Wednesday, September 15, 2021

उपवास म्हणजे आरोग्याचा र्हास! Fasting Myth

उपवास म्हणजे आरोग्याचा र्हास


पोटाला आराम पडावा म्हणून आम्ही उपवास करतो असं सर्रास सगळे जण सांगतात.. उपवास केल्याने मनातली इच्छा पूर्ण होते असं स्त्रियांना वाटतं.. उपवास केल्याने प्रायश्चित्ताचं समाधान मिळतं... असंही काही जणांना वाटतं. 

उपवासाची ही चढाओढ जशी दिवसांची असते तशीच ती खाद्यपदार्थ न खाण्याचीही असते. 

उपवासाला आज सामाजिक प्रतिष्ठा लाभली आहे. उपवासावर तासंतास चर्चा करून स्वतः कसे उपवास महर्षी आहोत असे सांगण्याचा बडेजावपणा सर्व धर्मियांत  दिसून येतो.  काहींना तर आयुष्याचं ते अविभाज्य अंग आहे असं वाटतं. 

उपवासाचं हे जे स्तोम आहे ते तपासून पहावयास हवे. 

अन्नाशिवाय काही काळ राहणे म्हणजे उपवास हा अर्थ व्यवहारात मात्र अस्तित्वात नाही. उपवासाचे पदार्थ खाऊन काही काळ अर्धपोटी राहणे म्हणजे उपवास असं आजच्या उपवासाला म्हणता येईल. श्रावणी सोमवार, संकष्टी, एकादशी, शिवरात्री आणि तिथी वारानुसार चे उपवास हे हिंदू धर्मशास्त्रानुसार आहेत असे समजून केले जातात. वेदकाळात सर्रास मांसभक्षण ऋग्वेदी ब्राह्मणही करायचे, तिथे उपवासाची काय कथा? उपवासाचं स्तोम नंतरच्या काळात पुरोहित आणि ब्राह्मण्य जपणार्यांनी माजवलं. धर्मसिंधु ग्रंथात एकादशीचे नुसतं भोजनाविषयीच्या निषेधाचे  उपोषण व दुसरं व्रतयुक्त उपोषण असा दंडक घालून दिलाय. यातही सौभाग्यवती स्त्रियांनी नवऱ्याच्या व पित्याच्या आज्ञे वाचून उपवास व व्रतवैकल्य केली तर व्रत व्यर्थ होऊन नवरा मारतो व नरकात जातो असा पुरुषप्रधानी धाक घातला आहे आणि एकादशी व्रत केल्यावर शंभर यज्ञांचे पुण्य प्राप्त होतं असं आमिषही दाखविले आहे. चातुर्मासाचे स्तोम तर आपल्याकडे नको तितकं आहे. अनेक पदार्थांबरोबर स्त्रीसेवनही वर्ज्य  करावं असे स्त्रीला कमी लेखणारे आदेशही आहेत. श्रावणी सोमवारचे उपवास जगावेगळे कृत्य या थाटात केले जातात. जैन लोकांत सायंकाळी लवकर जेवण्याचा 'व्हासा' जसा असतो तसा पर्युषण पर्वात उपवासाचा मारा देखील असतो. ख्रिश्चन धर्मामध्ये नाताळापूर्वी चाळीस दिवस उपवास करण्याची प्रथा (लेंट) आहे मात्र अंडी-मासे सेवन करण्यास हरकत नसते. मुस्लिमांचे रोजे किंवा मोहरमचे उपवास हा अतिकडकपणाचा कळस म्हणावयास हवा कारण पाच वर्षांच्या मुलामुलींनाही उपाशी ठेवले जाते. 

उपवास करण्यामागे खरंतर धार्मिक कारणंच बहुसंख्येने आढळतात.

देवाचा वार, संकष्टी, चतुर्थी, व्रत म्हणून हे उपवास केले जातात. रूढी, परंपरा, देवाचा आदेश व धर्मग्रंथांचा आदेश म्हणूनही हे उपवास केले जातात. ईच्छित मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी बहुसंख्य स्त्रिया उपवास करतात. पाप निवारणासाठी, डायटिंग, पोटाला आराम, इत्यादी इतरही अनेक कारणं उपवासा मागे असतात. 

ही सर्व कारणं वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नाहीत. 

देवाचा वार म्हणून उपवास करायचा म्हंटलं तर भारतातील शनिवार हा अमेरिकेत मात्र शुक्रवार असतो. साडेनऊ तासांचा फरक वार पाळण्याच्या आड येतो.  आंतरराष्ट्रीय रेषा ओलांडली कि वार-तिथी दोन्ही बदलतात. 

धार्मिक व्रत म्हणून जे उपवास सांगितलेत त्यांना काहीच आहारविज्ञानाचा पाया नाही. उदाहरणार्थ पांढरे पावटे, काळा वाल, घेवडा, चवळी, वांगी, इत्यादी भलीमोठी यादी वर्ज्य करण्यास धर्मसिंधुत सांगितली गेली आहे. वास्तविक डाळी, कडधान्यं यातनं प्रथिने मिळतात. जी शरीराच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात. 

मनोकामना पूर्ण होण्यासाठी उपवास करणाऱ्या स्त्रिया हे लक्षात घेत नाहीत की, उपवासाने शरीराच्या पेशींच्या आवश्यक गरजा मारल्या जातात. बहुतांश भारतीय स्त्रियांत रक्तातील लोहाचे किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण हे १० टक्क्यांच्या खाली आढळते. जे सामान्यपणे १४ टक्क्यांपर्यंत असावयास हवे. त्यामुळे सतत उपवास करणाऱ्या स्त्रिया कायम अशक्त राहून अंगावरून पांढरे जाणे किंवा श्वेतप्रदर (ल्युकोरिया) व पंडुरोग किंवा अॅनिमिया या रोगांना बळी पडतात. अमेरिकेतील व इतर पाश्चात्य देशातील स्त्रियांमध्ये हेच प्रमाण १४ ते १६ टक्के असते.

भारतातील जवळपास शंभर पैकी ६८ स्त्रिया या पंडूरोगाने ग्रस्त असतात. अगोदरच स्त्रियांच्या खाण्यापिण्याविषयी अनेक तक्रारी असतात त्यात उपवासाची भर पडते.

 उपवासाचे फायदे सांगणारा फार मोठा वर्ग समाजात आहे. त्यास आयुर्वेदाचा आधार आहे असेही सांगितले जाते. पोटाला आराम पडतो, डायटिंग होतं, असा चुकीचा प्रचारही केला जातो. डायटिंग किंवा समतोल आहार ही एक वैज्ञानिक पद्धती आहे. तिचा धार्मिक उपवासाशी शून्य संबंध आहे. आहार विज्ञान नावाची स्वतंत्र शाखा ज्याला डायटेटिक्स म्हटले जाते ही आज विकसित झाली आहे. 

समतोल आहाराची व्याख्या काय आहे? सर्व खाद्यपदार्थांनी युक्त जो शरीरास आवश्यक ऊर्जा पुरवितो व शरीराची वाढ पेशींची रचना व कार्य व्यवस्थित चालू ठेवतो असा आहार. शरीरास आवश्यक तीन प्रमुख घटक असतात. प्रथिने किंवा प्रोटिन्स, कर्बोदके किंवा कार्बोहाइड्रेट व मेद किंवा फॅट. यापैकी प्रथिने शरीराची वाढ करतात. कर्बोदके शरीरास ऊर्जा देतात आणि मेद, स्नायू व हाडांना आधार देऊन ऊर्जेचा साठा ठेवतात. इतर घटक जे आहारात असावयास हवेत ते म्हणजे जीवनसत्वं किंवा विटामिन्स, खनिज, क्षार, इत्यादी. यापैकी एखादा घटक जरी शरीरास कमी पडला तर आहारजन्य रोग उद्भवतात. उदाहरणार्थ, व्हिटामिन १२ या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे हातापायात मुंग्या येणे सुरू होते. गेल्या कैक वर्षात डॉक्टरांकडे येणाऱ्या पेशन्टस्  मध्ये हे प्रमाण स्त्रियांमध्ये वाढत चालले आहे. आणि व्हिटामिन बी १२ ची इंजेक्शने देणे बेसुमार वाढली आहेत. 

एखादा घटक शरीरात जादा झाला तरीही रोग उद्भवतो. उदाहरणार्थ मेदाचे प्रमाण वाढलं की रक्तदाबाला आमंत्रण मिळालंच म्हणून समजा. मुस्लिमांच्या रोजाच्या काळात भजी,वडा, मटन-चिकन याचं प्रमाण इतका वाढतं की त्याचा मोठा दुष्परिणाम शरीराच्या आरोग्यावर होतो. बऱ्याच वेळा पोट बिघडतं. उलट्या सुरू होतात आणि सलाईन लावायची वेळ येते. याचा अर्थ आहार वर्ज्य करणे तर सोडाच पण तो आवश्यकतेपेक्षाही कमी करायचा नाही वा जादा ही करायचा नाही ! 

जर उपवास सलग चार दिवसांपेक्षा जास्त दिवस केला तर ' रिफिडिंग सिंड्रोम ' या विकाराचा धोका असतो. यात क्षारांचा असमतोल उद्भवतो आणि त्याचे परिणाम मेंदू, मुत्रपिंडे, ह्रदय, फ्फुफुसे, इ. वर होतो.

समतोल आहाराचे एक गणित आहे. सर्वसामान्यपणे बैठं काम करणारा, हालचालीचं काम करणारा व अतिश्रम करणारा असे तीन वर्ग समाजात आहेत. त्यांच्या या प्रकारानुसार त्यांना कमी, मध्यम व अती कॅलरीजच्या आहाराची गरज असते. ऑफिसात टेबलावर बसून काम करणाऱ्यांची हालचाल जर अत्यंत कमी असेल तर त्याला कमी कॅलरीच्या अन्नाची गरज असते. आणि हमाली, शेती आणि कामगार असणाऱ्यांना,... जे अति श्रमाचं काम करतात त्यांना जास्त कॅलरीज देणाऱ्या अन्नाची गरज असते. वास्तवात काय घडतं? बैठं काम करणारा भरपूर खातो आणि हमाल-कामगार उपाशी असतो. या सूत्रास 'बेसल कॅलरी रिक्वायरमेंट' असे म्हणतात. या सूत्रानुसार खरंतर आहाराचं नियोजन हवं. पण यावर उपाय सांगितला जातो तो म्हणजे उपवास !!

वाईट याचं वाटतं कि उपवासाच्या या संकल्पनेत अतिश्रम करणारा वर्गच जास्त भरडला जातो. त्यामुळे शारीरिक दृष्ट्याही तो कायम रोगट राहतो. 

उपवासाचे पदार्थ म्हणून जे सांगितले जातात ते सर्व पदार्थ, आहारशास्त्र दृष्ट्या शरीरास कोणताही फायदा करीत नाहीत. उदाहरणार्थ, साबुदाणा. साबुदाण्याचे वडे, खिचडी वगैरे पदार्थ तर तळून खाल्ले जातात. साबुदाण्यात प्रथिने फक्त ०.२ ग्रॅम असतात. त्यामुळे हे ठराविक पदार्थ महिन्यात बहुसंख्य वेळा खाल्ल्याने विविध पोषक घटकांची शरीरात भर पडत नाही.

उलट कोणताही आधार नसलेले दावे यासंदर्भात केले जातात. धर्मग्रंथातून असं सांगितलं गेलं आहे की गूळ वर्ज्य केला की आवाज मंजुळ होतो.. दही-दूध-तुपाचा त्याग केल्याने विष्णू लोक प्राप्त होतो, वगैरे.

 मेंदूतील हायपोथॅलॅमस या भागात भुकेचं केंद्र असतं. त्यावर नियंत्रण ठेवणारे अनेक घटक असतात. पैकी आहारातील प्रथिने व कर्बोदके यांच्या रक्तातील पातळीवरही या केंद्राचे कार्य अवलंबून असतं. समतोल आहारानं हे केंद्र नीट कार्यरत राहील हे 'उपवासी' लोक ध्यानात घेत नाहीत. 

जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा पोटातील आतड्यात पाचकरस स्त्रवतात व अन्नाचे नीट पचन करतात. उपवास केल्यावरही हे रस पाझरतात, पण अन्न  नसल्यास मात्र ते हानीकारक ठरू शकतात.  उदाहरणार्थ, हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा अॅसिड. ज्यामुळे 'हार्टबर्न' सारखे अपाय होतात. उपवासाच्या काळात साखरेचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यास भ्रम व  बेशुद्धी येण्याची शक्यता वाढते. मेंदूची साखरेची गरज न भागविण्यास त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. दीर्घकाळ कुपोषण व उपवासाने यकृत (लिव्हर) व मूत्रपिंडावर ताण पडून ते निकामी होण्याचा संभव जास्त असतो. दीर्घकाळाच्या उपोषणात मूत्रक्षय, विरक्तता (युरेमिया), विषरक्तता (कीटोसिस) हे मृत्यूकडे नेणारे गंभीर बिघाड उद्भवतात. 

उपवासाने वजन कमी होतं हा एक गैरसमज आहे. उलट त्यामुळे शरीर दुबळे व अकार्यक्षम बनते. कारण उपवासात आहारातील समतोल आहार घटक शरीरात न गेल्याने शरीरातील प्रमुख आहार-घटकांचा तोल बिघडतो आणि त्याचा फटका इंद्रियांना बसतो. संशोधनातून असं दिसून आलं आहे की खूप काळ अन्न न घेतल्याने ऊर्जेसाठी प्रथिनं खर्च होतात. त्याबरोबर शरीरातले पोटॅशियम ही कमी होते आणि ह्रदय विकार बळावून मृत्यूही येतो. 

'अथ श्रवण द्वादशी व्रत...'असे म्हणत बसण्यापेक्षा उपवासास कायमची रजा देऊन समतोल आहाराची कास धरल्यास आरोग्य उत्तम राहील हेच खरे.‍‍

- डॉ. प्रदीप पाटील ●

No comments:

Post a Comment

सर्वंच धर्मकृत्यं वंदनीय नसतात !

    देवाचे घर उभारणार्यांनी देवाच्या नावाने पैसे गोळा करून त्यात भ्रष्टाचार केला तर तर तो भ्रष्टाचार या सदरात मोडत नाही ! शेवटी ते धर्मकृत्य...