मोटस् येतोय !
"मोटस" येतोय !
...आणि तो तुमच्या आमच्या शरीरातील गुपितं उघडकीस आणणार आहे !!
"मोटस" म्हणजे एक लहान सूक्ष्म मायक्रोचीप.
म्हणजे धुळीमध्ये असलेल्या जंतू पेक्षाही लहान. जवळपास एक क्युबिक मिलिमीटर पेक्षाही लहान, जो मायक्रोस्कोपखालीच दिसू शकतो. ०.१मिलीमीटर³ हा त्याचा खरा आकार.
"मोटस" हा आपल्या शरीरात अगदी इंजेक्शनच्या सुईने बसवता येतो. मस्तपैकी वेगवेगळ्या इंद्रियांमधील इत्यंभूत माहिती बाहेर डॉक्टरला पाठवणार.
म्हणजे आता शरीरातले अंतरंग पडद्यावर मस्तपैकी साकारणार. आणि डॉक्टरांचे काम खूप म्हणजे खूपच सोपे होणार. कोलंबिया युनिव्हर्सिटीने ही "मोटस" नावाची सूक्ष्मचकती किंवा मायक्रोचीप तयार केली आहे. या सूक्ष्म चीप मध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेल्या केन शेफर्ड नावाच्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमने हे शोधून काढले.
ऑपरेशन करायच्या अगोदर तुमचे शरीर व्यवस्थित काम करते की नाही यासाठी अनेक तपासण्या कराव्या लागत होत्या. पण आता "मोटस" एका दमात हे सर्व करून देईल. "मोटस" बरेच काही करेल... जसे की रक्तातली साखर कमी जास्त होते की नाही?, शरीराचे तापमान, शरीरात कुठल्याही इंद्रियात काय बिघडले?, त्याचे निदान, रक्तदाब, श्वसनाचे कार्य ...कितीतरी अशा फायदा मिळवून देणाऱ्या गोष्टी "मोटस" करणार आहे.
विज्ञानाचे हे मानव जातीला देणे आहे. कुठलेतरी प्राचीन ग्रंथ उघडून आमच्या ग्रंथात हे पूर्वी होते असे म्हणणार्यांसाठी एक नवा विषय मिळालेला आहे..आता जुन्या ग्रंथात डोके खुपसून बसायला हरकत नाही. मठ्ठपणे बसलेल्यांना दुसरे काही नवीन सुचत नाही..त्यामुळे नवीन शोध लागले कि जुने ग्रंथ धुंडाळत बसण्याची खोड असते. आणि नंतर जाहीर करायला मोकळे ' हे आमच्या ग्रंथात पुर्वीच होते...'
"मोटस" हे विद्युत विज्ञान, इलेक्ट्रॉनिक विज्ञान आणि शरीर विज्ञान या तिन्ही विज्ञानाचा आधार घेऊन तयार झाले आहे. काॅम्प्लीमेंटरी मेटल ऑक्साईड सेमिकंडक्टर तंत्रज्ञान यामध्ये आहे. ज्याला सी एम ओ एस म्हणतात. हे घेऊन सूक्ष्म आवाजाच्या लहरी निर्माण केल्या जातात. शरीरात गेल्यावर पिझोइलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर या सूक्ष्म जोडणीद्वारे बाहेरच्या मशीन मध्ये सर्व माहिती गोळा होते. आणि हे सर्व वायर शिवाय म्हणजे वायरलेस होणार! 'स्मार्ट डस्ट' किंवा चुणचुणीत धूलकण या वर्गात हे मोडतं.
अफलातून असलेल्या या नव्या शोधाने सूक्ष्म लहरींचा वापर कसा करायचा हे दाखवून देत वैद्यकीय विज्ञान आणखीनच सोपे केले आहे.
सूक्ष्म लहरी आणि एनर्जी या मंदिरातून बाहेर पडतात आणि त्या वैश्विक ऊर्जेला जोडल्या गेलेल्या असतात असले बिनबुडाचे विज्ञान इथे चालत नाही. असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात मंदिर, मूर्ती आणि एनर्जी आणि वैश्विक एनर्जी यांचं विज्ञान आहे म्हणून पूजाविधी करायचे असतात असे ठासून खोटे सांगितले जाते. असले बालिश विज्ञान पसरवणारे लबाड असतात.
"मोटस" जर आणखी प्रगत केले तर शरीरातील अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया उलगडत जातील आणि वैद्यकीय विज्ञान प्रगत होत जाईल. सोनोग्राफी, एम आर आय अशा तंत्रज्ञानाच्याही पुढे गेलेले हे विज्ञान.
साचलेला धार्मिक दृष्टिकोन नव्हे तर प्रगत होणारा वैज्ञानिक दृष्टीकोण आज मानवाला उन्नत अवस्थेकडे घेऊन जाणार हे निश्चित!
- डाॅ. प्रदीप पाटील
No comments:
Post a Comment