Monday, September 20, 2021

सर्वंच धर्मकृत्यं वंदनीय नसतात !


   

देवाचे घर उभारणार्यांनी देवाच्या नावाने पैसे गोळा करून त्यात भ्रष्टाचार केला तर तर तो भ्रष्टाचार या सदरात मोडत नाही ! शेवटी ते धर्मकृत्य असते व ते करत असताना कुणी लबाडी केली तरी ते देव बघून घेईल हा शाप खूप प्रभावी असतो. जोरदार असतो. हे धार्मिक व संस्कृती रक्षकांचे लोकप्रिय नीतीतत्त्व आहे.  त्यांच्या मनात ते ठासून भरलेले असते. जर देवालय हे राजकारणासाठीच आणि राजकारणातून उभे केले जात असेल तर तिथे देवनीती,  धर्मनीती आणि संस्कृती नीती या सगळ्यांचा राडा झालेला असतो. ही राड म्हणजेच धर्माचरण आणि संस्कृतीचे आचरण. आणि ते कर्मकांडाच्या नावाखाली खपून जाते. देव या भ्रमाचा वापर राजकीय फायद्यासाठी करून घेणं याचे एकमेव उदाहरण भारतात पहिल्यांदाच दिसून आलेलं आहे. जगभरात तर ते सतत वापरले गेले आहे.  धर्माचा वापर करून आजवर राजकारणाची पोळी भाजण्यात सर्वधर्म आणि सर्व पक्ष आघाडीवर होते किंबहुना राज्यकर्त्यांनी धर्माचा वापर हा सोयीनुसार केल्याचा इतिहास आहे. ती सोय आज पुरेपुर उपयोगी पडते आहे.

देवाचा वापर राजकारणासाठी करणे हे धार्मिक आणि संस्कृती वाद्यांनी हे जे घडवत आणले आहे त्यातून ते भ्रमिष्ट समाज घडवत आहेत. जो माझ्या विरोधात तो तो मारून टाकण्या योग्य ही धर्म नीती किंवा संस्कृति नीति अनेकवार त्यांच्याच नाशास कारणीभूत ठरलेली आहे. कारण त्यातून निर्माण झालेल्या राजकारणातून युद्धं घडली आणि लढाया झाल्या. भारतात मुसलमान मुसलमानांविरुद्ध लढले. हिंदू हिंदू विरोधात लढले. युरोपात ख्रिश्चनांनी ख्रिश्चनांचा संहार केला. म्हणजेच लढाया या स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी घडल्या. केवळ लढायाच नव्हे तर स्वधर्म किंवा सर्व संस्कृतीचा त्याग करून स्वतःचे अस्तित्व राखणे हे मानवी मूलभूत प्रेरणेशी सुसंगत आहे.  ही प्रेरणा जी स्वार्थाशी निगडीत आहे तीच प्रबळ होते. त्याला धार्मिक आणि संस्कृती वादी काय करणार? स्वतःच्या देवाशी, धर्माशी आणि संस्कृतीशी बेइमानी करणं हे धार्मिकांना शक्य होतं. कारण ही बेईमानी  त्यांना त्यांच्या स्वउत्कर्षाकडे घेऊन जाते आहे असे वाटत असते आणि हे त्यांचे नीती तत्व असते. इथे धर्म-संस्कृती काय म्हणते हे फारसे महत्त्वाचे ठरत नाही. मंदिरे फोडणे, मुर्त्या उद्ध्वस्त करणे, देवालय फोडणे, मशिदी-चर्च तोडणे, परधर्मातल्या स्त्रिया पळवणे, देव नाही म्हणणार्यांच्या कत्तली करणे हे धर्मकृत्य करतोय ठरते. धर्मकृत्य आणि विवेक यांचा अर्थाअर्थी शून्य संबंध आहे. 

धर्माची निर्मिती देव नावाची कल्पना वापरून झालेली आहे. धर्म आणि संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देव, धर्म आणि संस्कृती जे सांगेल तीच नीती असे मानत राहिल्यामुळे प्रचंड मोठा गोंधळ लोकांच्या वागण्यामध्ये सतत निर्माण झालेला आहे. धर्म आणि संस्कृती चेतवत राहून सत्तेवर आलेल्यांना जर धर्म वा संस्कृती जर पाठिंबा देत असेल तर स्वधर्मियांची सर्व कुकृत्त्ये झाकून ठेवणे, नजरेआड करणे यालाच धर्म राष्ट्र म्हणतात.


जगाचे नंदनवन करेन अशी घोषणा करणारे देव आणि प्रेषित हे धर्म नावाचा लबाडीचा धंदा करतात.

- डाॅ. प्रदीप पाटील

आम्ही सर्व तालीबानी Talibani Similarities


 जगभरात सर्व धर्मात तालीबानी आहेत.


धर्माचा जयजयकार करणारा एक नेता असतो आणि तो सर्वांना प्रशिक्षण देत असतो. मोहम्मद ओमर ने पश्तून प्रांतात याची सुरुवात केली. ज्यांना तालिबान म्हणतात.


मुल्ला मोहम्मद ओमरला आपला देश ९९% मुसलमानांचा असुनही समाजवादी रशियन शासन आहे याचा प्रचंड राग आणि द्वेष मनात ठेवून ५० विद्यार्थी तरूणांना घेऊन तरूण संघ स्थापन केला आणि तालीबान फोफावला. 


अमेरिकेने याला बाहेरून भरपूर मदत केली. शस्त्रे पुरवली. 

तरूणांना हिंसा आणि युद्ध याचे महत्त्व पटवून दिले. तालीबानी प्रचार.


शेजारी देशाबद्दल त्यांच्या मनात विषारी विखार ठासून भरला. तशी पुस्तकं वाटली गेली. अमेरिकेने अफाट पैसा ओतून मूलतत्त्ववाद्यांची निर्मिती केली.

आपण सर्व ईस्लामी एक होत नसल्याने आपल्या राष्ट्राची दुर्दशा झाली आहे असे ठसविले गेले. तालीबानी तत्त्वज्ञान. 


आपल्याच धर्मात वाढणार्या जातींचा-गटांचा द्वेष निर्माण केला. देवबंदी मुस्लीम हेच शासक बाकीचे वहाबी, जमाते ईस्लामी, इ. संपविण्यायोग्य असा प्रचार. तालीबानी सांस्कृतिक वर्चस्व. 


धर्माचे शिक्षण असे गोंडस नाव देऊन दहशतवादाची सुरवात होते...मदरसा असे त्याचे नाव. तालीबानी धर्मज्ञान.


स्वतःचा स्वतंत्र झेंडा ते फडकवतात आणि देशातल्या शासकीय झेंड्याला पायदळी तुडवतात. तालीबानी स्वाभिमान. 


जे धर्म मानत नाहीत किंवा धर्माप्रमाणे वागत नाही त्यांना मारून टाकणे किंवा बहिष्कृत करणे हे अशा तालिबान्यांकडून केले जाते. कुराण अंतिम. तालीबानी पुजारी. 


इथे शरिया प्रमाणे वागणे हे महत्त्वाचे.देशाचे सरकारचे कायदे किंवा संविधान यांना काडीचीही किंमत न देणे याला तालीबानी कृत्य म्हणतात.


धर्मात न बसणारे कला, नाट्य, सिनेमे, यातील कलाकारांना देहांत देणे यास तालिबान म्हणतात. 


स्त्रियांनी आधुनिक कपडे, जीन्स, इ. घालणे वगैरे गोष्टी म्हणजे धर्म बुडवेपणा आहे आणि म्हणून त्यांना मारून टाकणे हे तालिबानी कृत्य आहे. तसे तालीबानी प्रवचनकार स्त्रियांच्या मनावर ठसवत राहतात.


स्त्रियांनी पारंपारिक वेशात राहणे हे तालिबानी कृत्य होय. स्वसंस्कृतीचा उद्घोष. 


जर स्त्रिया धर्मातील अल्पसंख्य जातीतील असतील त्यांना कुत्र्यासारखे वागवणे, बलात्कार करणे म्हणजे तालिबानी कृत्य होय.


अन्य धर्मातील मंदिरे, मुर्त्या तोडणे फोडणे, हे तालीबानी कृत्य होय. १५०० वर्षे जुनी असलेली बामियाची बुद्ध मूर्ती. 

आमच्या संस्कृतीत घुसखोरी? करा उध्वस्त. 


धर्माने हिंसा केली तर त्याचे समर्थन करणे म्हणजे तालिबानी होय. याला पश्तूनवली म्हणतात. झुंडीने मारणे, जबरदस्ती करणे, इ.


देशाची सुरक्षा आणि शांतता हेच आमचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे असे तालिबानी म्हणतात. मग सुरुवातीला विशिष्ट राष्ट्राचा धोका आहे असे म्हणत तालिबानी आणि मुजाहेदीन वाढले. हे राष्ट्र म्हणजे रशिया किंवा इराण होय. हेच हरकतई इन्किलाब इस्लामी. 


एक दोन राष्ट्रे शत्रू म्हणून घोषित करायची आणि स्वतः संरक्षक आहोत असे चित्र निर्माण करायचे. तालीबानी कुप्रचार.


धर्मामध्ये असलेले सर्व गट आणि तट हे एकाच राष्ट्रावर हक्क सांगतात तेव्हा तेथे अराजक माजते. मोहम्मद नजीबुल्लांच्या रशियाच्या पाठिंब्याच्या सरकारला पाडल्यावर तेथे तीन धर्मराष्ट्रवादी पार्ट्या एकमेकांना भिडल्या. हेझबी ईस्लामी गुलबुद्दीन, हिझबी वाहदत, इत्तिहादी ईस्लामी. धर्माचा राजकीय वापर करणारे घृणास्पद तालीबानी कृत्याच्या विविध धर्मसंघटना.


पोलीस,न्याय आणि शासन यंत्रणांचा बोजवारा उडणे म्हणजे तालीबानी.


बिगर सरकारी सामाजिक संस्थांना देशाबाहेर हाकलून लावणे किंवा बंद पाडणे म्हणजे तालीबानी. 


अहमद शाह मसूद हा तालीबान्यांविरूद्ध लढणारा एकमेव लोकशाहीवादी नेता होता. ज्याने स्त्री शिक्षण चालू केले. बुरखा बंद केला. सुधारणा घडवल्या. त्यांचा खून केला. हेच ते तालीबानी कृत्य. 


ज्यांनी तालीबान्यांविरूद्ध लढा दिला त्यांना कट कारस्थानाने, खुनाने संपवले. उदाहरणार्थ, बुर्हानुद्दीन रब्बानी, महम्मद दाऊद, अब्दुल रहमान सैदखली, इ.


जे जे विरोध करतील त्या सार्यांनी देश सोडावा किंवा मरावे म्हणत आपल्याच धर्मातील नागरिकांच्या गळा कापून १५ वेळा कत्तली एकावेळी शेकडोंच्या केल्या आहेत. तालीबानी फतवे.


जे आपल्या वंशाचे नाहीत त्यांना, सुमारे ६ हजार लोकांना,  क्रुर पणे संपविण्यात आले. उदाहरणार्थ मझार ई शरीफ.   तालीबानी वर्चस्ववाद. 


अल्पसंख्याक व खालच्या जातीच्या स्त्रियांवर बलात्कार आणि त्यांची विक्री हे तालीबानी कृत्य. 


आधुनिक व पुरोगामी विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापकांवर हल्ला करणे हे तालीबानी कृत्य. काबुल विद्यापीठातील उदाहरण.


आपल्याला मान्य नसलेला किंवा अडचणीचा इतिहास नाहीसा करणे म्हणजे तालीबानी कृत्य. उदाहरणार्थ पुली खुमरी ग्रंथालयाचा विनाश. 


जे अजान म्हणणार नाहीत त्यांच्यावर हल्ले. धर्म प्रेमाचे बेगडी तालीबानी  प्रदर्शन. 


कुराणावर पत्रकारांनी, लेखकांनी काहीही लिहण्यावर बंदी. आमच्या धर्मावर बोलायचे नाही. तालीबानी धर्म वीर.


आम्हाला पैंगबरांसारखे जग व वैभव  निर्माण करायचे आहे व त्यासाठी जिहाद आहे असे गाजर दाखविणे म्हणजे तालीबानी कृत्य. पुर्व संस्कृतीचा उदोउदो. 


हेच तालीबानी आता सत्ता काबीज करून सामाजिक शांतता, एकोपा, रोजी-रोटी, स्वतःच्या सत्तेसाठी उद्ध्वस्त करीत आहेत.


भीती हे हत्यार आणि भांडवल वापरून निरंकुश सत्ताप्राप्तीची अमानुष व्यवस्था म्हणजे तालीबान.

सुटाबुटातले, शिक्षित तालीबानी प्रचंड धोकादायक. 

शेवटी धर्मराष्ट्र ना!!!


तुमच्याही धर्मात तालीबानी आहेत. चालू द्यात...

- डाॅ.  प्रदीप पाटील

Pradeep Patil

Friday, September 17, 2021

मूल्यहिन धर्म सत्ता

मूल्यहिन धर्मसत्ता 




तालीबान्यांविरूद्ध जगभर जनमत आहे. पण आता हेही लक्षात येत आहे की धार्मिक मानसिकतेचे आता काही तरी करायला हवे. 

सारे धर्म आता जगाला विनाशाकडे नेऊ शकतात हे पटू लागलेय. सारे धर्म म्हणजे टोकाचे मतभेद आणि त्यांची भेसळ. ही भेसळ जगाला पचेनाशी झालीय. या सार्या धर्मांनी मुल्यं धाब्यावर बसविली आहेत. सत्य, विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन या मुल्यांशी त्यांना काही देणंघेणं नाहीये. मुल्यांची मुखवटे चढविलेली ही सोंगाडी मंडळी आहेत. स्वसंस्कृतीच्या आणि स्वधर्माच्या पल्याडचे सारे झुठ मानणार्या या सोंगाड्यांनी राजकारणाचा वापर करून अनेक स्वधर्मातीलच निष्पापांचे प्राण घेतले आहेत. हे सारे आता विवेकी विचार करणार्यांना लख्खपणे दिसू लागलंय. 

महासत्ता असलेल्या अमेरिकेत 1937 ते 1997 पर्यंत चर्चला जाणारे ७०% लोक होते. मात्र गेल्या दोन दशकात चर्चला जाणार्यांचं प्रमाण ५०% च्या खाली घसरलंय. आणि देव व धर्म न मानणार्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या पंचवीस टक्क्यावर गेले आहे. जे धार्मिक राहिलेत त्यांच्यातल्या राजकीय जाणीवा मात्र तीव्र बनत चालल्या आहेत. म्हणजे त्या लोकशाहीस कडाडून विरोध करणार्या बनू लागल्या आहेत. धर्माचे हे राजकीयीकरण घातक बनू लागलेय. नवा धर्म जन्माला आला आहे....धर्माशिवायचा धर्म! 

अशियात, विशेषतः मध्यपुर्वेत तर धर्म म्हणजे युद्ध अशीच धारणा बनलीय. इजिप्त, ट्युनिसिया सारख्या देशांत चर्चा आरोग्य किंवा शिक्षण यावर झडत नाहीत. धर्माचे वैयक्तिक आणि सामाजिक स्थान यावरील काथ्याकुट करणार्या निष्फळ चर्चा बेसुमार आहेत. त्यातुन जो जो अमेरिकेन तो तो ख्रिश्चन किंवा जो जो भारतीय तो तो हिंदू असा नवा राष्ट्रवाद सुरू झालाय. 

दुसर्या धर्माचे आपल्या देशावरचे हल्ले त्यामुळेच धर्मश्रद्धेवरील हल्ले समजले जात आहेत. ट्रंप यांनी हा "इथनो नॅशनॅलिझम" चाणाक्षपणे उचलला होता. इस्लामवाद्यांनी तो केव्हाच व्यवहारात उतरवलाय. बंदुकासकट. तर भारतात तो आता स्थिरावू लागलाय. 

देशाची व्याख्या जेव्हा धर्माच्या चष्म्यातून केली जाते तेव्हा गटातटाचे तांडव माजते. इस्लामचे अनेक राजकीय गट ते असेच.  

घोळ हा आहे की पारलौकीक किंवा जगाच्या पल्याडच्या गोष्टी या धर्माच्या...आणि रोजरोजच्या दैनंदिन समस्या या राजकारणाच्या..या दोघांची मोट बांधणं म्हणजे अद्भुत चमत्कार म्हणावा लागेल! थोडक्यात मुल्ये आणि व्यवहार शहाणपणाने एकत्र ठेवणारे माईकालाल अजून जन्माला आलेले नाहीत. म्हणुनच व्यावहारिक जगात धर्माचे हसे होत चालले आहे. मुल्यांच्या मागे धावताना व्यवहारात धार्मिकांची दमछाक वाढू लागलीय. फ्रान्समध्ये धर्माची व्यवहारात गरजच नाही असे मत जवळपास ८०% लोकांनी व्यक्त केले आहे. म्हणुनच इस्लामवर जाहीर टीका करण्याचे ते स्वातंत्र्य उपभोगतात. याचा दुसरा अर्थ लोकशाही खिळखिळी करणार्याचे वर्चस्व वाढत जाणार. प्रसंगी हिंसक बनणार्या धर्मासमोर ती टिकून राहणे हे मोठे आव्हान आहे. 

जोवर देव आणि धर्म मानणारे लोकशाही राज्य चालवितील तोवर लोकशाही जनात आणि मनात उतरणार नाही. कारण मनात धर्म नियम असल्याने जनात वावरताना लोकशाही लादल्याची भावना बनते. शासन म्हणते म्हणून नियम पाळतो ही भुमिका लोकशाही अस्ताकडे नेणारी ठरते. लोकशाहीचे नियम पाळल्याने माझा उद्धार होतो हेच मान्य नसेल आणि देव-धर्माच्या भरवशावरच विश्वास असेल तर धर्मराष्ट्रे उगवत राहतील. मुल्याधारित निधर्मी मानसिकता यावर उपाय आहे. आणि तेच अवघड काम आहे!!

तोवर धर्मराष्ट्रांचा उदय होत राहील आणि अस्तासही जातील.

खेळ मांडला.....

- डाॅ.  प्रदीप पाटील 

Pradeep Patil 

नरेंद्र दाभोलकरांचे कार्यकौशल्य

सनातन्यांनांचा पराभव



 "नवीन काय लिहिणार आहेस?" डाॅ.  नरेंद्र दाभोलकर यांनी मला विचारले. 

मी त्यांच्या हातात हस्तलिखित ठेवले. आरेवाडी येथील आंदोलनाच्या बैठकीस त्यांना मी बोलावले होते. कलेक्टर ऑफिस मधली मिटींग संपवून आम्ही घरी आलो तेव्हा त्यांना मी हस्तलिखित दिले.म्हणालो, " वास्तुशास्त्रावर आहे, वाचून सांगा ". 

" हो रे.. वास्तुशास्त्रावर कोणीतरी लिहायला हवे होते. बघतो वाचून " सांगली ते सातारा या प्रवासात दाभोलकरांनी माझे संपूर्ण हस्तलिखित वाचून काढलं. सातार्यात पोहोचल्यावर लगेच त्यांनी मला टेलिफोन केला. म्हणाले, 

"प्रदीप, मी सगळं वाचलं वास्तुशास्त्र."

कसं शक्य आहे? मी विचारात पडलो. जवळपास १६० पानं तीन तासात दाभोलकरांनी वाचून काढली होती. मला तेव्हा लक्षात आले की दाभोलकरांचा वाचन वेग अफाट आहे. कारण माझ्या  पुस्तकांतला बारीकसारीक तपशील त्यांनी सांगितला. 

" वास्तुशास्त्रावर खरे तर मी एवढा विचार केला नव्हता. तुझे हस्तलिखित वाचल्यावर लक्षात आले की याचा आवाका खूपच दांडगा आहे. तू अनेक तपशील गोळा केलेले मला दिसताहेत जे खरोखरच कठीण काम आहे. तुला वेद वाचून काढावे लागले असतील. ते मी समजू शकतो पण प्रदीप, त्याचा जो टेक्निकल भाग कसा काय समजून घेतलास?"

मी डाॅक्टर आणि वास्तुशास्त्रावर कसे लिहिले? याची उत्सुकता त्यांना होती.

मी म्हणालो, " मानसार, मयमत आणि समरांगण सूत्रधार ही वास्तुशास्त्रावरची बेसिक पुस्तके मी पुण्यातून मिळवली. पण आधुनिक वास्तुशास्त्राची माहिती अनेक नामवंत आर्किटेक् आणि इंजिनिअरांना भेटून चर्चा करून मिळवली. "

"ते दिसतंच आहे. खूप सखोल माहिती तू त्यातून मांडली आहेस. वास्तुशास्त्राचा सर्वांगाने अभ्यास केलेला दिसतोय. हे आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे प्रकाशित करू या. वास्तुशास्त्राचा परामर्ष घेणारे हे पहिलेच पुस्तक आहे."



त्यानंतर हे पुस्तक तयार होण्याआधीच दाभोलकरांनी अवैज्ञानिक वास्तुशास्त्रावर परिसंवाद, पुस्तक प्रकाशन आणि जाहिरनामा परिषद हे तीन कार्यक्रम तयार ठेवले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात डाॅ.  श्रीराम लागू यांनी केले. जाहिरनामा परिषद जयंत नारळीकर यांच्या सहीने पुण्यात इंजिनिअरींग काॅलेजात झाली. त्यावेळी मी केलेल्या भाषणात आयन रँडने लिहिलेल्या 'फाऊंटनहेड ' या कादंबरीचा हिरो हाॅवर्ड रोआर्क या नास्तिक आर्किटेक् चा उल्लेख करून म्हणालो होतो..

" जगातल्या पारंपारिक इमारतींची निर्मिती करण्यात मला रस नाही. मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीतून नवनिर्मिती करणार्या इमारती बांधल्या. त्या परंपरांचा अपमान करतात म्हणून मला कुणी मारून टाकेल तर त्याची मी पर्वा करणार नाही..मी नवी शैली समाजात निर्माण करतोय...असे हाॅवर्ड म्हणतो.."

आज २० ऑगस्ट. कादंबरीतला हॅावर्ड रोआर्क प्रत्यक्षात मी पाहिला..अनुभवला.

डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्यरूपात. अखंड कामाचा झंझावात म्हणजे दाभोलकर. 



सनातन्यांनी त्यांच्या या आवाक्याचा धसका घेतला होता. तो त्यांनी भ्याडासारखा संपविला. एक व्यापक कट आखून. 

आठ वर्ष झाली. कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांना न्याय दिलेला नाही.

उद्योगपतीच्या घराबाहेरचा गुन्हा जो रक्तपाताविना असतानाही तात्काळ गुन्हेगार सापडतात. 

विवेकाचे मारेकरी मोकाट आहेत.

सगळे राजकीय पक्ष या बाबतीत एका माळेचे मणी आहेत.

राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही यावर गप्प आहेत. गलिच्छ राजकारण म्हणतात याला.

नथुरामाचे इथले तालीबानी नातेवाईक दाभोलकरांच्या मारेकर्यांचे सत्कार करतील आणि षंढ राज्यकर्ते केविलपणाने नुसते बघत राहतील.

तरीही...

दाभोलकरांचा अंत म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि विवेकाचा विजयच आहे एका अर्थाने. धर्म आणि देव यांना आव्हान देत मुल्यांची पेरणी करत दाभोलकरांनी सनातन्यांनांचा संपूर्ण पराभवच केलाय..आणि तो यापुढेही होतच राहील...

- डाॅ.  प्रदीप पाटील

देवा-धर्माशिवाय जगता येईल का?


 

नैतिक वागण्यासाठी 

धर्माची खरंच गरज आहे का?


मानवी मूल्ये, सदाचार यांचे आकर्षण मानवाला सतत वाटत आले आहे.. स्वार्थ-निस्वार्थ या दोघांची लढाई सतत त्यांचे जीवन व्यापून राहते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा सर्वच स्तरांत मुल्यवादी होऊन जगण्यासाठी धर्मात आधार शोधला जातो. धर्म आता या बाबतीत कालबाह्य होत असला तरी अशी कोणती प्रणाली, विचारधारा, मूल्यवादाकडे नेईल हा प्रश्न आजकाल तत्वज्ञानाच्याच पातळीवर न राहता जैविक विज्ञानाच्या आधारे धुंडाळण्यास सुरुवात झाली आहे. हा वैज्ञानिक शोध घेणारे... "ओरिजिन्स ऑफ व्हर्च्यू" हे पुस्तक कमालीचे धक्के देणारे आहे. ऑक्सफर्ड मध्ये प्राणिशास्त्र विषयावर संशोधन केलेले आणि नंतर पत्रकारितेत उतरलेले मॅट रिडली यांनी जैविक पाया शोधत मूल्यांचा शोध घेत काही निष्कर्ष काढले आहेत. या पुस्तकातील 13 प्रकरणात सर्वांगाने सद्वर्तनाचा ऊहापोह करण्यात आला आहे. सुरुवातीसच लेखकाने झारच्या राजवटीत अराजक माजविण्याचा आरोप असलेल्या प्रिन्स पीटर क्रॉपोटकीनचे तुरुंगातून पळून जाण्याचे उदाहरण दिलेले आहे. त्याचे पळून जाणे हे त्याच्या अनेक सहकार्यामुळे शक्य होते. त्यानंतर लंडनमध्ये आयुष्याच्या शेवटी त्याने 'म्युच्युअल एड' नावाचे पुस्तक लिहून त्यात थॉमस हेन्री हक्सले च्या विचारांचा प्रतिवाद करताना म्हटले...

सफल आयुष्य म्हणजे प्रत्येकाचे सर्वांशी युद्ध असे नसून एकमेकांशी सहकार हेच आहे. 

पण त्याचे हे म्हणणे किती खरे होते? लेखक म्हणतो, क्रोपोटकिनचे म्हणणे अर्धसत्य होय. आपण शोधून काढलेल्या नियमांनी समाज न चालता उत्क्रांत होत असलेल्या पूर्वग्रहांनी चालतो ! आपल्या जैविक प्रेरणा यांचा तो नियमात व्यक्त करण्याचा अविष्कार होय. स्वार्थ हा शब्द मानव जातीत दुर्गुण समजला गेला आहे. खून, चोरी, बलात्कार, भ्रष्टाचार यामागे स्वार्थ तर, सहकार, निस्वार्थ, उदारता, सहानुभूती, विनम्रता हे सदाचार समजले जातात. समूहाचे भले होणे असा हेतू यामागे असतो. कामाची विभागणी करून ते साध्य करण्याचा प्रयत्न माणूस कसा करतो ते 'द व्हिजन ऑफ लेबर' या दुसऱ्या प्रकरणात लेखकाने सांगितले आहे. ॲडम स्मिथचे उत्पादकता आणि किंमत याचे गणित कामाच्या वाटपावर उभारलेले होते. मानवी 'दुर्गुणातून' सामाजिक फायदे होतात हे स्मिथचे मत लेखकास मान्य नाही. एकमेकांच्या नफा मिळवण्याच्या स्वार्थातून समाज आणि जगाचे नफ्याचे तत्वज्ञान उभे राहते. आपल्या पूर्वजांत नवरा-बायकोतील व्यवहार हाही असाच होता. 

' द प्रिझनर्स डिलेमा' या तिसऱ्या प्रकरणात जेव्हा स्वार्थ आणि सामुहिक चांगुलपणा यांचा झगडा होतो तेव्हा सारेच कसे नष्ट होतात हे स्पष्ट केले आहे.

 एकाची यशस्विता समूहास उपकारक नसेल तर ती हेटाळली कशी जाते हे तीन लक्ष पौंडांची लॉटरी जिंकलेल्या मऊरा बर्कच्या उदाहरणातून दिसते. मग माणसे बक्षिसे का देतात? समोरचा माघार घेऊ नये म्हणून किंवा दुसऱ्याने चांगले म्हणावे म्हणून किंवा पत रहावी म्हणुन किंवा उपकाराचे ओझे ठेवायचे म्हणून? खरा निस्वार्थी माणूस बक्षीस देणारच नाही. कारण परतफेडीची उजळणी तो करत नाही. 

'थेअरिज ऑफ मोरल सेंटीमेंटस' या प्रकरणात देवा बरोबरचा नैतिक किंवा मोरल व्यवहार येतो ज्यास व्यापार असं म्हणता येईल. अलीकडचे विचारवंत म्हणतात की या व्यापारात भौतिक स्वार्थापेक्षा इतर गोष्टी प्रभावी ठरतात. वटवाघळे, मुंग्या, बबून्स, यांच्या अभ्यासातून या इतर गोष्टी कोणत्या ते लेखकाने सांगितले आहे. 

सर्व मानव जात निस्वार्थ लोकांना मानते. बहुसंख्यांनी निस्वार्थ होणे आपणास चांगलेच असते आणि आपण व आपले नातेवाईक यांचा स्वार्थ साधणे हेही चांगलेच असते. हाच तो प्रिझनर्स डिलेमा. हेच नैतिक भावनांचे सिद्धांत. 

'द सोर्स ऑफ वॉर' या प्रकरणात लेखक म्हणतो की प्राण्यांमध्ये स्वतः ऐवजी कळपाचे भले व्हावे ही इच्छा असते असे जीवशास्त्रज्ञांना कमी प्रमाणात आढळले आहे. मग माणूस वेगळा कसा? परंपरा, रूढी, ज्ञान, समजुती यातून तो इतरांहून वेगळा. यात अगोदरच्या पिढीची नक्कल करणे हा घटक महत्त्वाचा आहे. मग ते धर्माचे असो नाझीचे वा माओवादी चीनचे! स्थानिक श्रेयसाची नक्कल, सांस्कृतिक नक्कल, भयानक विरोध, सामूहिक बचाव, वेगळे गट बांधणे, हे सारे एकत्र येऊन स्वार्थ प्रवृत्तीकडे प्रवास करतात. लोक असे आंधळे अनुकरण का करीत असतात हे शोधताना लोकप्रिय पाच कारणे या ऐवजी 'माहितीचे लहान धबधबे' हे कारण योग्य असल्याचे दाखवले आहे. म्हणजे इथे व्हाट्सअप फेसबूक इत्यादी सोशल मीडियावरील हे माहितीचे लहान धबधबे किती महत्त्वाचे ठरतात हे लक्षात येईल. ते समूहाशी एकनिष्ठ राहतात कारण त्यांचा स्वार्थ कोणता ते समूह जाणतो व ही माहिती तो प्राप्त करतो म्हणून. 

टीम स्पिरीट रहावे म्हणून एकत्रित नाच आला आणि समूहाशी बांधीलकी दाखवण्यासाठी संगीत आले. मग ते मंत्र, फुटबॉल, गीते वा राष्ट्रगीते असोत. यातून आम्ही व ते असे फरक आले. 

'इकॉलॉजी अॅज रिलिजन' प्रकरणात लेखकाने आजच्या अतिरेकी पर्यावरणवाद्यांचे वाभाडे काढले आहेत. जंगलातील आदिवासी पर्यावरण रक्षक आहेत हे साफ खोटे आहे. पर्यावरण हेच मुळी विविध जीवांच्या संघर्षावर आणि नाशांवर उभे आहे. तंत्र-मंत्र आणि धार्मिकीकरणाने तर पर्यावरणाचा अधिकच र्‍हास झाला आहे. 

'द पाॅवर ऑफ प्राॅपर्टी' या बाराव्या प्रकरणात वित्ताचे देशीकरण करणे कसे धोक्याचे आहे व सदाचारविरोधी ठरते हे सांगितले आहे. यात उत्तर भारतातील अलमोर जिल्ह्यातील व 1921 मधील वन पंचायत अॅक्टचे उदाहरण आहे. योजनांचे विकेंद्रीकरण हे योग्य आणि मानवी मूल्यांचे जास्तच जपणूक करणारे ठरते. वित्त रक्षणाची हमी नसल्याने तिसऱ्या जगात दारिद्र्य आहे. वित्त निर्मिणे हे सदाचारात बसत नाही आणि त्याचा साठा हा तर भयंकरच, व तो सामाजिक बहिष्कार आणि मत्सरांना जन्म देणारा ठरतो. 

'ट्रस्ट' या शेवटच्या प्रकरणात मानवी मूल्यांची निर्मिती वैज्ञानिक तथ्थांचा आधार घेत कसे करता येईल याचे सुंदर विवेचन आहे. मानवातील कलह आणि शोषण रचना हे मानवाच्या डोक्यातून उगम पावतात. निसर्ग, संगोपन, सरकार, हाव, देव ही बाह्य कारणे आता टाकून द्यायला हवीत. एकमेकांवरचा विश्‍वास आपणास चांगल्या मुल्यांकडे नेईल. थॉमस हॉब्जचा वाईटपणा विरुद्ध जीन जॅक्स रोसाऊचा चांगलेपणा असा हा वाद आहे. हॉब्ज-स्मिथ-माल्थस-डार्विन असे वास्तव खोदणारी परंपरा त्यातून आता ती स्टीफन गुल्ड- डॉकिन्स पर्यंत आलेली आहे. विश्वास हा आहे की वैज्ञानिक विचार पद्धती मूल्यवादी समाजरचनेकडे नेईल.

मॅट रिडलीने हे अतिशय ओघवत्या भाषेत सहज समजेल अशा शैलीत पटवून दिले आहे. मानवाच्या मूलभूत प्रेरणा आणि मूल्यवादी समाजरचना यांची सांगड कशी घालायची या प्रश्नाचे बव्हंशी उत्तर या पुस्तकातून मिळते. देव-धर्माशिवाय चांगले कसे जगावे असे वाटणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.

- डाॅ.  प्रदीप पाटील

मनोशारीरिक व्याधी

 "हे बघा डॉक्टर, डाव्या हाताची ही... खांद्यापासून या या बोटापर्यंत येणारी शीर आहे बघा.. ही सारखी सुंद होते ! कधी ठणकते आणि सारख्या मुंग्या येतात बघा.. "

जगुबाई सांगत होती. 

मी रिपोर्ट पाहिले. ती अनेक वर्षे उपचार घेत होती. विटामिन्सची  इंजेक्शनं तीने घेतली होती. वेदनाशामक गोळ्या तर किती खाल्ल्या असतील त्याची गणतीच नाही. मानेचा, हाताचा एक्‍स-रे काढला. काहीच त्यात सापडले नाही. जगुबाई जी शीर दाखवत होती ती मुळात शीर नव्हतीच. कारण अॅनाटॉमी नावाच्या शरीररचना विज्ञानानुसार ती दाखवत असलेल्या शीरेच्या जागा चुकीच्या होत्या. याचा अर्थ जी शीर तिच्या शरीरात अस्तित्वातच नव्हती, ती दुखत आहे असे ती का सांगत असावी? 38 वर्षाच्या जगू बाईचा नवरा, मुले सारेच वैतागलेले. कारण शिरेतल्या मुंग्यांनी त्यांच्या डोक्याला मुंग्या आणलेल्या होत्या !!

"जगुबाई...हल्ली बरेच रोग निघालेत... आपल्या नातेवाईकांना, कितीतरी जणांना कोण कोणते रोग होतात बघा कळतच नाही..." हे मी माझ्या पहिल्याच कौन्सिलिंग सेशनमध्ये जगूबाईशी गप्पा मारताना म्हणालो. तशी जगूबाई खुलली. म्हणाली, 

"डॉक्टर, माझ्या चुलत बहिणीला मागल्याच वर्षी मरण आलं आणि......."

मग त्यानंतर तिने सर्व कथा मला ऐकवली. 

जगुबाईची चुलत बहीण राणूबाईच्या दोन्ही हातात मुंग्या यायच्या आणि हात सुंद व्हायचे. त्यानंतर तिच्या शरीरातील इतर काही नसांमध्ये बिघाड झाला. मग तिला उठता बसता येईना. जेवण कमी होत गेले. मग मोठ्या हॉस्पिटलात ऍडमिट केले. तेव्हा जगूबाई तिला बघायला हॉस्पिटलात गेली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राणूबाई वारली.  त्यानंतर चार महिन्यांनी जगूबाईच्या हाताला मुंग्या सुरू झाल्या !! 

"कधीकधी खूप भीती वाटते.. ही शीर बाद झाली तर?" 

जगुबाई घाबरलेल्या चेहऱ्याने मला विचारत होती. 

जगुबाईचा हा रोग शारीरिक नव्हता. ना तीची शीर बाद झाली होती. ना तीला गंभीर कुठलातरी रोग जडला होता. आपल्यालाही राणूबाई सारखा आजार झाला तर ? या समजुतीतून तिच्या हाताला मुंग्या येणे चालू झाले होते. थोडक्यात ही समजूत मनामध्ये पक्की झालेली असल्याने हळू हळू एक आजार "तयार" होत जातो. हा असतो मानसिक विचारांचा आजार. जेव्हा केव्हा ताण वाढेल तेव्हा आपण घट्ट धरून ठेवलेल्या चुकीच्या समजुती उफाळून वर येतात आणि त्याची तथाकथित लक्षणं दिसायला लागतात. ती फक्त पेशंटलाच दिसतात. ती डॉक्टरांना किंवा इतरांना दिसत नाहीत. म्हणजे इथे मनातील समजुती या शारीरिक लक्षणं निर्माण करतात. ही लक्षणं रोगाची नसून मानसिक समस्या जी निर्माण झालेली असते त्याची असतात. म्हणून या व्याधीला मनोशारीरिक व्याधी म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये "सोमॅटोफॉर्म डिसॉर्डर" म्हणतात. पुर्वी याला हायपोकाँड्रियासिस  म्हणायचे.  खरेतर ही विचार विकृती आहे. हा रोग नव्हे. 

जगुबाईच्या डोक्यात बसलेली ही घट्ट समजूत तिच्या हातात मुंग्या निर्माण करत होती. जगूबाईला वेळीच माझ्याकडे आणल्यामुळे मी तिच्या मनातून ही समजूत जाण्यासाठी, पहिल्यांदा, ती समजूत कशी आली आणि कशी तयार झाली आणि ती समजूत ही लक्षणे कशी निर्माण करते हे तीला सांगितले. रोग होईल ही भीती याच्या मुळाशी असते. ज्याला नोसोफोबिया म्हणतात. यासाठी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी नावाचे तंत्र वापरले. जगुबाईच्या हाताच्या मुंग्या संपूर्ण नाहीसे होण्यासाठी पुढे आठ महिने जावे लागले. पण त्यासाठी मी सांगितलेला मानसिक व्यायाम इमानेइतबारे करण्याचे श्रेय तिचेच. 

अशी अनेक उदाहरणे आपणास दिसून येतात. उदाहरणार्थ... 

छातीत सतत डाव्या बाजूला दुखणे आणि समजूत मनात बाळगणे माझे हृदय बाद झाले आहे आणि मला हार्ट अटॅक येणार! 

पोटात विशिष्ट ठिकाणी दुखणे आणि समजूत अशी बाळगणे की पोटात गाठ झाली आहे किंवा अपेंडिक्स झाला आहे.

 डोके सतत दुखणे यामागे समजूत अशी असते की डोक्यात बहुदा ट्यूमर झाला असावा किंवा एखादी गाठ असावी ! 

वजन कमी होतंय मग नक्कीच एडस् रोग झाला असणार.

या सर्व चुकीच्या समजुती असतात आणि त्याच रोग निर्माण करतात. या जर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राहिल्या तर मात्र तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. 

अशा समजुती बाळगणारे पेशंट एका डॉक्टरकडे कधीच टिकत नाहीत. ते एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे सतत फिरत राहतात. ते सतत वेगवेगळ्या चाचण्या आणि तपासण्या करत राहून अनाठायी खर्च करत राहतात. जर या समजुतींना आधार देणारी अशी एखादी श्रद्धा जर त्यांनी उचलली तर त्यांचं हे दुखणं तात्पुरतं नाहीसं होतं. म्हणजे जर ते एखाद्या महाराजाकडे गेले किंवा मांत्रिकाकडे गेले आणि त्यांनी अंगारा-भंडारा दिला आणि आता त्यांचा रोग बरा होणारच असा विश्वास दिला तर त्यांची लक्षणे कमी होतात. बऱ्याच वेळा अनेक पेशंट सांगतात की अमुक एक वार केला, उपवास केला, दर्ग्याला गेलो, महाराजांची वारी केली, नवस बोलला आणि माझा रोग पूर्ण बरा झाला किंवा आयुर्वेद, होमिओपॅथी, अॅक्युप्रेशर, युनानी, रेकी, योगा केलं !! जो रोग डॉक्टरच्या कुठल्याही औषधाने बरा झाला नव्हता तो बरा झाला!!! वास्तवात त्याला कुठलाच रोग झालेला नसतो. मनोशारीरिक रोग असतो आणि या सायकोसोमॅटीक रोगाचा गैरफायदा बुवा, महाराज, मांत्रिक, धार्मिक आचार विधी, आणि विविध यात्रा-जत्रातील नवस घेतात. आणि जेव्हा मनोशारीरिक व्याधी अशा बुवा महाराजांच्या मुळे बरी झाली असे म्हणतात तेव्हा ती पूर्ण बरी झालेली नसते कारण त्यांची "एक" समजूत नाहीशी झालेली असते. पण अशा समजुती तयार करण्याची त्यांची मानसिकता तशीच राहिलेली असते. ती मानसिकता दुरुस्त होत नाही. त्यामुळे छातीत दुखायचे थांबते.. पण नंतर कालांतराने डोकेदुखी सुरू होते आणि अशी अनेक लक्षणे अल्टुनपालटून चालू राहतात. त्यांच्या समजुती समूळ नाहीशा करणं हा त्यावरील उपाय आहे. आणि त्यासाठी सायकोथेरपिस्टकडे किंवा मानसोपचार तज्ञाकडे जाणे हिताचे असते. विशेष म्हणजे अनेक डॉक्टर्स हे देखील अशा मनोशारीरिक व्याधींकडे मेंटल आहे म्हणून दुर्लक्ष करतात. पण ते त्यावर मानस तज्ञांकडे जा असे सांगत नाहीत. आणि मग पेशंट आपला खिसा रिकामा करत अनेक डॉक्टरांकडे हिंडत राहतो. समाजात पसरलेल्या आरोग्याविषयी अनेक गैरसमजुती आहेत. दारोदारी अनेक जण असे आहेत की ते स्वतः डाॅक्टर असल्याच्या थाटात रोगांविषयी सल्ले देत असतात. त्यात वृत्तपत्रातले ऋषितुल्य लेखकही आले. हे सर्व नोसोफोबिया वाढायला मदत करतात. 

असे जर कोणते लक्षण तुम्हाला व तुमच्या ओळखीच्यांना असेल तर तात्काळ समजुती दुरूस्त  करून घ्या !! 

- डॉ. प्रदीप पाटील

माझे वर्तवलेले भविष्य!



 माझे भविष्यच फुटके निघाले.

ज्योतिषी ताकदीचा होता. पारंगत होता.

म्हणून जन्मतःच कुंडली केली.

मस्त अक्षरात ज्योतिष भास्कर उर्फ शिरोमणी जोशीबुवांनी लेखी भविष्य वर्तविले. 

पहिल्या वाक्यातच मी चितपट झालो.

जोशीबुवा म्हणतात...


" हा मनुष्य दानधर्म व जपोजापी करणारा असेल."


दुसर्या भविष्य वाक्यात मी सपाट झालो...


" ईश्वरी उपासनेत रस घेईल "


मी फारच वाईट्ट निघालो या बाबतीत. रस घेतलाय पण तो ईश्वरभंजनात. 

पुढे प्रकांड ज्योतिषी म्हणतात..


"नमोकार मंत्राचा जप केल्यास  आणि दानधर्म केल्यास याला विशेष चांगले फळ मिळेल. "


भारीच ना? मी चक्क सनातन बनलो. मंत्र-तंत्रांना उद्धस्त करत आलोय म्हणजे पाप काही फिटणार नाही. फळ-बिळ लै लांबची गोष्ट. 


" याला गुप्तधन मिळण्याची शक्यता आहे "


जोशीबुवांकडून हे गिफ्ट कुंडलीत मिळालं खरं पण आज अखेर घोर निराशा पदरात घेऊन गुप्तधन शोधत हिंडतोय. 

काही उपाय सुचतोय का माॅडर्न काॅम्प्युटरवाल्या ज्योतिषांना? कुंडली पाहून तेवढे गुप्तधन मिळवून द्या. फिफ्टी फिफ्टी करू या.

जोशीबुवांनी एकच भविष्य अचूक वर्तवलय..


" १३ ते १८ वर्षात कामासक्त होईल "


या जगात कुणी आहे का या वयात कामत्यागी असणारं?

असलाच तर डाॅक्टरी प्रॉब्लेम असणार राव !

एक सुचलंय. तुम्ही तुमचं लहापणीचं ज्योतिषाचं भविष्य शेअर करा. 

तसं ज्योतिषशास्त्र भंपक आहेच. पण मनोरंजन मुल्य अफाट आहे. 

करा मग शेअर. सगळे मिळून एंजाॅय करू या.

प्रारब्ध..ललाट...नियती..वगैरे वगैरे. 

- डाॅ.  प्रदीप पाटील

नव्या वाटा



 मी काही पर्याय सुचवतो.. 

पटतायत का बघा..

🔸️घर बांधले की पूजा घालण्याऐवजी बांधकाम व घरउभारणीकाम केलेल्या सर्व कामगारांना जेवण घालावे. 

🔸️घरातील स्त्री गर्भवती झाली तर आजुबाजुला असलेल्या ओळखीच्या व नात्यातील सर्व स्त्रियांना बोलावून सोप्या भाषेत सांगणार्या स्त्री रोग तज्ञ व प्रसुती तज्ञास बोलावून चर्चासत्र ठेवावे.

🔸️बारसे घालण्याऐवजी मानसतज्ञ व बालरोगतज्ञाशी गप्पा व बालसंगोपन-पालकत्व या विषयावर देवाण घेवाणीत दिवस घालवावा.

🔸️पहिल्या पाळीवेळी प्रेम, मैत्री व लग्न या विषयी प्रश्नोत्तरे कार्यक्रम ठेवावा. या साठी मानसतज्ञ व लैंगिक विज्ञान तज्ञ असावेत.

🔸️पहिल्या वीर्योद्भवाचे स्वागत करतेवेळी पुरूषत्व आणि जबाबदार्या याविषयी संप्रेरक तज्ञ व मनोरोग तज्ञ यांच्या मुलाखती व चर्चा घ्याव्यात. 

🔸️लग्नाच्या निर्णयाअगोदर नातेसंबंध, वैवाहिक जबाबदार्या आणि समस्या यावर मंथनचर्चा समुपदेशक, कायदा तज्ञ व समाजसेवा वैज्ञानिक यांच्या चर्चेने घ्यावे.

🔸️सर्व वाढदिवस दरवर्षी आधुनिक वैद्यकीय तज्ञाच्या रोग व उपाय या विषयावरील 2 तासांच्या व्याख्यान व प्रश्नोत्तरे घेऊन साजरे करावेत.

🔸️मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तींच्या आठवणी सांगणार्या सर्वांना सोयीचा दिवस घेऊन सर्वांना मनमोकळे बोलू देऊन जेवण घालावे. 

🔸️दर महिन्याला एका वैज्ञानिकाच्या शोधावर आपल्या वाॅर्डात त्याच्या वाढदिवशी वैज्ञानिक शोधाच्या माहितीचा कार्यक्रम घ्यावा.

सर्व कार्यक्रमांचा खर्च वाचवून प्रामाणिक व लोकशाहीवादी सामाजिक संस्थांना दान करावा.

पुजारी, पूजा, विधी, पारायण, इ. सर्व धार्मिक व दैवी कर्मकांडे नाकारावीत. 

त्यांचा आयुष्यातील कोणत्याही प्रसंगात शुन्य उपयोग असतो.

जेवण आणि नटणे-थटणे एवढेच न करता हे केले तर जगण्याची दिशा सापडेल.

विवेकवादी होऊ इच्छिणार्यांसाठी ही विवेकी पावले आयुष्य सुसह्य व आनंदी करतील.

- डाॅ.  प्रदीप पाटील

जाळण्याचा पुरूषार्थ!



 "सेक्स" कायमचा जाळून टाकता आला असता तर बरे झाले असते... 

म्हणजे निदान कामसूत्र ग्रंथ तरी जाळण्यासाठी जाळणारे जन्माला आले नसते !!

सेक्स ही आदिम प्रेरणा आहे. त्यातूनच तर प्रत्येक जीव जन्माला येतो आणि या जगात विविध अविष्कार तो निर्माण करत राहतो. 

खरं तर या जगाची जननी विविध अशा मैथुनाची निर्मिती आहे... मग ते मैथुन रासायनिक अभिक्रियांचे असो जीवांचे असो वा सूक्ष्मात सूक्ष्म अणूंचे असो.

 ज्या हिंदुधर्माचा आंधळा जयजयकार करत कामसूत्राची होळी परवा गुजरातेत केली त्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेला पुरुषार्थ हा जाळण्यासाठी नव्हता, नाही...

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही देवांनी दिलेली हिंदूंना जगण्यासाठीची आज्ञा आहे. यात काम म्हणजे प्रेम आणि सेक्स. तेच तर एकत्र करून वात्सायन नावाच्या ऋषीने लिहून काढले आणि आयुष्यभर संशोधन करून जे निष्कर्ष काढले, मग भले ते अवैज्ञानिक असोत पण संशोधन वृत्ती तर दाखवली ! त्या वात्सायन ऋषीने कामसूत्र लिहून काढला तो फक्त सेक्स चा ग्रंथ नाही. तो स्त्री-पुरुषांनी एकत्र आल्यावर कशा तऱ्हेने नातेसंबंध ठेवावेत याचे विवरण करतो. 

म्हणजे इथे जाळणारे स्वतःच्या धर्मालाच जाळत आहेत. तालिबान्यांना नावे ठेवणारेच स्वतः जाळपोळ, तोडफोड यावर श्रद्धा ठेवणारे आहेत. आणि..

 त्यावरच तर आजचे राजकारण उभे आहे.

सुवासिक धूप, मेणबत्या, संगीत, सुवासिक तेले हे सेक्स मध्ये कसे उपयोगात आणता येतात एवढेच कामसूत्रानेच फक्त सांगितलेले नाही. तर योग सुद्धा सेक्स कसे करावा हे सांगतो. 

योगा हे तंत्रमार्गातून अवतरले आहे. तंत्रमार्ग म्हणजे तांत्रिक विद्या आणि यात सेक्स विषयी भरपूर काही सांगितले गेले आहे. 

तंत्र मार्गावरील अनेक पुस्तके आहेत. ती हिंदूच आहेत. योगमार्गातील असलेल्या अनेकांना भुजंगासन हे प्राचीन आसन माहित असेल. या आसनाचा पहिला उल्लेख घेरण्ड संहिता या पुस्तकात आढळतो. त्याच बरोबर 'हठयोग प्रदिपिका' हा एक प्राचीन ग्रंथ आहे. ज्यामध्ये पुरुष लिंग, पुरुष अंडकोष आणि लिंगभाग आणि सेक्स याविषयी भरपूर लिहिले गेले आहे. भुजंगासन हे सेक्स प्रदीप्त करते असे यातून दर्शविले आहे. 

मग ही पुस्तके जाळायची का? 

याच योगाचा आधार घेऊन अनेक हिंदू बुवा तयार झाले आणि ते अमेरिकेत युरोपात सुद्धा गेले. तेथे त्यांनी योगा शिकवता शिकवता अनेक सेक्स स्कॅंडल केलेली आहेत. उदाहरणार्थ, स्वामी रामा हे तीस वर्षापूर्वी पेनिन्सिल्व्हिया येथे आश्रम चालवायचे. एका 19 वर्षाच्या मुलीने लैंगिक छळाच्या आरोपाखाली त्यांच्यावर कोर्टात केस दाखल केली आणि हे महाशय आपला पोकॉनो फुटहिल्स येथील आलिशान आश्रम सोडून भारतात पळून आले!! पण त्या मुलीला पाच वर्षानंतर दोन लाख डॉलर्स  अशी भरपाई द्यावी असा कोर्टाने आदेश दिला.  

भारतात तर अशा अनेक सेक्स गुरूंनी अनेक महिलांना फसवले आहे, लुटले आहे. त्यावेळी कामसूत्र जाळणारे लपून बसलेले होते ! तेव्हा धर्म धोक्यात आलेला नव्हता !! मग योगा आणि योग गुरु यांनासुद्धा शिक्षा द्यायला नको काय?

 तंत्रविद्येत कुंडलिनी नावाच्या अवैज्ञानिक मताला खूप महत्व दिले जाते. अगदी कार्ल जुंग या मानस तज्ञाने सुद्धा कुंडलिनी जागी करण्याची विद्या शिकायचा प्रयत्न केला होता. कुंडलिनी म्हणजे अत्युच्च काम आनंद देणारी चक्रं होत असे प्रतिपादन अनेक तांत्रिकांनी केले आहे. ज्या कमळाला निवडून सत्तेवर बसविले आहे ते कमळ कुंडलीनी चक्रात ह्रदय चक्रात जेव्हा उमलते तेव्हा काम जागा होतो हे खुद्द वात्सायन म्हणतो. मग म्हणून जाळणार्या धर्मवीरांचा राग आहे की काय कामसुत्रावर? हे तर तालीबान्यांनी मुसलमानानांच मारून टाकल्यासारखे नाही का होणार? आता मग या कमळाचे काय करावे? 

बरं हे फक्त भारतातच घडले आहे असे नाही. हे कामसूत्र जाळणारे हिंदुत्ववादी धर्मांध ज्या मुस्लिमांना शत्रू मानतात त्या धर्मात देखील कामसूत्रासारखी पुस्तके आहेत. अरबी भाषेत लिहिलेले 'अल् रौद अल् अतीर फी नुझहद् अल् हतीर' सारखे ग्रंथ अरबी कामग्रंथ आहे.

आता बुद्धाचा पुतळा फोडणाऱ्या तालिबान्यांना हा ग्रंथ जाळण्याची प्रेरणा आमच्या भारतातले धर्मवीर देऊन मोकळे झालेले आहेत. 

लैंगिक विज्ञान हे संशोधित करणाऱ्यांचा सन्मान या समाजात कधीही झालेला नाही. धर्माने तर सातत्याने लैंगिकता ही त्याज्य ठरवत आणलेली आहे. अध्यात्माच्या नावाखाली सर्वसंगपरित्याग नावाची भोंगळ कल्पना सेक्सच्या मुळावर कायम उठलेली आहे. प्रश्न असा आहे, ज्या कामक्रीडेमुळे आपण जन्माला आलो तिचा ग्रंथ जाळणे म्हणजे स्वतःला जाळण्यासारखे आहे. 

नाहीतरी सध्यातरी राजकारणासाठी काहीही जाळायला शूरवीर धर्मवीर तयारच आहेत. 

सर्वच धर्मातले.  

तोच तर खरा धर्म आहे !

कामसूत्रा बरोबर 'कामा'चे महत्त्व सांगणाऱ्या देवादिकांनी निर्देश केलेल्या कोकशास्त्र उर्फ रतीशास्त्र, अनंगरंग, रतीरहस्य, समरदिपिका, जयमंगल, रतीमंजिरी, रतीअर्थदिपिका, कामाट्टुपल, इ. असे अनेक ग्रंथ आहेत. या साऱ्याच ग्रंथांना खरेतर मानवी जीवनाचा एक पैलू निर्भीडपणे मांडल्या बद्दल सन्मान द्यायला हवा. युरोपातल्या 'स्पेक्युलम दा फोदरी',  आफ्रिकेतील 'लिबर द काॅयटू' सारखे जगभर अनेक ग्रंथ हे त्या त्या देशांनी जपून ठेवले आहेत. त्या देशातील धर्मांध जेव्हा जागे होतील तेव्हा ते जाळून टाकण्याचा हिंदुस्थानचा आदर्श मात्र नक्कीच घेतील. 

खरेतर लैंगिक विज्ञानात थोर काम केलेल्या किन्से, मास्टर्स  आणि जाॅन्सन यांच्या सेक्स वरील संशोधनावर पाणी फिरवण्याचे काम त्यावेळी धर्मांधांनी केले होते पण ते त्यांना पुरून उरले होते. म्हणूनच तेथे १९७० च्या दशकात कामक्रांती किंवा सेक्शुअल रिव्होल्युशन झाले. आणि स्त्री-पुरुष समानतेबरोबरच लैंगिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.

धर्मज्वर चेतवत ठेवून सत्ता राखायची थेरं आता स्वधर्मातीलच एका पुरूषार्थावर उलटली आहेत. जाळणे, तोडणे,  मारणे, आणि सर्वार्थाने फेकणे हा पुरूषार्थ प्रछन्नपणे बागडतोय या देशात!

या देशात योनींची मंदिरं आहेत. योनिदेव्या आहेत. अघळपघळ पसरलेल्या इथल्या लैंगिक जाणिवांचे सामाजिक अविष्कारही बहुविध आहेत. कोणाला कोणाला जाळणार?

- डाॅ.  प्रदीप पाटील

श्रद्धा-अंधश्रद्धेच्या कचाट्यातून समाजास बाहेर कसे काढता येईल?



 अंधश्रद्धा निर्मूलन ही वैचारिक परिवर्तनाची लढाई आहे.

 वैचारिक हा शब्द मेंदूशी निगडीत आहे. 

मेंदूचे वैज्ञानिक आकलन आज संपूर्ण होणे बाकी आहे. मनोविकार आणि मनोविकृती या दोन पातळ्यापर्यंत, सदोष मनोव्यापाराचे आकलन झाले आहे. 

स्मृति, भावना, बुद्धी, जाणीव-नेणिवेचा व्यवहार, मनोशारीरिक संबंध अशा अनेक गोष्टी आज हळूहळू उलगडत आहेत. बुद्धीचे ठिकाण समजले असले तरी त्याची निर्मिती जैविक आहे की परिस्थितीनुसार आहे की इतर कोणती कारणे आहेत हे अजून निश्चित व्हायचे आहे. 

या मेंदूतून निर्माण होणारी श्रद्धा ही भावना आहे. या भावनांचे सामूहिकीकरण होते तेव्हा त्यातून प्रतीके आणि भावना व्यवहार यांची अनेक तत्त्वज्ञाने जन्माला येतात. भावनिक पातळीवर त्यांचे नियम बनून संहिता-ग्रंथही तयार होतात. काही त्यातील धर्म बनतात तर काही संप्रदाय !! बुद्धीची उत्क्रांती ही मानवाच्या रूपाने उन्नत होत चालली असली तरी ती भावनेच्या उत्क्रांतीच्या इतिहासापुढे फारच नवखी गोष्ट आहे. प्राण्यातून पुढे सेपियन आणि आजचे आपण हे याचे उदाहरण. श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यात प्रभावी काय ठरते आहे ही गोष्ट यामुळे सहज लक्षात येईल. 

भावनिक व्यवहारातून भावनादोष निर्माण झाल्यावर भ्रम, भास, अगतिक भाववृत्ती, समर्पित भाववृत्ती, अशा गोष्टी निर्माण होऊ लागतात. तीच गोष्ट बुद्धीच्या व्यवहाराबाबतही म्हणता येते. विचारविकृती पासून आकलनदोषापर्यंतचे अनेक प्रकार यात मोडतात. बुद्धी व भावनांचा समन्वय योग्य की त्यात दोहोंपैकी एखादेच डावे-उजवे हा वाद अजूनही चालूच आहे. एवढी सारी अनिर्णित अवस्था असताना गांधीवादापासून मार्क्सवादापर्यंतचे हवाले देत अनेक विचारवंत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे मूल्यमापन करतात तेव्हा ते एक नवेच (पण जुनेच) तत्त्वज्ञान मांडत असतात हे दिसून येते. 

म. फुल्यांपासून गांधींपर्यंतच्या कृती मानवांचा इतिहास हा सापेक्ष व विभिन्न आहे. फुल्यांचे सत्यशोधकी बंड हे धार्मिक प्रश्नांना आणि परिणामांना  जेवढ्या खोलवर हात घालणारे ठरले तेवढेच ते अल्पायुषी आणि अप्रिय ठरले. इंग्रज आणि भारतीय यांच्या द्वंद्वातून सारासार विवेकच प्रमाण मानून चालताना अनेक वेळी फुल्यांना वैज्ञानिक प्रगतीच्या अभावी पारंपारिक विचारांचाच आधार घ्यावा लागला आहे. गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीची उभारणी करण्यासाठी अध्यात्मिक आचरणाची आखणी केली. अध्यात्मिक आचरण म्हणजे मूल्यात्मक आचरण नव्हे. कारण धर्ममताच्या मर्यादा आणि बंधने अध्यात्मास पडलेली असतात. या अर्थाने गांधींनी आपली धार्मिकता गडद करीत धर्मभेद व धर्म चिकित्सा केली नाही, तर स्वातंत्र्य चळवळ केली. भारतातील स्थितीशील आणि प्रचलित धार्मिक समुदायास गांधींच्या या उन्नत धार्मिक प्रतिमेची भुरळ पडून 'मसीहा' तयार झाल्यावर लोक स्वातंत्र्यलढ्यात ऊडी ठाकते झाले. गांधींनी केलेला जातिभेद निर्मूलन कार्यक्रम म्हणूनच लोकांनी नाकारला. आंबेडकरांच्या भाषेत 'अव्यवहार्य' ठरला. म्हणजे येथे व्यवस्था सुधारताना शत्रु परकीय, भिन्न धर्माचा, शोषक, अत्याचारी आणि बिन नात्याचा होता. देशबांधव नव्हता.  त्यामुळे ही लढाई आस्तिक्य-नास्तिक्य व श्रद्धा-अंधश्रद्धा यांची नव्हती.  अनेक विचारवंत हे भान न ठेवता "गांधी प्रतीमानास" (माॅडेलला) विवेकाचे अध्यात्मिकिकरण करून स्वीकारण्याचा पर्याय ठेवतात. तो पर्याय फार तर आर्थिक विकास विकृती निवारणार्थ, पर्यावरण संवर्धनास, किंवा तत्सम धार्मिक प्रश्नांच्या निवारणासाठी उपयोगी ठरेल. साधनशुचिता, साध्यविवेक या गोष्टींचे "भांडवल" वापरून या चळवळी करता येतील. अंधश्रद्धा निर्मूलनात एवढेच फक्त येत नाही हे नेहरूंच्या लक्षात आले होते. नेहरू प्रतिमान किंवा माॅडेल हे स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याच भाईबांधवांशी जबाबदारीने करावयाचे कृत्य होते. गांधी-नेहरू प्रतिमानांच्या व्यवस्थेत आणि अंमलबजावणीत इतका टोकाचा फरक होता.

भावनिक देश उभारणीचा आणि धर्मस्वरूप निश्चित न झालेला तो काळ आज सरला आहे. आज सोशल मिडियामुळे नवा काळ समोर आहे. माहिती-तंत्रज्ञानापर्यंतच्या आजच्या वैज्ञानिक युगात प्रश्नांचे संदर्भ पूर्ण बदलले आहेत. तेथे आज गांधी-नेहरू प्रतिमान तर सोडाच पण मार्क्स प्रतिमान सुद्धा अपुरे ठरत आहे. 

बुद्धी विकास हा स्वयंप्रज्ञ असल्याचा दावा करणाऱ्या काहींची फुले-आंबेडकर-गांधी प्रतिमानांच्या प्रभावातून सुटका न होणे हाच खरा तर अंधश्रद्धा निर्मूलनास मारक ठरतो आहे.  कारण विचारवंतांनी दिशा देताना इतिहासाचे आकलन ठेवावे पण जुनाच मसाला भरू देऊ नये. कारण त्यात प्रतिमानांची गुलामीच असते. नवा विचार, नवी दिशा, नवे नियम हे बुद्धिप्रामाण्यवादाबरोबरच वैज्ञानिक वृत्तीचे लक्षण ठरते. इतिहास कुरवाळून शुद्धतावादी, परिवर्तनवादी, शोषण विरोधी, ऐतिहासिक प्रतिमानांचे उन्नयन करून आपण प्रतिगाम्यांचीच नक्कल करीत आहोत हे भान ठेवावयास हवे.

शरीर रोगांच्या अंधश्रद्धा आज गळून पडल्या आहेत. कारण विज्ञानाने या शरीररोगांवरील प्रभावी उपाय दिले आहेत. ज्या क्षेत्रात विज्ञान अजूनही अपयशी ठरत आहे ती क्षेत्रे अंधश्रद्धांना मोकळी आहेत, त्याच क्षेत्रात अंधश्रद्धांचे थैमान सुरू आहे. कोव्हीड रोग हे ताजे उदाहरण आहे.  ध्यानधारणा-रेकी पासून मनोशारीरिक रोगापर्यंतची नवनवीन खुळे बाजारात येतच आहेत. चळवळीचे मूल्यमापन करताना हा अपुरेपणा ध्यानात ठेवावा लागतो. शरीर रोगांच्या अंधश्रद्धा उपचारांना जसे प्रभावी वैज्ञानिक उपचारांचे पर्याय उपलब्ध झाले तसे मनोव्यवहारांच्या विकृतींना-समस्यांना नाही ही चळवळीची आजची मर्यादा आहे. मनोव्यापारातील स्किझोफ्रेनिया, मॅनिया, डिप्रेशन या रोगांवर आज प्रभावी उपचार असले तरीही त्यांचे निवारणातील सातत्य टिकवणारी पद्धती व यंत्रणा अस्तित्वात नाही. जनमानस हे जेव्हा श्रद्धोपचारांकडे वळते, धार्मिक उन्मादांना बळी पडते,  शोषणाचे वाहक बनते, तेव्हा त्यांना गांधी प्रतिमान देऊन धर्मनिरपेक्ष का बनवता येणार नाही, हे इथे समजेल.

 व्यवस्थेतील असंख्य दोष हे मनोदोषांना जन्म देतात हे जसे खरे तसेच जैविक प्रेरणा आणि जैविक तथ्ये हे सुद्धा मनोदोषांचे धनी असतात. 

श्रद्धा-अंधश्रद्धा ही रोगट मानसिकतेची लक्षणे आहेत काय ? असा प्रश्न विचारून व्यवहार्य श्रद्धा, निकोप श्रद्धा, डोळस श्रद्धा, असा एक खेळ खेळला जातो. श्रद्धा हा मानवी व्यवहारांचा पाया नाही; मात्र भयबद्ध मनाचा आधार आहे. त्याचे फायदे तात्कालिक आणि छद्म स्वरूपात असतात. त्यामुळे प्रदीर्घ संघर्षाचा मार्ग सोडून श्रद्धेचा शॉर्टकट प्रचंड लोकप्रिय ठरून आचरणात आणला जातो. नेणिवेत डोकावले तर हा शॉर्टकट व्यक्तीचे मन.. व्यवस्थेचा गाभा.. कर्मविपाकाच्या सिद्धांतापासून, अवैज्ञानिकतेच्या आग्रहापर्यंत व्यापून राहतो. त्याचे एक अर्थकारणही उभे राहते. याला पर्याय आज तरी विवेक व मूल्य वादी समाजरचना हाच आहे. उन्नत धर्म किंवा विवेकाचे अध्यात्मिककरण हा नाही. 

ही भूमिका जमातवाद्यांच्या पथ्यावर पडते असे समजण्याचे कारण नाही. त्याचेही गणित वेगळे आहे. लोक धार्मिक मनोवृत्तीचे आहेत याचा अर्थ ते कर्मकांडी आहेत.. हे गृहीत धरले.. तर उन्नत धर्माच्या आवाहनाने ते धर्मनिरपेक्षतेकडे कसे वळणार? मानसतत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञान या तत्त्वांच्या पातळीवर मांडणी करणाऱ्या वैज्ञानिक पद्धतींनाही हा तिढा अजून सुटलेला नाही. त्याचे कारण मेंदूच्या अपुर्‍या माहितीत दडले आहे, असे सांगितले तर, बौद्धिक अहंकारात चळवळ गुरफटली आहे असे अनेकांना वाटते. 

सामाजिक प्रश्नांचे वैज्ञानिक संशोधन आज निर्णायक अवस्थेत नसताना सामाजिक प्रश्नावर ठोस उत्तरे आहेत असा दावा करणे अवैज्ञानिक आहे. या अर्थाने अंधश्रद्धांचे निर्मूलन कसे होईल हे आज ठरवणे अवघड आहे.

 आजच्या धर्माचे आकलन व्यवहारांचा संदर्भ घेऊन करायचे झाले तर, जनमानस आधाराच्या शोधात आहे. सर्व प्रकारचे आधार ते शोधत आहे. म्हणून धर्म हा कर्मकांड रूपात फोफावतोच आहे, असे म्हणता येईल. 

मानसिक आधार आणि व्यवस्थांची भ्रष्टता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोहोंत सुधार करणे हे वरील कारणाने अशक्य बनले आहे.

 अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही आज तरी अनेक श्रद्धा-अंधश्रद्धा फक्त ऐरणीवर आणण्याचे काम करीत आहे. त्यांचा निरास, त्यासाठीचे पर्याय, याची मांडणी अजूनही चळवळीने केलेली नाही. त्याची अनेक कारणे आहेत पण म्हणून चळवळीच्या प्राथमिक अवस्थेतच ती दिशाहीन ठरवणे योग्य नाही. 

जागतिकीकरण, भांडवलशाही, विस्तारीकरण, अस्थिर राजकारण, आदी अनेक कारणामुळे अर्थव्यवस्थेची रूपे पालटत आहेत. अर्थव्यवस्था ही सर्व व्यवस्थांचे मूळ आहे असे गृहीत धरून समाज भ्रमांचा वेध घेता येणार नाही. अमेरिकेसारख्या अर्थगर्भ राष्ट्रातही अंधश्रद्धांचे प्रमाण विकसनशील-अविकसित राष्ट्रांइतकेच आहे.

पर्यायाअभावी श्रद्धा-अंधश्रद्धा यांची अदलाबदल करून जनमानस या वेगाने बदलणाऱ्या प्रक्रियांना सामावून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे व्यवस्थांमधील अव्यवस्था आणि श्रद्धा-अंधश्रद्धा यांचे साटेलोटे सुरू आहे. हे पाहता धर्म व्यवहाराचे स्पष्टीकरण या रूपात मिळत जाते. म्हणजे व्यवस्था आणि धर्म या जगण्याचा दोन्ही पातळ्या कशातून भ्रष्ट झाल्या आहेत? जैविक प्रेरणांतून? मेंदूत अजूनही असलेल्या एक तृतियांश प्राण्याच्या भागातून? डार्विनच्या उत्क्रांती तत्त्वाच्या "संघर्षवान टिकेल" या तत्त्वातून? बरस्ट्रंड रसेल ने मांडलेल्या "भीती" या मूलभूत भावनेतून? नैसर्गिक उत्पातांच्या अस्थिरतेतून? या व अशा वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत व्यवस्थांचे धार्मिक व मार्क्स प्रणित मूल्यमापन अपुरेच ठरणार ! 

...म्हणूनच धर्म ही शक्ती नव्हे तर व्यवस्थांमधून टिकून राहण्यासाठी वापरली जाणारी युक्ती आहे !! 

ती ठिसूळ आहे कारण विज्ञानाच्या शोधांमधून तिची अनेक अंगे ढासळत चालली आहेत. 

मूल्यांची वैज्ञानिक मांडणी जेव्हा अस्तित्वात येईल तेव्हा कदाचित ती पूर्ण कोसळलेही पण ही भूमिका पाहता अंधश्रद्धांचे निर्मूलन ही व्यवस्थांच्या सुधारणेद्वारे (समता, समान संध्या वगैरे) होईल हे अर्धसत्य आहे. 

...म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलनात अपूर्णता आहे. विज्ञान-वैज्ञानिक दृष्टिकोन या आधारे चालणाऱ्या या चळवळीस विज्ञानाच्या मर्यादा सध्यातरी आहेत हे उघड आहे. आणि प्रतिगाम्यांचा विरोधही होत राहणार हेही उघड आहे.  

आज एवढेच म्हणणे योग्य होईल की अंधश्रद्धा निर्मूलन हा सामाजिक प्रश्नांचा, व्यवस्था विकृतींचा व मानवाच्या समाजाच्या स्वत्वाचा शोध  घेणारा एक प्रयोग आहे. 

प्रयोग चालू आहे. 

निष्कर्षांचे नंतर पाहू!!

- डाॅ.  प्रदीप पाटील.

वाॅलबॅचिया


 उत्तर प्रदेशात आता डेंग्यु पुन्हा आलाय. उपास-तपास, व्रतवैकल्ये, दिवसातून अनेक वार प्रार्थना..सारं काही करूनही  थैमान घातलंय. 

आमचं धर्मशास्त्रीय सरकार गोमुत्र, पंचगव्याच्या सखोल  संशोधनाच्या वाळूत तोंड खुपसून बसलंय. 

आणि तिकडे जगातले वैज्ञानिक अनेकाअनेक वैज्ञानिक प्रयोग करून डेंग्युवर मात करू लागलेत. 

डेंग्यु डासांमुळे होतो. 

प्राणीसृष्टीतला असा जीव जो मानव जातीचे सर्वात जास्त जीव घेतो. 

एडिस इजिप्ति नावाचे डास चावताना डेंग्युचे व्हायरस मानवशरीरात सोडतात. मग हाडांत प्रचंड वेदना..ताप..प्लेटलेटचे प्रमाण रक्तातलं ढासळणं..काही वेळा मृत्यूला सामोरं जाणं. 

दरवर्षी ४०० लक्ष डेंग्युग्रस्त होतात तर 20 हजारोंच्या वर मरतात. 

'जागतिक मच्छर उपक्रमा' अंतर्गत वैज्ञानिकांनी एक भन्नाट शोध लावलाय. या शोधाचा हिरो आहे जीवाणू. 

नाव आहे त्याचं "वोलबॅचिया". 

हे जीवाणू जवळपास ६०% विविध किटकांच्या शरीरात असतात. ते 'मित्र ' विषाणू आहेत. पण ते एडिस इजिप्ति डासांच्या शरीरात नसतात.

मलेरिया आणि डेंग्यु या रोगांना पसरवणारा, २०१२ च्या लाटेत ६-७ लाख रोगग्रस्तांना मारणारा या जातीचा डास खरा शत्रू. 

वैज्ञानिकांनी हे शोधून काढले की वोलबॅचियाॅ जर या डासांच्या शरीरात सोडला तर डेंग्युचा व्हायरस मानवाच्या शरीरात सोडण्याची एडिस इजिप्तिची यंत्रणा निकामी होते. मागील वर्षी डेंग्युचे थैमान असणार्या इंडोनेशियात वोलबॅचिया डासांत सोडून दिले.  सुरवातीला योग्याकार्ता नावाच्या  प्रदेशात हा प्रयोग झाला. परिणाम?  ७७% डेंग्यु हद्दपार झाला. ८६% लोकांना हाॅस्पिटलात जावं लागलंच नाही. आता श्रीलंका, ब्राझील, व्हिएतनाम, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, फिझी, इ. देशात हा उपाय योजला जाईल...

आपण इथे गोबर आणि थाळ्या वाजवत राहू या..

हिंदू-मुसलमान खेळत राहू या..

आणि यमार्पित होऊ या..

- डाॅ. प्रदीप पाटील

माणसे मेली..विचार नाही!


 थोर विचारवंत थॉमस हाॅब्ज- जॉन मिलर-जाॅन लाॅक यांच्या काळात इंटरनेट नव्हता. 

नव्हता ते बरे झाले... 

कारण विचार स्वातंत्र्याची कत्तल तेव्हा सहज झाली असती. 

विचारांचा प्रतिवाद करण्यासाठी आज इतकी सहजसोपी साधने हाती आली आहेत की त्यांचा स्वैर वापर गोठवून टाकतोय.  विचार मारण्यासाठी बंदुकांचा वापर ही आता मुक्तपणे होतो आहे. 

विचारांनी विचार मारायचे असतील तर त्यासाठी आपल्याकडे अत्यंत प्रभावी यंत्रणा हवी. कारण जागतिकीकरणाने विचार मारणे तर सोडाच धक्का लावणे ही अवघड करून ठेवले आहे. 

होय, मी त्याच अक्राळ-विक्राळ पसरलेल्या सत्ते बद्दल म्हणतोय. घटनेने आपल्याला सात स्वातंत्र्ये देऊ केली आहेत पण ही स्वातंत्र्ये उपभोगण्यासाठी आज परिस्थिती बिघडलेली आहे. 

आपण विचार मांडतो आहोत तो समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा, जातिअंताचा, धर्मनिरपेक्षतेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, विवेकाचा, शोषणाविरुद्धचा, सत्याचा आणि सत्यशोधनाचा. 

आपले दृष्टिकोन, विचार, समजुती आणि वैज्ञानिक रित्या सिद्ध झालेली तत्त्वे किंवा गोष्टी सांगण्याचा आपणास कायदेशीर अधिकार आहे. जगभरातील सर्व राष्ट्रांना त्याचे महत्त्व ठाऊक आहे. भारतात तर सम्राट अशोकाने सर्व जगातील तत्त्वज्ञानाच्या अगोदर विचार स्वातंत्र्याचे बीज रोवले आहे.

 म्हणजे विचारस्वातंत्र्याचा आपण पुरेपूर वापर करू शकतो. तो करीत राहणे याचाच अर्थ सद्सद्विवेकाचा प्रचार करणे होय. निर्भयपणे आपण तो करीत आलो आहोत. पण तो करीत असताना विचार स्वातंत्र्याची गळचेपी ही सोसत आलो आहोत. हिंदू धर्मातील विषमता मोडताना  फुले-आंबेडकरांनी ती पुरेपूर अनुभवली. पण आज परिस्थिती बिकट आहे.  जिओर्दानो ब्रूनो ला जिवंत जाळण्यात आले. चार्वाकांना मारण्यात आले. ती ही एक परंपरा आहेच. ..विचारस्वातंत्र्याचा गळा घोटणारी, बंधने लादणे अटक करणे, पुस्तके जाळणे, खोट्या वार्ता पसरविणे, खोटी गोष्ट सत्य म्हणून ठासून सांगणे, विचार सांगणार्यासच संपविणे, अशा पद्धती विचार स्वातंत्र्याचे शत्रू अवलंबत आहेत. हिटलर, नाझी, शोषक ब्राह्मण्य संस्कृती अशी अनेक उदाहरणे देता येतील. गांधींना मारणे आणि मारल्यावर गांधींच्या विचारांचा सोयीस्कर वापर करणे ही एक पद्धती आहे. थोडक्यात इथे राजकारण शिजते. राजकारणात प्रतीकांचा, प्रतिमांचा आणि प्रगत विचारी नेत्यांचा वापर करून आपली पोळी भाजून घेतली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर "हिंदू राष्ट्रपुरुष" होते असा प्रचार प्रतिगाम्यांनी करणे हा पोळी भाजण्याचा हाच प्रकार आहे. म्हणजे इथे विकृत राजकारण भरास आले आहे. विकृत राजकारण हा विचारस्वातंत्र्याचा मोठा शत्रू आहे. कारण विचार स्वातंत्र्य नव्हे तर सत्य विचार दडपण्याची ताकद या राजकीय खेळीत असते. राजकीय ताकद सत्तेत आली तर तिचा उन्माद  वाढवितो तो पैसा.  विचार फैलावण्याचे सामर्थ्य अर्थकारणातून येते. निर्बुद्ध राजकीय समज असलेल्यांचा  ब्रँड केवळ काही महिन्यात घरोघरी पोहोचविणे हे भांडवलदारांमुळे शक्य झाले आहे. सामान्यांचे विचार अर्थकारण कसे बदलविते त्याचे हे उदाहरण. "विचार बदलविणे तसे कठीण काम नसते" असा राक्षसी विचार बाळगणारे भांडवलदार यावेळी आपण यशस्वी झालेले पाहिले आहेत व पहात आहोत.

संस्कृती विचार रुजविते. म्हणूनच तर एक प्रकारची मानसिक गुलामगिरी सर्वदूर पसरलेली आहे.  सांस्कृतिक् गुलामगिरी धर्माच्या आश्रयाने जेव्हा भिनते तेव्हा विचारस्वातंत्र्य म्हणजे एक शिवी बनते. आणि भांडवलदार येऊन मिळाले की, ती संस्कृती 'ईश्वरी' आणि 'श्रद्धेची" बनते. मग श्रद्धांचा व्यापार जरी चालू असेल तर गुलाम झालेले त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आंधळे विचार स्वीकारलेली ही संस्कृती विचार स्वातंत्र्याची सर्व कवाडे स्वतःहूनच बंद करून घेते. 

समृद्ध पुरोगामी व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारलेली चिकित्सक संस्कृती असते. बुरसटलेले आणि तखडबंद विचार पाळणारी एक संस्कृती असते. ..आणि या दोन्हींच्या मध्ये हेलकावे खाणारी एक संस्कृती असते जी गोंधळलेल्या विचारांनी सैरभैर असते. ती ठाम नसते. इथे विचारस्वातंत्र्य भुसभुशीत बनते. 

विचारस्वातंत्र्य जेव्हा संपविण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्यामागील कारणे, दुसऱ्यांचे अविचार स्वातंत्र्य हे असते. विचार करणाऱ्यांची समजूत अशी असते की विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा. शस्त्रे उचलू नयेत. कारण त्याचा परिणाम शून्य होतो. कोणत्याही युद्धात असो नाही तर संहारामध्ये असो, शाश्वत मूल्ये नष्ट झाली आहेत असे दिसत नाही. धर्म किंवा मोठ्या जनसमुदायांना जेव्हा अस्मिता मिळतात तेव्हा आपसूकपणे त्यांच्यात विचारस्वातंत्र्याला नकार उत्पन्न होतो... आणि असे उन्मत्त समुदाय..विरोधी विचारधारा स्वीकारलेल्यांची कत्तल करतात. आपण म्हणतो माणसे मेली, विचार नाही.

(पुर्वार्ध)

- डाॅ.  प्रदीप पाटील


मूल्यांना प्रमाण मानून जो विचार फैलावतो तो टिकतो यात शंका नाही. कारण नीती आणि विवेक यांचा उपयोग व परिणाम समूहांच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यात मुख्य स्थानी असतात. म्हणूनच व्यक्तीपेक्षा विचार प्रमाण मानून जगणार्यांचा नेहमीच आदर होतो. त्यांचे स्थान अबाधित राहते. 
व्यक्तींनी निर्माण केलेली मुल्यं मानणारा जनसमुदाय खूप मोठा आहे. त्यांना ते देव, विभूती, संत म्हणतात. पण त्यांची मुल्यं ही विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कसोटीवर खरी उतरली तरच त्या व्यक्ती जगावेगळ्या ठरतात. ज्या उतरत नाहीत त्यांच्या पदरी बदनामी येते. पॅरिसमध्ये सेंट बार्थीलोमेवच्या दिवशी पंधराशे बहात्तर मध्ये तीस हजार माणसांची कत्तल करण्यात आली. कॅथोलिक ख्रिश्चनांनी प्रॉटेस्टंट ख्रिश्चनांची केलेली ही कत्तल होण्यास नवव्या चार्ल्स् ची बहिण मार्गारेट हिने तिसऱ्या हेन्रीशी तो प्रॉटेस्टंट असूनही लग्न केले म्हणून, कारण झाले. इतिहासातील ही पहिलीच कत्तल. पण म्हणून प्रॉटेस्टंट संपले नाहीत. आणि भारतात ही चार्वाक संपले नाहीत. 
विचार स्वातंत्र्य हे व्यक्तीच्या व्यक्त होण्यातून वाढत जाते. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य रोखण्यासाठी प्रतिगामी विचार सतत प्रयत्न करतात किंबहुना त्यांचा तोच अजेंडा असतो. जर आपले विचार धारदार असतील, त्यांना आव्हान देणे अवघड नव्हे शक्यच नसेल तर त्या विचारांना संपविणे शक्य नाही. संपवणे शक्य होईल ते व्यक्त करणाऱ्यांना ! तसे घडते हेही आपण पाहिले. मग यासाठी आपल्याला जी पद्धत अवलंबावी लागते ती बहुपदरी होते. 
बहुपदरी याचा अर्थ खूप मोठा आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, असे अनेक पदर समाजात आहेत. या साऱ्यांविषयी भूमिका निश्चित करणे महत्त्वाचे आहे. ही भूमिका व्यक्तीसापेक्ष न घेता, विवेक आणि वैज्ञानिक दृष्ट्या घेतली तर ती योग्य ठरेल. भूमिका घेताना, ती, व्यक्ती व ग्रंथ सापेक्ष बनली, तर विचार कमकुवत बनतात. विचारांना विचारांनी आव्हान देणे सोपे जाते. जर भूमिका निर्विवाद विचारांच्या बनल्या तर विचारवंतांना एकत्र येणे सोपे जाते. नाहीतर मतमतांतरांचा गलबला होतो. 
समाजाचे जे विविध पदर आहेत त्यात अनेक विचार घट्ट रुतलेले आहेत तर अनेक ठिकाणी अजूनही विचार तयार झालेले नाहीत. म्हणजे विचारांमध्ये असलेले वेगवेगळे रंग आणि नसलेले रंग याचे भानही ठेवणे आवश्यक आहे.
 थोडक्यात विचारस्वातंत्र्य ही गोष्ट विचारांच्या मजबुतीवर ठरते व टिकून राहते. इथे आपणास आता थोडे थांबून वेगळा विचार करायचा आहे. 
धर्म सोडणे आणि ईश्वरनिंदा करणे यासाठी जगभरातील १९ देशांत आजही शिक्षा केली जाते व त्यापैकी १२ देशांत तर मृत्युदंड दिला जातो. जानेवारी १४ ला सौदी अरेबियात निरिश्वरवादी व नास्तिक असणे म्हणजे दहशतवादी असणे असा कायदा संमत करण्यात आला आहे. अशीच परिस्थिती ईजिप्त, मलेशिया, नायजेरिया, इराक, सीरिया या राष्ट्रांत आहे. सनल एडामारुकु यांनी भारतात "येशुचे अश्रू" विषयी सत्य कथन केले म्हणून ख्रिश्चन धर्माने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विचार स्वातंत्र्यावर घाला घालणारी अशी अनेक उदाहरणे आहेत आणि दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश सारखे अनेक जण या विचार स्वातंत्र्यासाठी बळी जात आहेत. 
जगभरात सर्वत्र धर्म हा प्रबळ आहे त्यामुळे धर्म आणि त्यात या धर्मांचे देव यांच्या विषयी टीका करणे किंवा विरोधी विचार व्यक्त करणे गुन्हा ठरविण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षणातून, वृत्तपत्रातून, वेबसाईटवरून, पुस्तके लिहून व सिनेमातून विचार व्यक्त केले जे धर्म-देवाच्या विरोधात आहे अशांना तुरुंगात पाठविले जात आहेत. याचा अर्थ देव-धर्माने जे काही सांगितले आहे ते मुकाट्याने पाळा. विचार व्यक्त करू नका. जे देवधर्म मानीत नाहीत त्यांच्या विरोधी कारवाया करणे हा खरे तर गुन्हा आहे पण धर्मांचे वर्चस्व असलेली जगभरातील सरकारे विचारस्वातंत्र्याचा गळा घोटीत निघाली आहेत असे आजचे चित्र आहे. आणि हे चिंताजनकही आहे. 
याचा अर्थ विचार स्वातंत्र्याची लढाई ही जशी धर्म-देवा विरुद्ध आहे तशीच ती सत्तेशीही आहे. आणि याबाबतीत विचार स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते कुठेही जवळपासही गेलेले  नाहीत. सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी म्हणून विचारस्वातंत्र्याचा आम्ही पुरस्कार करीत नसू तर अविचार स्वातंत्र्य निरंकुशपणे सर्वत्र अबाधित राहील. 
सत्ता, प्रसारमाध्यमे आणि शिक्षण या तीनही क्षेत्रात विचार स्वातंत्र्यवादी अपवादाने आहेत. आणि अविचारस्वातंत्र्यवाद्यांची जमेची उत्तम बाजू आहे. आर्थिक धोरणे, सरकारी योजना, आंतरराष्ट्रीय घडामोडी व आपले धोरण, विषम समाजव्यवस्था आणि सरकार या बाबतीत आपल्या भूमिका नक्की होत गेल्याशिवाय सत्तेला आपण बिलगू शकणार नाही. याचा अर्थ विचारस्वातंत्र्याचा झेंडा रोवण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.
 मग आपण याविषयी काय धोरण आखणार आहोत? अर्थातच विचारस्वातंत्र्यच नव्हे तर समतेचा हक्क मिळविण्याचे स्वातंत्र्य, भेदभावापासून मुक्ती मिळविण्याचे स्वातंत्र्य, जगण्याचे स्वातंत्र्य व सुरक्षिततेचा हक्क मिळवण्याचे स्वातंत्र्य, गुलामीपासून मुक्तता मिळवण्याचे स्वातंत्र्य, कायद्यासमोर सर्व समान असण्याचे स्वातंत्र्य, शिक्षण मिळवण्याचे स्वातंत्र्य, अशा अनेक स्वातंत्र्यासाठी आता चिकाटीने आणि दूरदृष्टीने लढावे लागणार आहे. 
विचारस्वातंत्र्य हा आपला श्वास आहे असे आपण मानत असू तर लढाई सोपी होईल हे लक्षात ठेवलेले बरे !
-डाॅ. प्रदीप पाटील 
(उत्तरार्ध)


मोटस् येतोय !

 मोटस् येतोय !


"मोटस" येतोय !

...आणि तो तुमच्या आमच्या शरीरातील गुपितं उघडकीस आणणार आहे !! 

"मोटस" म्हणजे एक लहान सूक्ष्म मायक्रोचीप. 

म्हणजे धुळीमध्ये असलेल्या जंतू पेक्षाही लहान. जवळपास एक क्युबिक मिलिमीटर पेक्षाही लहान, जो मायक्रोस्कोपखालीच दिसू शकतो. ०.१मिलीमीटर³ हा त्याचा खरा आकार.

"मोटस" हा आपल्या शरीरात अगदी इंजेक्शनच्या सुईने बसवता येतो.  मस्तपैकी वेगवेगळ्या इंद्रियांमधील  इत्यंभूत माहिती बाहेर डॉक्टरला पाठवणार.

म्हणजे आता शरीरातले अंतरंग पडद्यावर मस्तपैकी साकारणार. आणि डॉक्टरांचे काम खूप म्हणजे खूपच सोपे होणार. कोलंबिया युनिव्हर्सिटीने ही "मोटस" नावाची सूक्ष्मचकती किंवा मायक्रोचीप तयार केली आहे. या सूक्ष्म चीप मध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे.

 इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेल्या केन शेफर्ड नावाच्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमने हे शोधून काढले. 

ऑपरेशन करायच्या अगोदर तुमचे शरीर व्यवस्थित काम करते की नाही यासाठी अनेक तपासण्या कराव्या लागत होत्या. पण आता "मोटस" एका दमात हे सर्व करून देईल. "मोटस" बरेच काही करेल... जसे की रक्तातली साखर कमी जास्त होते की नाही?, शरीराचे तापमान, शरीरात कुठल्याही इंद्रियात काय बिघडले?, त्याचे निदान, रक्तदाब, श्वसनाचे कार्य ...कितीतरी अशा फायदा मिळवून देणाऱ्या गोष्टी "मोटस" करणार आहे. 

विज्ञानाचे हे मानव जातीला देणे आहे. कुठलेतरी प्राचीन ग्रंथ उघडून आमच्या ग्रंथात हे पूर्वी होते असे म्हणणार्यांसाठी एक नवा विषय मिळालेला आहे..आता जुन्या ग्रंथात डोके खुपसून बसायला हरकत नाही. मठ्ठपणे  बसलेल्यांना दुसरे काही नवीन सुचत नाही..त्यामुळे नवीन शोध लागले कि जुने ग्रंथ धुंडाळत बसण्याची खोड असते. आणि नंतर जाहीर करायला मोकळे ' हे आमच्या ग्रंथात पुर्वीच होते...'

"मोटस" हे विद्युत विज्ञान, इलेक्ट्रॉनिक विज्ञान आणि शरीर विज्ञान या तिन्ही विज्ञानाचा आधार घेऊन तयार झाले आहे. काॅम्प्लीमेंटरी मेटल ऑक्साईड सेमिकंडक्टर तंत्रज्ञान यामध्ये आहे. ज्याला सी एम ओ एस म्हणतात. हे घेऊन सूक्ष्म आवाजाच्या लहरी निर्माण केल्या जातात. शरीरात गेल्यावर पिझोइलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर या सूक्ष्म जोडणीद्वारे बाहेरच्या मशीन मध्ये सर्व माहिती गोळा होते. आणि हे सर्व वायर शिवाय म्हणजे वायरलेस होणार! 'स्मार्ट डस्ट' किंवा चुणचुणीत धूलकण या वर्गात हे मोडतं.

अफलातून असलेल्या या नव्या शोधाने सूक्ष्म लहरींचा वापर कसा करायचा हे दाखवून देत वैद्यकीय विज्ञान आणखीनच सोपे केले आहे. 

सूक्ष्म लहरी आणि एनर्जी या मंदिरातून बाहेर पडतात आणि त्या वैश्विक ऊर्जेला जोडल्या गेलेल्या असतात असले बिनबुडाचे विज्ञान इथे चालत नाही. असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात मंदिर, मूर्ती आणि एनर्जी आणि वैश्विक एनर्जी यांचं विज्ञान आहे म्हणून पूजाविधी करायचे असतात असे ठासून खोटे सांगितले जाते. असले बालिश विज्ञान पसरवणारे लबाड असतात. 

"मोटस" जर आणखी प्रगत केले तर शरीरातील अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया उलगडत जातील आणि वैद्यकीय विज्ञान प्रगत होत जाईल. सोनोग्राफी, एम आर आय अशा तंत्रज्ञानाच्याही पुढे गेलेले हे विज्ञान. 

साचलेला धार्मिक दृष्टिकोन नव्हे तर प्रगत होणारा वैज्ञानिक दृष्टीकोण आज मानवाला उन्नत अवस्थेकडे घेऊन जाणार हे निश्चित!

- डाॅ. प्रदीप पाटील

माझे विचार My Quotes

 























































सर्वंच धर्मकृत्यं वंदनीय नसतात !

    देवाचे घर उभारणार्यांनी देवाच्या नावाने पैसे गोळा करून त्यात भ्रष्टाचार केला तर तर तो भ्रष्टाचार या सदरात मोडत नाही ! शेवटी ते धर्मकृत्य...