भारतात रोज ८८ बलात्कार होतात असं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचं म्हणणं आहे.
भारतात होणाऱ्या या बलात्कारांपैकी बलात्कार करणारे कोण असतात?
तर ज्या स्त्रीवर बलात्कार होतो त्या स्त्रीला ओळखणारे जवळपास ९४ टक्के असतात ! बाहेरचे अनोळखी कोणी नसतात. याचाच अर्थ दर सोळा मिनिटाला एक बलात्कार होत असतो आणि...
चारपैकी एकाला शिक्षा होत राहते.
का करतात बरं हे बलात्कार? अलीकडे बलात्कार करून त्या स्त्रीस मारून टाकणे किंवा तिची विटंबना करणे ही प्रकरणे वाढीस लागली आहेत.
या व्यक्ती खरेतर नुसत्या गुन्हेगार नाहीत तर त्या मनोविकृत आहेत.
मनोविकृती जी असते तीला समाज विघातक व्यक्तिमत्त्व विकृती किंवा इंग्रजीत 'अँटीसोशल पर्सनालिटी डिसाॅर्डर' म्हणतात.
अशा व्यक्ती या खून करायला मागेपुढे पहात नाहीत. या व्यक्तींमध्ये हा दोष निर्माण होण्यास संस्कार आणि त्यांचा मेंदू दोन्ही कारणीभूत असतात. त्यांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. एखाद्या गोष्टी करायच्या ठरवल्या आणि त्या विघातक आहेत हे लक्षात आले तरी त्याला थांबवता येत नाही. बहुसंख्य वेळा अशा व्यक्तींची कौटुंबिक परिस्थिती गंभीरपणे बिघडलेली असते. घरातील संस्कार करणार्या व्यक्ती विकृत वागत असतात. सामाजिक परिसर हा विकृतींचे गुणगान करणारा असतो. कोणताही ताण आला तर त्याला तोंड देण्याची क्षमता अशा व्यक्तींमध्ये अतिशय कमी असते.
बदामाकार ग्रंथी आणि एसीसी हे मेंदूतले दोन भाग कोणत्याही ताणाला तोंड देण्यासाठी उपयोगी असतात. या दोन भागात बिघाड निर्माण झाला की ही क्षमता ढेपाळते. लहानपणी केलेला अनाठाई छळ विकृत मानसिकता निर्माण होण्यास हातभार लागतो. अलीकडच्या संशोधनातून आणखीन एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे आक्रमक वर्तनाचा जनुक. हा जनुक जेव्हा बिघडतो तेव्हा मेंदूतील रसायने बिघडतात. उदाहरणार्थ, मोनोअमायनो ऑक्सीडेज नावाचे रसायन. जेव्हा हे रसायन निर्माण होत नाही किंवा खालच्या पातळीवर राहते तेव्हा हिंसा आणि राग याचा उदय होत राहतो. एका डच कुटुंबात ५ जणांच्या जनुकांमध्ये बिघाड होता आणि हे सर्वजण हिंसक कृत्यात कायम गुंतलेले होते. बदामाकार ग्रंथी मुळे धोका ओळखता येतो. पण या ग्रंथीत झालेल्या गडबडीमुळे धोक्याची जाणीव अतितीव्र स्वरूपात करून घेतल्याने अशी व्यक्ती हिंसा करून मोकळी होते.
भावनिक थंडपणा, धमक्या, फसवणूक, पश्चातापाचा मागमूसही नसणे आणि सतत कुठल्या ना कुठल्यातरी जोखीमा उचलत राहणे ही लक्षणं आहेत समाजविघातक व्यक्तिमत्त्व दोषाची. यांच्या मेंदूच्या उजव्या भागात आणि बदामाकार ग्रंथीत किंवा अमिग्डाला ग्रंथीत मोठा दोष निर्माण झालेला असतो. विकृत व्यक्तींमध्ये बलात्काराची इच्छा निर्माण होणे आणि समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करणे हे दोन्ही एकाच वेळी घडून येते. ज्याला "रिव्हर्स अँड पनिशमेंट इम्युनिटी' असे म्हणतात. अशा व्यक्ती लहान असताना त्यांचे आईबरोबरचं नातं हे तुटक असतं. जवळिकीचं..मायेचं.. नसतं.
गुन्हा करणाऱ्या किंवा खून करणाऱ्या गुन्हेगारांच्या मेंदूचे सिटीस्कॅन जेव्हा तपासण्यात आले तेव्हा एक महत्त्वाचा फरक दिसून आला. खाली दिलेल्या फोटोत तुम्हाला दिसेल. आपल्या कपाळाचा मागील भाग हा विचारांचे केंद्र समजला जातो, ज्याला "ऑर्बिटो फ्रंटल कॉर्टेक्स' म्हणतात. या केंद्रात ग्लुकोजचे चलनवलन हे पूर्णपणे थांबलेले किंवा कमी झालेले दिसून येते. म्हणजेच विचार करणार्या या भागाचे कार्य मंदावते. जे गुन्हेगार आहेत त्यांच्यात विचार करणारा हा भाग अपंग होतो. विचारच सुचत नाहीत आणि मग अविचार हा बलात्काराकडे व गुन्हे करण्याकडे घेऊन जातो.
गुन्हेगार फक्त कुसंस्कारांतून निर्माण होत नाही. बाद झालेला मेंदूही गुन्हेगार निर्माण करण्यास जबाबदार असतो. परिसर आणि जनुके एकत्रितपणे अशा रीतीने एकत्र आल्यास गुन्हेगारांची निर्मिती होते. त्याचबरोबर मेंदू घडत असताना त्याच्यात जर दोष निर्माण झाले, मेंदूला अपघाताने इजा झाली-खास करून पुढच्या भागांमध्ये-तर, आणि लहानपणी विकृत छळ झाला तर, हिंसक गुन्हेगार तयार होण्यास मोठी संधी निर्माण होते.
याचा दुसरा अर्थ नैतिक आणि अनैतिक वागण्यामध्ये हे सर्व घटक समाविष्ट असतात.
भारतात सध्या हिंसा, अत्याचार आणि फेकूगिरीचे उदात्तीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालू आहे.
मग बलात्कार आणि खून यासाठी जबाबदार कोण?
बिघडलेल्या डोक्यांना या देशात आता सहज हवा मिळतेय.
- डाॅ. प्रदीप पाटील
khup chan mahiti sir
ReplyDelete