनुभवला.
डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्यरूपात. अखंड कामाचा झंझावात म्हणजे दाभोलकर.
सनातन्यांनी त्यांच्या या आवाक्याचा धसका घेतला होता. तो त्यांनी भ्याडासारखा संपविला. एक व्यापक कट आखून.
आठ वर्ष झाली. कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांना न्याय दिलेला नाही.
उद्योगपतीच्या घराबाहेरचा गुन्हा जो रक्तपाताविना असतानाही तात्काळ गुन्हेगार सापडतात.
विवेकाचे मारेकरी मोकाट आहेत.
सगळे राजकीय पक्ष या बाबतीत एका माळेचे मणी आहेत.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही यावर गप्प आहेत. गलिच्छ राजकारण म्हणतात याला.
नथुरामाचे इथले तालीबानी नातेवाईक दाभोलकरांच्या मारेकर्यांचे सत्कार करतील आणि षंढ राज्यकर्ते केविलपणाने नुसते बघत राहतील.
तरीही...
दाभोलकरांचा अंत म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि विवेकाचा विजयच आहे एका अर्थाने. धर्म आणि देव यांना आव्हान देत मुल्यांची पेरणी करत दाभोलकरांनी सनातन्यांनांचा संपूर्ण पराभवच केलाय..आणि तो यापुढेही होतच राहील...
- डाॅ. प्रदीप पाटील
No comments:
Post a Comment