Monday, September 20, 2021

सर्वंच धर्मकृत्यं वंदनीय नसतात !


   

देवाचे घर उभारणार्यांनी देवाच्या नावाने पैसे गोळा करून त्यात भ्रष्टाचार केला तर तर तो भ्रष्टाचार या सदरात मोडत नाही ! शेवटी ते धर्मकृत्य असते व ते करत असताना कुणी लबाडी केली तरी ते देव बघून घेईल हा शाप खूप प्रभावी असतो. जोरदार असतो. हे धार्मिक व संस्कृती रक्षकांचे लोकप्रिय नीतीतत्त्व आहे.  त्यांच्या मनात ते ठासून भरलेले असते. जर देवालय हे राजकारणासाठीच आणि राजकारणातून उभे केले जात असेल तर तिथे देवनीती,  धर्मनीती आणि संस्कृती नीती या सगळ्यांचा राडा झालेला असतो. ही राड म्हणजेच धर्माचरण आणि संस्कृतीचे आचरण. आणि ते कर्मकांडाच्या नावाखाली खपून जाते. देव या भ्रमाचा वापर राजकीय फायद्यासाठी करून घेणं याचे एकमेव उदाहरण भारतात पहिल्यांदाच दिसून आलेलं आहे. जगभरात तर ते सतत वापरले गेले आहे.  धर्माचा वापर करून आजवर राजकारणाची पोळी भाजण्यात सर्वधर्म आणि सर्व पक्ष आघाडीवर होते किंबहुना राज्यकर्त्यांनी धर्माचा वापर हा सोयीनुसार केल्याचा इतिहास आहे. ती सोय आज पुरेपुर उपयोगी पडते आहे.

देवाचा वापर राजकारणासाठी करणे हे धार्मिक आणि संस्कृती वाद्यांनी हे जे घडवत आणले आहे त्यातून ते भ्रमिष्ट समाज घडवत आहेत. जो माझ्या विरोधात तो तो मारून टाकण्या योग्य ही धर्म नीती किंवा संस्कृति नीति अनेकवार त्यांच्याच नाशास कारणीभूत ठरलेली आहे. कारण त्यातून निर्माण झालेल्या राजकारणातून युद्धं घडली आणि लढाया झाल्या. भारतात मुसलमान मुसलमानांविरुद्ध लढले. हिंदू हिंदू विरोधात लढले. युरोपात ख्रिश्चनांनी ख्रिश्चनांचा संहार केला. म्हणजेच लढाया या स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी घडल्या. केवळ लढायाच नव्हे तर स्वधर्म किंवा सर्व संस्कृतीचा त्याग करून स्वतःचे अस्तित्व राखणे हे मानवी मूलभूत प्रेरणेशी सुसंगत आहे.  ही प्रेरणा जी स्वार्थाशी निगडीत आहे तीच प्रबळ होते. त्याला धार्मिक आणि संस्कृती वादी काय करणार? स्वतःच्या देवाशी, धर्माशी आणि संस्कृतीशी बेइमानी करणं हे धार्मिकांना शक्य होतं. कारण ही बेईमानी  त्यांना त्यांच्या स्वउत्कर्षाकडे घेऊन जाते आहे असे वाटत असते आणि हे त्यांचे नीती तत्व असते. इथे धर्म-संस्कृती काय म्हणते हे फारसे महत्त्वाचे ठरत नाही. मंदिरे फोडणे, मुर्त्या उद्ध्वस्त करणे, देवालय फोडणे, मशिदी-चर्च तोडणे, परधर्मातल्या स्त्रिया पळवणे, देव नाही म्हणणार्यांच्या कत्तली करणे हे धर्मकृत्य करतोय ठरते. धर्मकृत्य आणि विवेक यांचा अर्थाअर्थी शून्य संबंध आहे. 

धर्माची निर्मिती देव नावाची कल्पना वापरून झालेली आहे. धर्म आणि संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देव, धर्म आणि संस्कृती जे सांगेल तीच नीती असे मानत राहिल्यामुळे प्रचंड मोठा गोंधळ लोकांच्या वागण्यामध्ये सतत निर्माण झालेला आहे. धर्म आणि संस्कृती चेतवत राहून सत्तेवर आलेल्यांना जर धर्म वा संस्कृती जर पाठिंबा देत असेल तर स्वधर्मियांची सर्व कुकृत्त्ये झाकून ठेवणे, नजरेआड करणे यालाच धर्म राष्ट्र म्हणतात.


जगाचे नंदनवन करेन अशी घोषणा करणारे देव आणि प्रेषित हे धर्म नावाचा लबाडीचा धंदा करतात.

- डाॅ. प्रदीप पाटील

आम्ही सर्व तालीबानी Talibani Similarities


 जगभरात सर्व धर्मात तालीबानी आहेत.


धर्माचा जयजयकार करणारा एक नेता असतो आणि तो सर्वांना प्रशिक्षण देत असतो. मोहम्मद ओमर ने पश्तून प्रांतात याची सुरुवात केली. ज्यांना तालिबान म्हणतात.


मुल्ला मोहम्मद ओमरला आपला देश ९९% मुसलमानांचा असुनही समाजवादी रशियन शासन आहे याचा प्रचंड राग आणि द्वेष मनात ठेवून ५० विद्यार्थी तरूणांना घेऊन तरूण संघ स्थापन केला आणि तालीबान फोफावला. 


अमेरिकेने याला बाहेरून भरपूर मदत केली. शस्त्रे पुरवली. 

तरूणांना हिंसा आणि युद्ध याचे महत्त्व पटवून दिले. तालीबानी प्रचार.


शेजारी देशाबद्दल त्यांच्या मनात विषारी विखार ठासून भरला. तशी पुस्तकं वाटली गेली. अमेरिकेने अफाट पैसा ओतून मूलतत्त्ववाद्यांची निर्मिती केली.

आपण सर्व ईस्लामी एक होत नसल्याने आपल्या राष्ट्राची दुर्दशा झाली आहे असे ठसविले गेले. तालीबानी तत्त्वज्ञान. 


आपल्याच धर्मात वाढणार्या जातींचा-गटांचा द्वेष निर्माण केला. देवबंदी मुस्लीम हेच शासक बाकीचे वहाबी, जमाते ईस्लामी, इ. संपविण्यायोग्य असा प्रचार. तालीबानी सांस्कृतिक वर्चस्व. 


धर्माचे शिक्षण असे गोंडस नाव देऊन दहशतवादाची सुरवात होते...मदरसा असे त्याचे नाव. तालीबानी धर्मज्ञान.


स्वतःचा स्वतंत्र झेंडा ते फडकवतात आणि देशातल्या शासकीय झेंड्याला पायदळी तुडवतात. तालीबानी स्वाभिमान. 


जे धर्म मानत नाहीत किंवा धर्माप्रमाणे वागत नाही त्यांना मारून टाकणे किंवा बहिष्कृत करणे हे अशा तालिबान्यांकडून केले जाते. कुराण अंतिम. तालीबानी पुजारी. 


इथे शरिया प्रमाणे वागणे हे महत्त्वाचे.देशाचे सरकारचे कायदे किंवा संविधान यांना काडीचीही किंमत न देणे याला तालीबानी कृत्य म्हणतात.


धर्मात न बसणारे कला, नाट्य, सिनेमे, यातील कलाकारांना देहांत देणे यास तालिबान म्हणतात. 


स्त्रियांनी आधुनिक कपडे, जीन्स, इ. घालणे वगैरे गोष्टी म्हणजे धर्म बुडवेपणा आहे आणि म्हणून त्यांना मारून टाकणे हे तालिबानी कृत्य आहे. तसे तालीबानी प्रवचनकार स्त्रियांच्या मनावर ठसवत राहतात.


स्त्रियांनी पारंपारिक वेशात राहणे हे तालिबानी कृत्य होय. स्वसंस्कृतीचा उद्घोष. 


जर स्त्रिया धर्मातील अल्पसंख्य जातीतील असतील त्यांना कुत्र्यासारखे वागवणे, बलात्कार करणे म्हणजे तालिबानी कृत्य होय.


अन्य धर्मातील मंदिरे, मुर्त्या तोडणे फोडणे, हे तालीबानी कृत्य होय. १५०० वर्षे जुनी असलेली बामियाची बुद्ध मूर्ती. 

आमच्या संस्कृतीत घुसखोरी? करा उध्वस्त. 


धर्माने हिंसा केली तर त्याचे समर्थन करणे म्हणजे तालिबानी होय. याला पश्तूनवली म्हणतात. झुंडीने मारणे, जबरदस्ती करणे, इ.


देशाची सुरक्षा आणि शांतता हेच आमचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे असे तालिबानी म्हणतात. मग सुरुवातीला विशिष्ट राष्ट्राचा धोका आहे असे म्हणत तालिबानी आणि मुजाहेदीन वाढले. हे राष्ट्र म्हणजे रशिया किंवा इराण होय. हेच हरकतई इन्किलाब इस्लामी. 


एक दोन राष्ट्रे शत्रू म्हणून घोषित करायची आणि स्वतः संरक्षक आहोत असे चित्र निर्माण करायचे. तालीबानी कुप्रचार.


धर्मामध्ये असलेले सर्व गट आणि तट हे एकाच राष्ट्रावर हक्क सांगतात तेव्हा तेथे अराजक माजते. मोहम्मद नजीबुल्लांच्या रशियाच्या पाठिंब्याच्या सरकारला पाडल्यावर तेथे तीन धर्मराष्ट्रवादी पार्ट्या एकमेकांना भिडल्या. हेझबी ईस्लामी गुलबुद्दीन, हिझबी वाहदत, इत्तिहादी ईस्लामी. धर्माचा राजकीय वापर करणारे घृणास्पद तालीबानी कृत्याच्या विविध धर्मसंघटना.


पोलीस,न्याय आणि शासन यंत्रणांचा बोजवारा उडणे म्हणजे तालीबानी.


बिगर सरकारी सामाजिक संस्थांना देशाबाहेर हाकलून लावणे किंवा बंद पाडणे म्हणजे तालीबानी. 


अहमद शाह मसूद हा तालीबान्यांविरूद्ध लढणारा एकमेव लोकशाहीवादी नेता होता. ज्याने स्त्री शिक्षण चालू केले. बुरखा बंद केला. सुधारणा घडवल्या. त्यांचा खून केला. हेच ते तालीबानी कृत्य. 


ज्यांनी तालीबान्यांविरूद्ध लढा दिला त्यांना कट कारस्थानाने, खुनाने संपवले. उदाहरणार्थ, बुर्हानुद्दीन रब्बानी, महम्मद दाऊद, अब्दुल रहमान सैदखली, इ.


जे जे विरोध करतील त्या सार्यांनी देश सोडावा किंवा मरावे म्हणत आपल्याच धर्मातील नागरिकांच्या गळा कापून १५ वेळा कत्तली एकावेळी शेकडोंच्या केल्या आहेत. तालीबानी फतवे.


जे आपल्या वंशाचे नाहीत त्यांना, सुमारे ६ हजार लोकांना,  क्रुर पणे संपविण्यात आले. उदाहरणार्थ मझार ई शरीफ.   तालीबानी वर्चस्ववाद. 


अल्पसंख्याक व खालच्या जातीच्या स्त्रियांवर बलात्कार आणि त्यांची विक्री हे तालीबानी कृत्य. 


आधुनिक व पुरोगामी विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापकांवर हल्ला करणे हे तालीबानी कृत्य. काबुल विद्यापीठातील उदाहरण.


आपल्याला मान्य नसलेला किंवा अडचणीचा इतिहास नाहीसा करणे म्हणजे तालीबानी कृत्य. उदाहरणार्थ पुली खुमरी ग्रंथालयाचा विनाश. 


जे अजान म्हणणार नाहीत त्यांच्यावर हल्ले. धर्म प्रेमाचे बेगडी तालीबानी  प्रदर्शन. 


कुराणावर पत्रकारांनी, लेखकांनी काहीही लिहण्यावर बंदी. आमच्या धर्मावर बोलायचे नाही. तालीबानी धर्म वीर.


आम्हाला पैंगबरांसारखे जग व वैभव  निर्माण करायचे आहे व त्यासाठी जिहाद आहे असे गाजर दाखविणे म्हणजे तालीबानी कृत्य. पुर्व संस्कृतीचा उदोउदो. 


हेच तालीबानी आता सत्ता काबीज करून सामाजिक शांतता, एकोपा, रोजी-रोटी, स्वतःच्या सत्तेसाठी उद्ध्वस्त करीत आहेत.


भीती हे हत्यार आणि भांडवल वापरून निरंकुश सत्ताप्राप्तीची अमानुष व्यवस्था म्हणजे तालीबान.

सुटाबुटातले, शिक्षित तालीबानी प्रचंड धोकादायक. 

शेवटी धर्मराष्ट्र ना!!!


तुमच्याही धर्मात तालीबानी आहेत. चालू द्यात...

- डाॅ.  प्रदीप पाटील

Pradeep Patil

Friday, September 17, 2021

मूल्यहिन धर्म सत्ता

मूल्यहिन धर्मसत्ता 




तालीबान्यांविरूद्ध जगभर जनमत आहे. पण आता हेही लक्षात येत आहे की धार्मिक मानसिकतेचे आता काही तरी करायला हवे. 

सारे धर्म आता जगाला विनाशाकडे नेऊ शकतात हे पटू लागलेय. सारे धर्म म्हणजे टोकाचे मतभेद आणि त्यांची भेसळ. ही भेसळ जगाला पचेनाशी झालीय. या सार्या धर्मांनी मुल्यं धाब्यावर बसविली आहेत. सत्य, विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन या मुल्यांशी त्यांना काही देणंघेणं नाहीये. मुल्यांची मुखवटे चढविलेली ही सोंगाडी मंडळी आहेत. स्वसंस्कृतीच्या आणि स्वधर्माच्या पल्याडचे सारे झुठ मानणार्या या सोंगाड्यांनी राजकारणाचा वापर करून अनेक स्वधर्मातीलच निष्पापांचे प्राण घेतले आहेत. हे सारे आता विवेकी विचार करणार्यांना लख्खपणे दिसू लागलंय. 

महासत्ता असलेल्या अमेरिकेत 1937 ते 1997 पर्यंत चर्चला जाणारे ७०% लोक होते. मात्र गेल्या दोन दशकात चर्चला जाणार्यांचं प्रमाण ५०% च्या खाली घसरलंय. आणि देव व धर्म न मानणार्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या पंचवीस टक्क्यावर गेले आहे. जे धार्मिक राहिलेत त्यांच्यातल्या राजकीय जाणीवा मात्र तीव्र बनत चालल्या आहेत. म्हणजे त्या लोकशाहीस कडाडून विरोध करणार्या बनू लागल्या आहेत. धर्माचे हे राजकीयीकरण घातक बनू लागलेय. नवा धर्म जन्माला आला आहे....धर्माशिवायचा धर्म! 

अशियात, विशेषतः मध्यपुर्वेत तर धर्म म्हणजे युद्ध अशीच धारणा बनलीय. इजिप्त, ट्युनिसिया सारख्या देशांत चर्चा आरोग्य किंवा शिक्षण यावर झडत नाहीत. धर्माचे वैयक्तिक आणि सामाजिक स्थान यावरील काथ्याकुट करणार्या निष्फळ चर्चा बेसुमार आहेत. त्यातुन जो जो अमेरिकेन तो तो ख्रिश्चन किंवा जो जो भारतीय तो तो हिंदू असा नवा राष्ट्रवाद सुरू झालाय. 

दुसर्या धर्माचे आपल्या देशावरचे हल्ले त्यामुळेच धर्मश्रद्धेवरील हल्ले समजले जात आहेत. ट्रंप यांनी हा "इथनो नॅशनॅलिझम" चाणाक्षपणे उचलला होता. इस्लामवाद्यांनी तो केव्हाच व्यवहारात उतरवलाय. बंदुकासकट. तर भारतात तो आता स्थिरावू लागलाय. 

देशाची व्याख्या जेव्हा धर्माच्या चष्म्यातून केली जाते तेव्हा गटातटाचे तांडव माजते. इस्लामचे अनेक राजकीय गट ते असेच.  

घोळ हा आहे की पारलौकीक किंवा जगाच्या पल्याडच्या गोष्टी या धर्माच्या...आणि रोजरोजच्या दैनंदिन समस्या या राजकारणाच्या..या दोघांची मोट बांधणं म्हणजे अद्भुत चमत्कार म्हणावा लागेल! थोडक्यात मुल्ये आणि व्यवहार शहाणपणाने एकत्र ठेवणारे माईकालाल अजून जन्माला आलेले नाहीत. म्हणुनच व्यावहारिक जगात धर्माचे हसे होत चालले आहे. मुल्यांच्या मागे धावताना व्यवहारात धार्मिकांची दमछाक वाढू लागलीय. फ्रान्समध्ये धर्माची व्यवहारात गरजच नाही असे मत जवळपास ८०% लोकांनी व्यक्त केले आहे. म्हणुनच इस्लामवर जाहीर टीका करण्याचे ते स्वातंत्र्य उपभोगतात. याचा दुसरा अर्थ लोकशाही खिळखिळी करणार्याचे वर्चस्व वाढत जाणार. प्रसंगी हिंसक बनणार्या धर्मासमोर ती टिकून राहणे हे मोठे आव्हान आहे. 

जोवर देव आणि धर्म मानणारे लोकशाही राज्य चालवितील तोवर लोकशाही जनात आणि मनात उतरणार नाही. कारण मनात धर्म नियम असल्याने जनात वावरताना लोकशाही लादल्याची भावना बनते. शासन म्हणते म्हणून नियम पाळतो ही भुमिका लोकशाही अस्ताकडे नेणारी ठरते. लोकशाहीचे नियम पाळल्याने माझा उद्धार होतो हेच मान्य नसेल आणि देव-धर्माच्या भरवशावरच विश्वास असेल तर धर्मराष्ट्रे उगवत राहतील. मुल्याधारित निधर्मी मानसिकता यावर उपाय आहे. आणि तेच अवघड काम आहे!!

तोवर धर्मराष्ट्रांचा उदय होत राहील आणि अस्तासही जातील.

खेळ मांडला.....

- डाॅ.  प्रदीप पाटील 

Pradeep Patil 

नरेंद्र दाभोलकरांचे कार्यकौशल्य

सनातन्यांनांचा पराभव



 "नवीन काय लिहिणार आहेस?" डाॅ.  नरेंद्र दाभोलकर यांनी मला विचारले. 

मी त्यांच्या हातात हस्तलिखित ठेवले. आरेवाडी येथील आंदोलनाच्या बैठकीस त्यांना मी बोलावले होते. कलेक्टर ऑफिस मधली मिटींग संपवून आम्ही घरी आलो तेव्हा त्यांना मी हस्तलिखित दिले.म्हणालो, " वास्तुशास्त्रावर आहे, वाचून सांगा ". 

" हो रे.. वास्तुशास्त्रावर कोणीतरी लिहायला हवे होते. बघतो वाचून " सांगली ते सातारा या प्रवासात दाभोलकरांनी माझे संपूर्ण हस्तलिखित वाचून काढलं. सातार्यात पोहोचल्यावर लगेच त्यांनी मला टेलिफोन केला. म्हणाले, 

"प्रदीप, मी सगळं वाचलं वास्तुशास्त्र."

कसं शक्य आहे? मी विचारात पडलो. जवळपास १६० पानं तीन तासात दाभोलकरांनी वाचून काढली होती. मला तेव्हा लक्षात आले की दाभोलकरांचा वाचन वेग अफाट आहे. कारण माझ्या  पुस्तकांतला बारीकसारीक तपशील त्यांनी सांगितला. 

" वास्तुशास्त्रावर खरे तर मी एवढा विचार केला नव्हता. तुझे हस्तलिखित वाचल्यावर लक्षात आले की याचा आवाका खूपच दांडगा आहे. तू अनेक तपशील गोळा केलेले मला दिसताहेत जे खरोखरच कठीण काम आहे. तुला वेद वाचून काढावे लागले असतील. ते मी समजू शकतो पण प्रदीप, त्याचा जो टेक्निकल भाग कसा काय समजून घेतलास?"

मी डाॅक्टर आणि वास्तुशास्त्रावर कसे लिहिले? याची उत्सुकता त्यांना होती.

मी म्हणालो, " मानसार, मयमत आणि समरांगण सूत्रधार ही वास्तुशास्त्रावरची बेसिक पुस्तके मी पुण्यातून मिळवली. पण आधुनिक वास्तुशास्त्राची माहिती अनेक नामवंत आर्किटेक् आणि इंजिनिअरांना भेटून चर्चा करून मिळवली. "

"ते दिसतंच आहे. खूप सखोल माहिती तू त्यातून मांडली आहेस. वास्तुशास्त्राचा सर्वांगाने अभ्यास केलेला दिसतोय. हे आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे प्रकाशित करू या. वास्तुशास्त्राचा परामर्ष घेणारे हे पहिलेच पुस्तक आहे."



त्यानंतर हे पुस्तक तयार होण्याआधीच दाभोलकरांनी अवैज्ञानिक वास्तुशास्त्रावर परिसंवाद, पुस्तक प्रकाशन आणि जाहिरनामा परिषद हे तीन कार्यक्रम तयार ठेवले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात डाॅ.  श्रीराम लागू यांनी केले. जाहिरनामा परिषद जयंत नारळीकर यांच्या सहीने पुण्यात इंजिनिअरींग काॅलेजात झाली. त्यावेळी मी केलेल्या भाषणात आयन रँडने लिहिलेल्या 'फाऊंटनहेड ' या कादंबरीचा हिरो हाॅवर्ड रोआर्क या नास्तिक आर्किटेक् चा उल्लेख करून म्हणालो होतो..

" जगातल्या पारंपारिक इमारतींची निर्मिती करण्यात मला रस नाही. मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीतून नवनिर्मिती करणार्या इमारती बांधल्या. त्या परंपरांचा अपमान करतात म्हणून मला कुणी मारून टाकेल तर त्याची मी पर्वा करणार नाही..मी नवी शैली समाजात निर्माण करतोय...असे हाॅवर्ड म्हणतो.."

आज २० ऑगस्ट. कादंबरीतला हॅावर्ड रोआर्क प्रत्यक्षात मी पाहिला..अनुभवला.

डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्यरूपात. अखंड कामाचा झंझावात म्हणजे दाभोलकर. 



सनातन्यांनी त्यांच्या या आवाक्याचा धसका घेतला होता. तो त्यांनी भ्याडासारखा संपविला. एक व्यापक कट आखून. 

आठ वर्ष झाली. कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांना न्याय दिलेला नाही.

उद्योगपतीच्या घराबाहेरचा गुन्हा जो रक्तपाताविना असतानाही तात्काळ गुन्हेगार सापडतात. 

विवेकाचे मारेकरी मोकाट आहेत.

सगळे राजकीय पक्ष या बाबतीत एका माळेचे मणी आहेत.

राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही यावर गप्प आहेत. गलिच्छ राजकारण म्हणतात याला.

नथुरामाचे इथले तालीबानी नातेवाईक दाभोलकरांच्या मारेकर्यांचे सत्कार करतील आणि षंढ राज्यकर्ते केविलपणाने नुसते बघत राहतील.

तरीही...

दाभोलकरांचा अंत म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि विवेकाचा विजयच आहे एका अर्थाने. धर्म आणि देव यांना आव्हान देत मुल्यांची पेरणी करत दाभोलकरांनी सनातन्यांनांचा संपूर्ण पराभवच केलाय..आणि तो यापुढेही होतच राहील...

- डाॅ.  प्रदीप पाटील

देवा-धर्माशिवाय जगता येईल का?


 

नैतिक वागण्यासाठी 

धर्माची खरंच गरज आहे का?


मानवी मूल्ये, सदाचार यांचे आकर्षण मानवाला सतत वाटत आले आहे.. स्वार्थ-निस्वार्थ या दोघांची लढाई सतत त्यांचे जीवन व्यापून राहते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा सर्वच स्तरांत मुल्यवादी होऊन जगण्यासाठी धर्मात आधार शोधला जातो. धर्म आता या बाबतीत कालबाह्य होत असला तरी अशी कोणती प्रणाली, विचारधारा, मूल्यवादाकडे नेईल हा प्रश्न आजकाल तत्वज्ञानाच्याच पातळीवर न राहता जैविक विज्ञानाच्या आधारे धुंडाळण्यास सुरुवात झाली आहे. हा वैज्ञानिक शोध घेणारे... "ओरिजिन्स ऑफ व्हर्च्यू" हे पुस्तक कमालीचे धक्के देणारे आहे. ऑक्सफर्ड मध्ये प्राणिशास्त्र विषयावर संशोधन केलेले आणि नंतर पत्रकारितेत उतरलेले मॅट रिडली यांनी जैविक पाया शोधत मूल्यांचा शोध घेत काही निष्कर्ष काढले आहेत. या पुस्तकातील 13 प्रकरणात सर्वांगाने सद्वर्तनाचा ऊहापोह करण्यात आला आहे. सुरुवातीसच लेखकाने झारच्या राजवटीत अराजक माजविण्याचा आरोप असलेल्या प्रिन्स पीटर क्रॉपोटकीनचे तुरुंगातून पळून जाण्याचे उदाहरण दिलेले आहे. त्याचे पळून जाणे हे त्याच्या अनेक सहकार्यामुळे शक्य होते. त्यानंतर लंडनमध्ये आयुष्याच्या शेवटी त्याने 'म्युच्युअल एड' नावाचे पुस्तक लिहून त्यात थॉमस हेन्री हक्सले च्या विचारांचा प्रतिवाद करताना म्हटले...

सफल आयुष्य म्हणजे प्रत्येकाचे सर्वांशी युद्ध असे नसून एकमेकांशी सहकार हेच आहे. 

पण त्याचे हे म्हणणे किती खरे होते? लेखक म्हणतो, क्रोपोटकिनचे म्हणणे अर्धसत्य होय. आपण शोधून काढलेल्या नियमांनी समाज न चालता उत्क्रांत होत असलेल्या पूर्वग्रहांनी चालतो ! आपल्या जैविक प्रेरणा यांचा तो नियमात व्यक्त करण्याचा अविष्कार होय. स्वार्थ हा शब्द मानव जातीत दुर्गुण समजला गेला आहे. खून, चोरी, बलात्कार, भ्रष्टाचार यामागे स्वार्थ तर, सहकार, निस्वार्थ, उदारता, सहानुभूती, विनम्रता हे सदाचार समजले जातात. समूहाचे भले होणे असा हेतू यामागे असतो. कामाची विभागणी करून ते साध्य करण्याचा प्रयत्न माणूस कसा करतो ते 'द व्हिजन ऑफ लेबर' या दुसऱ्या प्रकरणात लेखकाने सांगितले आहे. ॲडम स्मिथचे उत्पादकता आणि किंमत याचे गणित कामाच्या वाटपावर उभारलेले होते. मानवी 'दुर्गुणातून' सामाजिक फायदे होतात हे स्मिथचे मत लेखकास मान्य नाही. एकमेकांच्या नफा मिळवण्याच्या स्वार्थातून समाज आणि जगाचे नफ्याचे तत्वज्ञान उभे राहते. आपल्या पूर्वजांत नवरा-बायकोतील व्यवहार हाही असाच होता. 

' द प्रिझनर्स डिलेमा' या तिसऱ्या प्रकरणात जेव्हा स्वार्थ आणि सामुहिक चांगुलपणा यांचा झगडा होतो तेव्हा सारेच कसे नष्ट होतात हे स्पष्ट केले आहे.

 एकाची यशस्विता समूहास उपकारक नसेल तर ती हेटाळली कशी जाते हे तीन लक्ष पौंडांची लॉटरी जिंकलेल्या मऊरा बर्कच्या उदाहरणातून दिसते. मग माणसे बक्षिसे का देतात? समोरचा माघार घेऊ नये म्हणून किंवा दुसऱ्याने चांगले म्हणावे म्हणून किंवा पत रहावी म्हणुन किंवा उपकाराचे ओझे ठेवायचे म्हणून? खरा निस्वार्थी माणूस बक्षीस देणारच नाही. कारण परतफेडीची उजळणी तो करत नाही. 

'थेअरिज ऑफ मोरल सेंटीमेंटस' या प्रकरणात देवा बरोबरचा नैतिक किंवा मोरल व्यवहार येतो ज्यास व्यापार असं म्हणता येईल. अलीकडचे विचारवंत म्हणतात की या व्यापारात भौतिक स्वार्थापेक्षा इतर गोष्टी प्रभावी ठरतात. वटवाघळे, मुंग्या, बबून्स, यांच्या अभ्यासातून या इतर गोष्टी कोणत्या ते लेखकाने सांगितले आहे. 

सर्व मानव जात निस्वार्थ लोकांना मानते. बहुसंख्यांनी निस्वार्थ होणे आपणास चांगलेच असते आणि आपण व आपले नातेवाईक यांचा स्वार्थ साधणे हेही चांगलेच असते. हाच तो प्रिझनर्स डिलेमा. हेच नैतिक भावनांचे सिद्धांत. 

'द सोर्स ऑफ वॉर' या प्रकरणात लेखक म्हणतो की प्राण्यांमध्ये स्वतः ऐवजी कळपाचे भले व्हावे ही इच्छा असते असे जीवशास्त्रज्ञांना कमी प्रमाणात आढळले आहे. मग माणूस वेगळा कसा? परंपरा, रूढी, ज्ञान, समजुती यातून तो इतरांहून वेगळा. यात अगोदरच्या पिढीची नक्कल करणे हा घटक महत्त्वाचा आहे. मग ते धर्माचे असो नाझीचे वा माओवादी चीनचे! स्थानिक श्रेयसाची नक्कल, सांस्कृतिक नक्कल, भयानक विरोध, सामूहिक बचाव, वेगळे गट बांधणे, हे सारे एकत्र येऊन स्वार्थ प्रवृत्तीकडे प्रवास करतात. लोक असे आंधळे अनुकरण का करीत असतात हे शोधताना लोकप्रिय पाच कारणे या ऐवजी 'माहितीचे लहान धबधबे' हे कारण योग्य असल्याचे दाखवले आहे. म्हणजे इथे व्हाट्सअप फेसबूक इत्यादी सोशल मीडियावरील हे माहितीचे लहान धबधबे किती महत्त्वाचे ठरतात हे लक्षात येईल. ते समूहाशी एकनिष्ठ राहतात कारण त्यांचा स्वार्थ कोणता ते समूह जाणतो व ही माहिती तो प्राप्त करतो म्हणून. 

टीम स्पिरीट रहावे म्हणून एकत्रित नाच आला आणि समूहाशी बांधीलकी दाखवण्यासाठी संगीत आले. मग ते मंत्र, फुटबॉल, गीते वा राष्ट्रगीते असोत. यातून आम्ही व ते असे फरक आले. 

'इकॉलॉजी अॅज रिलिजन' प्रकरणात लेखकाने आजच्या अतिरेकी पर्यावरणवाद्यांचे वाभाडे काढले आहेत. जंगलातील आदिवासी पर्यावरण रक्षक आहेत हे साफ खोटे आहे. पर्यावरण हेच मुळी विविध जीवांच्या संघर्षावर आणि नाशांवर उभे आहे. तंत्र-मंत्र आणि धार्मिकीकरणाने तर पर्यावरणाचा अधिकच र्‍हास झाला आहे. 

'द पाॅवर ऑफ प्राॅपर्टी' या बाराव्या प्रकरणात वित्ताचे देशीकरण करणे कसे धोक्याचे आहे व सदाचारविरोधी ठरते हे सांगितले आहे. यात उत्तर भारतातील अलमोर जिल्ह्यातील व 1921 मधील वन पंचायत अॅक्टचे उदाहरण आहे. योजनांचे विकेंद्रीकरण हे योग्य आणि मानवी मूल्यांचे जास्तच जपणूक करणारे ठरते. वित्त रक्षणाची हमी नसल्याने तिसऱ्या जगात दारिद्र्य आहे. वित्त निर्मिणे हे सदाचारात बसत नाही आणि त्याचा साठा हा तर भयंकरच, व तो सामाजिक बहिष्कार आणि मत्सरांना जन्म देणारा ठरतो. 

'ट्रस्ट' या शेवटच्या प्रकरणात मानवी मूल्यांची निर्मिती वैज्ञानिक तथ्थांचा आधार घेत कसे करता येईल याचे सुंदर विवेचन आहे. मानवातील कलह आणि शोषण रचना हे मानवाच्या डोक्यातून उगम पावतात. निसर्ग, संगोपन, सरकार, हाव, देव ही बाह्य कारणे आता टाकून द्यायला हवीत. एकमेकांवरचा विश्‍वास आपणास चांगल्या मुल्यांकडे नेईल. थॉमस हॉब्जचा वाईटपणा विरुद्ध जीन जॅक्स रोसाऊचा चांगलेपणा असा हा वाद आहे. हॉब्ज-स्मिथ-माल्थस-डार्विन असे वास्तव खोदणारी परंपरा त्यातून आता ती स्टीफन गुल्ड- डॉकिन्स पर्यंत आलेली आहे. विश्वास हा आहे की वैज्ञानिक विचार पद्धती मूल्यवादी समाजरचनेकडे नेईल.

मॅट रिडलीने हे अतिशय ओघवत्या भाषेत सहज समजेल अशा शैलीत पटवून दिले आहे. मानवाच्या मूलभूत प्रेरणा आणि मूल्यवादी समाजरचना यांची सांगड कशी घालायची या प्रश्नाचे बव्हंशी उत्तर या पुस्तकातून मिळते. देव-धर्माशिवाय चांगले कसे जगावे असे वाटणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.

- डाॅ.  प्रदीप पाटील

मनोशारीरिक व्याधी

 "हे बघा डॉक्टर, डाव्या हाताची ही... खांद्यापासून या या बोटापर्यंत येणारी शीर आहे बघा.. ही सारखी सुंद होते ! कधी ठणकते आणि सारख्या मुंग्या येतात बघा.. "

जगुबाई सांगत होती. 

मी रिपोर्ट पाहिले. ती अनेक वर्षे उपचार घेत होती. विटामिन्सची  इंजेक्शनं तीने घेतली होती. वेदनाशामक गोळ्या तर किती खाल्ल्या असतील त्याची गणतीच नाही. मानेचा, हाताचा एक्‍स-रे काढला. काहीच त्यात सापडले नाही. जगुबाई जी शीर दाखवत होती ती मुळात शीर नव्हतीच. कारण अॅनाटॉमी नावाच्या शरीररचना विज्ञानानुसार ती दाखवत असलेल्या शीरेच्या जागा चुकीच्या होत्या. याचा अर्थ जी शीर तिच्या शरीरात अस्तित्वातच नव्हती, ती दुखत आहे असे ती का सांगत असावी? 38 वर्षाच्या जगू बाईचा नवरा, मुले सारेच वैतागलेले. कारण शिरेतल्या मुंग्यांनी त्यांच्या डोक्याला मुंग्या आणलेल्या होत्या !!

"जगुबाई...हल्ली बरेच रोग निघालेत... आपल्या नातेवाईकांना, कितीतरी जणांना कोण कोणते रोग होतात बघा कळतच नाही..." हे मी माझ्या पहिल्याच कौन्सिलिंग सेशनमध्ये जगूबाईशी गप्पा मारताना म्हणालो. तशी जगूबाई खुलली. म्हणाली, 

"डॉक्टर, माझ्या चुलत बहिणीला मागल्याच वर्षी मरण आलं आणि......."

मग त्यानंतर तिने सर्व कथा मला ऐकवली. 

जगुबाईची चुलत बहीण राणूबाईच्या दोन्ही हातात मुंग्या यायच्या आणि हात सुंद व्हायचे. त्यानंतर तिच्या शरीरातील इतर काही नसांमध्ये बिघाड झाला. मग तिला उठता बसता येईना. जेवण कमी होत गेले. मग मोठ्या हॉस्पिटलात ऍडमिट केले. तेव्हा जगूबाई तिला बघायला हॉस्पिटलात गेली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राणूबाई वारली.  त्यानंतर चार महिन्यांनी जगूबाईच्या हाताला मुंग्या सुरू झाल्या !! 

"कधीकधी खूप भीती वाटते.. ही शीर बाद झाली तर?" 

जगुबाई घाबरलेल्या चेहऱ्याने मला विचारत होती. 

जगुबाईचा हा रोग शारीरिक नव्हता. ना तीची शीर बाद झाली होती. ना तीला गंभीर कुठलातरी रोग जडला होता. आपल्यालाही राणूबाई सारखा आजार झाला तर ? या समजुतीतून तिच्या हाताला मुंग्या येणे चालू झाले होते. थोडक्यात ही समजूत मनामध्ये पक्की झालेली असल्याने हळू हळू एक आजार "तयार" होत जातो. हा असतो मानसिक विचारांचा आजार. जेव्हा केव्हा ताण वाढेल तेव्हा आपण घट्ट धरून ठेवलेल्या चुकीच्या समजुती उफाळून वर येतात आणि त्याची तथाकथित लक्षणं दिसायला लागतात. ती फक्त पेशंटलाच दिसतात. ती डॉक्टरांना किंवा इतरांना दिसत नाहीत. म्हणजे इथे मनातील समजुती या शारीरिक लक्षणं निर्माण करतात. ही लक्षणं रोगाची नसून मानसिक समस्या जी निर्माण झालेली असते त्याची असतात. म्हणून या व्याधीला मनोशारीरिक व्याधी म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये "सोमॅटोफॉर्म डिसॉर्डर" म्हणतात. पुर्वी याला हायपोकाँड्रियासिस  म्हणायचे.  खरेतर ही विचार विकृती आहे. हा रोग नव्हे. 

जगुबाईच्या डोक्यात बसलेली ही घट्ट समजूत तिच्या हातात मुंग्या निर्माण करत होती. जगूबाईला वेळीच माझ्याकडे आणल्यामुळे मी तिच्या मनातून ही समजूत जाण्यासाठी, पहिल्यांदा, ती समजूत कशी आली आणि कशी तयार झाली आणि ती समजूत ही लक्षणे कशी निर्माण करते हे तीला सांगितले. रोग होईल ही भीती याच्या मुळाशी असते. ज्याला नोसोफोबिया म्हणतात. यासाठी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी नावाचे तंत्र वापरले. जगुबाईच्या हाताच्या मुंग्या संपूर्ण नाहीसे होण्यासाठी पुढे आठ महिने जावे लागले. पण त्यासाठी मी सांगितलेला मानसिक व्यायाम इमानेइतबारे करण्याचे श्रेय तिचेच. 

अशी अनेक उदाहरणे आपणास दिसून येतात. उदाहरणार्थ... 

छातीत सतत डाव्या बाजूला दुखणे आणि समजूत मनात बाळगणे माझे हृदय बाद झाले आहे आणि मला हार्ट अटॅक येणार! 

पोटात विशिष्ट ठिकाणी दुखणे आणि समजूत अशी बाळगणे की पोटात गाठ झाली आहे किंवा अपेंडिक्स झाला आहे.

 डोके सतत दुखणे यामागे समजूत अशी असते की डोक्यात बहुदा ट्यूमर झाला असावा किंवा एखादी गाठ असावी ! 

वजन कमी होतंय मग नक्कीच एडस् रोग झाला असणार.

या सर्व चुकीच्या समजुती असतात आणि त्याच रोग निर्माण करतात. या जर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राहिल्या तर मात्र तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. 

अशा समजुती बाळगणारे पेशंट एका डॉक्टरकडे कधीच टिकत नाहीत. ते एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे सतत फिरत राहतात. ते सतत वेगवेगळ्या चाचण्या आणि तपासण्या करत राहून अनाठायी खर्च करत राहतात. जर या समजुतींना आधार देणारी अशी एखादी श्रद्धा जर त्यांनी उचलली तर त्यांचं हे दुखणं तात्पुरतं नाहीसं होतं. म्हणजे जर ते एखाद्या महाराजाकडे गेले किंवा मांत्रिकाकडे गेले आणि त्यांनी अंगारा-भंडारा दिला आणि आता त्यांचा रोग बरा होणारच असा विश्वास दिला तर त्यांची लक्षणे कमी होतात. बऱ्याच वेळा अनेक पेशंट सांगतात की अमुक एक वार केला, उपवास केला, दर्ग्याला गेलो, महाराजांची वारी केली, नवस बोलला आणि माझा रोग पूर्ण बरा झाला किंवा आयुर्वेद, होमिओपॅथी, अॅक्युप्रेशर, युनानी, रेकी, योगा केलं !! जो रोग डॉक्टरच्या कुठल्याही औषधाने बरा झाला नव्हता तो बरा झाला!!! वास्तवात त्याला कुठलाच रोग झालेला नसतो. मनोशारीरिक रोग असतो आणि या सायकोसोमॅटीक रोगाचा गैरफायदा बुवा, महाराज, मांत्रिक, धार्मिक आचार विधी, आणि विविध यात्रा-जत्रातील नवस घेतात. आणि जेव्हा मनोशारीरिक व्याधी अशा बुवा महाराजांच्या मुळे बरी झाली असे म्हणतात तेव्हा ती पूर्ण बरी झालेली नसते कारण त्यांची "एक" समजूत नाहीशी झालेली असते. पण अशा समजुती तयार करण्याची त्यांची मानसिकता तशीच राहिलेली असते. ती मानसिकता दुरुस्त होत नाही. त्यामुळे छातीत दुखायचे थांबते.. पण नंतर कालांतराने डोकेदुखी सुरू होते आणि अशी अनेक लक्षणे अल्टुनपालटून चालू राहतात. त्यांच्या समजुती समूळ नाहीशा करणं हा त्यावरील उपाय आहे. आणि त्यासाठी सायकोथेरपिस्टकडे किंवा मानसोपचार तज्ञाकडे जाणे हिताचे असते. विशेष म्हणजे अनेक डॉक्टर्स हे देखील अशा मनोशारीरिक व्याधींकडे मेंटल आहे म्हणून दुर्लक्ष करतात. पण ते त्यावर मानस तज्ञांकडे जा असे सांगत नाहीत. आणि मग पेशंट आपला खिसा रिकामा करत अनेक डॉक्टरांकडे हिंडत राहतो. समाजात पसरलेल्या आरोग्याविषयी अनेक गैरसमजुती आहेत. दारोदारी अनेक जण असे आहेत की ते स्वतः डाॅक्टर असल्याच्या थाटात रोगांविषयी सल्ले देत असतात. त्यात वृत्तपत्रातले ऋषितुल्य लेखकही आले. हे सर्व नोसोफोबिया वाढायला मदत करतात. 

असे जर कोणते लक्षण तुम्हाला व तुमच्या ओळखीच्यांना असेल तर तात्काळ समजुती दुरूस्त  करून घ्या !! 

- डॉ. प्रदीप पाटील

माझे वर्तवलेले भविष्य!



 माझे भविष्यच फुटके निघाले.

ज्योतिषी ताकदीचा होता. पारंगत होता.

म्हणून जन्मतःच कुंडली केली.

मस्त अक्षरात ज्योतिष भास्कर उर्फ शिरोमणी जोशीबुवांनी लेखी भविष्य वर्तविले. 

पहिल्या वाक्यातच मी चितपट झालो.

जोशीबुवा म्हणतात...


" हा मनुष्य दानधर्म व जपोजापी करणारा असेल."


दुसर्या भविष्य वाक्यात मी सपाट झालो...


" ईश्वरी उपासनेत रस घेईल "


मी फारच वाईट्ट निघालो या बाबतीत. रस घेतलाय पण तो ईश्वरभंजनात. 

पुढे प्रकांड ज्योतिषी म्हणतात..


"नमोकार मंत्राचा जप केल्यास  आणि दानधर्म केल्यास याला विशेष चांगले फळ मिळेल. "


भारीच ना? मी चक्क सनातन बनलो. मंत्र-तंत्रांना उद्धस्त करत आलोय म्हणजे पाप काही फिटणार नाही. फळ-बिळ लै लांबची गोष्ट. 


" याला गुप्तधन मिळण्याची शक्यता आहे "


जोशीबुवांकडून हे गिफ्ट कुंडलीत मिळालं खरं पण आज अखेर घोर निराशा पदरात घेऊन गुप्तधन शोधत हिंडतोय. 

काही उपाय सुचतोय का माॅडर्न काॅम्प्युटरवाल्या ज्योतिषांना? कुंडली पाहून तेवढे गुप्तधन मिळवून द्या. फिफ्टी फिफ्टी करू या.

जोशीबुवांनी एकच भविष्य अचूक वर्तवलय..


" १३ ते १८ वर्षात कामासक्त होईल "


या जगात कुणी आहे का या वयात कामत्यागी असणारं?

असलाच तर डाॅक्टरी प्रॉब्लेम असणार राव !

एक सुचलंय. तुम्ही तुमचं लहापणीचं ज्योतिषाचं भविष्य शेअर करा. 

तसं ज्योतिषशास्त्र भंपक आहेच. पण मनोरंजन मुल्य अफाट आहे. 

करा मग शेअर. सगळे मिळून एंजाॅय करू या.

प्रारब्ध..ललाट...नियती..वगैरे वगैरे. 

- डाॅ.  प्रदीप पाटील

सर्वंच धर्मकृत्यं वंदनीय नसतात !

    देवाचे घर उभारणार्यांनी देवाच्या नावाने पैसे गोळा करून त्यात भ्रष्टाचार केला तर तर तो भ्रष्टाचार या सदरात मोडत नाही ! शेवटी ते धर्मकृत्य...