Wednesday, September 15, 2021

सायबाॅर्गची शेंडी! Antena of cyborg


 शेंडी ठेवली म्हणून विश्वज्ञानी झालो..धर्माभिमानी झालो.. असे समजायचे कारण नाही !

 कारण शेंडी ही तुमचे आयुष्य सुसह्य करू शकत नाही. 

आयुष्य सुसह्य करू शकते ते विज्ञान. 

...आणि हे विज्ञान तुम्हाला जगणे सुंदर करून देते. 

गोष्ट आहे नील हारबीसनची ! विज्ञानाने त्याला शेंडी लावली आहे. शेंडी मंत्रतंत्र करून लावलेली नाही. 

वैज्ञानिक नियम आणि सखोल वैज्ञानिक ज्ञान निल हारबिसनच्या शेंडीत दडले आहे. विज्ञानाने तयार केलेली शेंडी म्हणजेच एक अँटेना आहे. हा अँटेना नील हारबीसनने चक्क डोक्यामधील कवटीमध्ये रोपण करून घेतला आहे. 

अँटेना म्हणजे एका टोकाला वायरलेस कॅमेरा आहे तर जिथे डोक्याच्या कवटीत अँटेना बसवला आहे त्या टोकाला वायरलेस आवाजाचे तरंग ओळखणारी यंत्रणा आहे. 

चक्क डोक्यातल्या हाडांमध्ये अशा पद्धतीनं नीलने का बरे अँटेना बसवून घेतला आहे? 

हा अँटेना बसवून आज सतरा वर्षे झाली आणि डोक्यावर ही अँटेनाची शेंडी घेऊन तो फिरतोय. 

या अँटेनामध्ये वायफाय ची सोय आहे. त्यामुळे नील थेट कृत्रिम  उपग्रहांची संपर्क साधू शकतो. तो दुसऱ्या कुठल्याही तशाच अँटेनाशी संपर्क साधू शकतो. ज्यातून व्हिडिओ, ऑडिओ, चित्रं आणि बरंच काही आदान प्रदान करू शकतो. या अॅन्टेना मुळे थेट मोबाईल कॉल करता येऊ शकतो. 

हे शक्य होते ते "ऐकण्याचे तरंग" मेंदूत त्याला अँटेनामुळे माहिती पुरवतात त्यामुळे !! 

पण नीलला याची गरज होती. का तर, त्यामागे नीलला जन्मताच झालेल्या रोगाचे कारण आहे. 

या रोगामध्ये संपूर्ण रंग ओळखण्याचे आंधळेपण असते. रंग आंधळेपण किंवा इंग्रजीत अक्रोमाटोप्सिया असे म्हणतात. नीलला जन्मताच या रोगामुळे रंग समजत नव्हते. अशा आंधळेपणासाठी उपाय नाही म्हणत देवावर आणि दैवावर सगळे सोडून देण्यास नील तयार नव्हता. 

...आणि मग त्याने विचार सुरू केला की असे एक नवे इंद्रिय तयार करता येईल का जे मला कलर किंवा रंग ओळखायला शिकवेल? 

...आणि या भन्नाट कल्पनेने त्याने सायबॉर्ग आर्ट नावाची संकल्पना शोधली. त्यातून तयार झाले सायबॉर्ग अँटेना. 

हे एक नवीन इंद्रिय ज्यामुळे निसर्गातील वेगवेगळे कलर ओळखता येऊ शकतात. 

म्हणजे हे अँटेना डोक्यात रंगाच्या संवेदना पाठवून देते. नीलने अँटेना स्वतःच्या डोक्यात २००४ सालापासून कायमचा बसवून ठेवला आहे आणि त्याच्या रंग आंधळेपणा वर त्याने मात केली आहे. विशेष म्हणजे यामुळे तो रंग फक्त पाहत नाही तर तो 'रंग ऐकतो'. आणि हे रंग देखील सूक्ष्मात सूक्ष्म असलेले इन्फ्रारेड आणि अल्ट्रावायलेट जे आपण, तुम्ही-आम्ही पाहू शकत नाही ते निल पाहू शकतो !! कमाल आहे ना? 

खरंतर यामुळे जीवाला धोका होऊ शकतो म्हणून त्याच्या डोक्यात अँटेना बसवायला सर्व डॉक्टर्सनी सुरवातीला नकार दिलेला होता. बायोएथिकल कमिटी नेमण्यात आली होती. त्यांनीही नकार दिला होता. पण नीलने गुपचूप डोक्यामध्ये तो एका डॉक्टर कडून बसवून घेतला. नीलने पाच मित्रांना त्यांच्या इंटरनेटवरून नीलच्या अँटेना मध्ये रंग पाठविण्याची परवानगी दिली होती. तो झोपेत असताना सुद्धा असे रंग पाठवून स्वप्नांमध्ये पाहू शकत असे. याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्याने 'द स्ट्रीम' मधून थेट प्रसारित केले. आणि रुबी व्याक्स ने थेट त्याच्या कवटीत फोन वरून कॉल केला. २०१४ मध्ये त्याने एक भन्नाट प्रयोग केला. एका कार्यक्रमात 'टाइम्स स्क्वेअर' येथे जमलेल्या प्रेक्षकांकडून, रंग स्वतःच्या अँटेनात घेऊन, स्टेजवर बरोबर त्या सर्व रंगाचे चित्र रेखाटले ! रंग आंधळेपण असलेल्या व्यक्तीने रंगीत चित्र रेखाटने ही क्रांती होती !! सोलर क्राऊन नावाच्या यंत्रामुळे जगातील विविध कोनातील तापमान सहज ओळखता येऊ शकते हे नीलने दाखवून दिले. आईन्स्टाईनच्या थेरी ऑफ टाईम रिलेटीव्हीटीला घेऊन "वेळेचे भ्रम" किंवा टाईम इल्ल्युजन निर्माण करायचे ध्येय त्याने ठेवले आहे. 

विविध देशात त्याने रंगवलेली चित्रे प्रदर्शित करून वाहवा मिळवलेली आहे. एवढेच नव्हे तर या अँटेनाने नीलने चक्क पोट्रेट तयार केली आहेत. समोर व्यक्तींना उभे करून अँटेना त्यांच्या चेहऱ्यावरील विविध भागांकडे ठेवून त्यातून निघणाऱ्या तरंगांच्या आधारे साऊंड पोट्रेट तयार केली आहेत.

इंग्लंडने त्याला देशात येण्यास प्रतिबंध केला व त्याचा पासपोर्ट नाकारला कारण त्याच्या अँटेना मधून तो महत्त्वाची माहिती गोळा करेल अशी भीती वाटली. नीलने हे माझे इंद्रिय आहे व त्यामुळे मी सुसह्य जीवन जगतो असे अधिकाऱ्यांना पटवून दिल्यानंतर त्याचा पासपोर्ट स्वीकारला गेला. यातून जगभरात नील हा पहिला सायबॉर्ग आर्टिस्ट म्हणून नावारुपाला आला. बारसिलोना येथे तो या अँटेनाचे प्रदर्शन करत असताना तेथील पोलिसांनी त्याच्या अँटेनाची मोडतोड केली. कारण त्यांना वाटले की तो पोलिसांची हेरगिरी करतो आहे. त्यावर नीलने त्यांच्यावर केस दाखल करून माझ्या इंद्रियाची मोडतोड केली हे सांगून न्याय मिळविला. 

त्याच्या देशात त्याला आता कायदेशीर  "सायबॉर्ग" म्हणून मान्यता मिळालेली आहे. 

प्राणी सुद्धा मानवासारखे विचार आणि भावना व्यक्त करतात या चळवळीचा तो सध्या पुरस्कर्ता आहे. म्हणजेच ऍनिमल सायकॉलॉजी याविषयी तो प्रचार करतो आणि 'ट्रान्स स्पेसिस सायकॉलॉजी' करिता तो अनेक उपक्रम राबवतो. नीलचे बघून मून रिबस हिने स्वतःच्या पायात असेच इलेक्ट्रॉनिक इंद्रिय बसवून घेतले आहे. ज्यामुळे तिला जमिनीत होणारे बदल आणि जमिनीतून निघणारे  विद्युत चुंबकीय तरंग यांची जाणीव होते व ते मोजता येतात. भुकंपावेळी हे खुप उपयोगी पडते. ती जगातील आज पहिली महिला सायबॉर्ग आर्टिस्ट समजली जाते. 

नील आणि मून या दोघांनी एकत्र येत सायबॉर्ग फाउंडेशनची स्थापना केली आहे. 

शेंडी लावणे अशी एक म्हण आहे पण ती वेगळ्या अर्थाने. विज्ञानाची ही शेंडी अफलातून असून मानव कल्याणाकडे घेऊन जाणारी आहे. 

तुम्ही ठरवा कोणत्या शेंड्या लावून घ्यायच्या !!

- डाॅ. प्रदीप पाटील

No comments:

Post a Comment

सर्वंच धर्मकृत्यं वंदनीय नसतात !

    देवाचे घर उभारणार्यांनी देवाच्या नावाने पैसे गोळा करून त्यात भ्रष्टाचार केला तर तर तो भ्रष्टाचार या सदरात मोडत नाही ! शेवटी ते धर्मकृत्य...